समाजमाध्यमांनी सर्वसामान्य माणसालाही सार्वजनिकपणे आपले विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ दिले आहे. त्यापैकी फेसबुक आणि ट्विटर ही समाजमाध्यमे भारतीयांत सर्वाधिक लोकप्रिय आहेत. फेसबुककडे मनोरंजन म्हणून पाहण्याचा वापरकर्त्यांचा दृष्टिकोन अद्याप फारसा बदललेला नाही. मात्र, ट्विटर हे गंभीर स्वरूपाची चर्चा किंवा मुद्दे मांडण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. साहजिकच ट्विटरवरील चर्चेतील मुद्दे, व्यक्ती, घटना देशातील मोठय़ा वर्गाच्या विचारांचा, मतांचा कल दर्शवतात. या पाश्र्वभूमीवर दरवर्षी ट्विटरच्या वतीने वर्षभरातील सर्वाधिक गाजलेले ट्वीट, चर्चेतील व्यक्ती, विषय यांचा तपशील प्रसिद्ध केला जातो. यंदाही १ जानेवारी ते १० नोव्हेंबपर्यंतच्या ट्वीट्सच्या विश्लेषणातून ट्विटरने अहवाल जाहीर केला आहे. यंदाच्या वर्षी राजकारण, मनोरंजन, क्रीडा, संगीत, सामाजिक मोहिमा या गोष्टींवर जास्त ट्वीट झाल्याचे पाहायला मिळाले. याच भारताशी निगडित कोणत्या गोष्टी जास्त संख्येत झाल्या त्या नागरिकांच्या ट्विटटिवाटाविषयी..

२०१८ मधील सर्वोत्तम १० हॅशटॅग

एखादी गोष्ट ठळकपणे दर्शवण्यासाठी तसेच ती सर्च इंजिनमध्ये लवकर शोधण्यात यावी यासाठी हॅशटॅगचा ट्रेन्ड सुरू झाला. बातम्या, राजकारण, मनोरंजन, संगीत तसेच सामाजिक मोहिमांच्या नावाने ट्विटर वापरकर्ते हॅशटॅग करू लागले. २०१८ या वर्षी जास्त संख्येने १० हॅशटॅग प्रसिद्ध झाले.

i#Sarkar- २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरकार’ हा तामिळ चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध ठरला. दाक्षिणात्य अभिनेता थालापती विजय याने या चित्रपटात अभिनय साकारलेला आहे.

#Viswasam- २०१९ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘विश्वासम’ या तामिळ चित्रपटासाठी दाक्षिणात्य चित्रपटरसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटात अजित कुमार या अभिनेत्याने दुहेरी भूमिका साकारलेली आहे.

#BharatAneNenu- २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भारत आने नेणू’ या चित्रपटानेदेखील सर्वात जास्त हॅशटॅगच्या क्रमवारीत येण्याचा मान मिळवला आहे. सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेता महेश बाबू याने या चित्रपटात अभिनय साकारलेला आहे.

#AravindhaSametha- तेलगू चित्रपटसृष्टीतील आजवरच्या सर्वच चित्रपटांचे ‘आराविंधा समेथा’ या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले. या चित्रपटामध्ये पूजा हेगडे आणि ज्युनियर एनटीआर यांनी अभिनय साकारलेला आहे. तीन दिवसांत १०० करोडपेक्षा अधिक कमाई या चित्रपटाने केली.

#Rangasthalam-  बाहुबली चित्रपटानंतर सर्वात जास्त सुप्रसिद्ध झालेल्या ‘रंगास्थालम’ या तेलुगू चित्रपटानेदेखील विक्रम मोडीत काढत सर्वोत्कृष्ट १० हॅशटॅगमध्ये आपले नाव कोरले आहे.

#Kaala- समाज आणि राजकारणावर आधारित असणाऱ्या ‘काला’ या तामिळ भाषेतील चित्रपटानेही ट्विटरवरही जास्त प्रसिद्धी मिळवली. सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत याने या चित्रपटात अभिनय साकारला आहे.

#BigbossTelugu2- बिग बॉस या सुप्रसिद्ध असणाऱ्या सत्यमालिकेतील तेलुगू भाषेतील बिग बॉस खूपच प्रसिद्ध झाल्याचे ट्विटरवर दिसून येते. यामध्ये यंदाच्या तेलुगू बिग बॉस भाग दोनने पहिल्या १० सर्वोत्कृष्ट हॅशटॅगमध्ये येण्याचा मान मिळवला आहे.

 

सर्वाधिक प्रभाव पाडणाऱ्या घडामोडी

२०१८ या वर्षांत ट्विटरवरील सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या घडामोडी संमिश्र होत्या. जम्मूमधील कठुआ येथे नराधमांच्या अत्याचाराची बळी ठरलेल्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी छेडण्यात आलेली मोहीम (#JusticeForAsifa) सर्वाधिक व्यापक झाली. त्याच वेळी कर्नाटक विधानसभेची निवडणूक (#KarnatakaElection) आणि आधारच्या (#Aadhaar) वैधतेबद्दलच्या घडामोडींशी संबंधित हॅशटॅग हे देशातील राजकीय आणि सामाजिक वातावरणाचे प्रतिबिंब दर्शवणारे ठरले. मात्र, केवळ गंभीर विषयांवरील चर्चाच या वर्षी लोकप्रिय राहिल्या असे नव्हे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या प्रेमप्रकरण आणि विवाहाच्या चर्चेविषयीचे (#DeepVeer) हॅशटॅग, आशियाई क्रीडा स्पर्धेत (#AsianGames) जबरदस्त कामगिरी करणारे भारतीय खेळाडू बजरंग पुनिया आणि पी. व्ही. सिंधू या व्यक्तीही चर्चेत राहिल्या.

याखेरीज यंदाच्या वर्षी सर्वाधिक प्रभाव पाडणाऱ्या घडामोडी पुढीलप्रमाणे:

#MeToo- वेगवेगळ्या क्षेत्रांत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात समाजमाध्यमांवर ‘मी टू’ मोहीम सुरू झाली. चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात जागृती होण्यासाठी या मोहिमाला पाठिंबा देण्याकरिता हॅशटॅगच्या माध्यमातून प्रत्येक जण मीटूला पाठिंबा देऊ लागला.

#WhistlePodu- आयपीएल या क्रिकेट सामन्याच्या वेळी चेन्नई सुपर किंग संघाशी निगडित ‘विसल पोडू’ म्हणजे शिट्टी वाजवून संघाला पाठिंबा देण्याची एक मोहीम सुरू झाली. चेन्नई सुपर किंग संघाला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेटरसिक ‘विसल पोडू’ नावाने हॅशटॅग करू लागले.

#IPL2018- भारतातील क्रिकेटविश्वात सर्वात सुप्रसिद्ध असणाऱ्या आयपीएल या स्पर्धेच्या निमित्ताने नागरिक समाजमाध्यमांवर विविध मते व्यक्त करू लागले. मात्र यंदाच्या वर्षी आयपीएल २०१८ नावाने सर्वात जास्त हॅशटॅग झाल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे.

सर्वाधिक चर्चा झालेली चित्रफीत, छायाचित्र

सुप्रसिद्ध भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री याच्या भारतीय फुटबॉलला पाठिंबा देण्याचे आवाहन करणाऱ्या ट्वीट चित्रफितीला यंदा सर्वाधिक अर्थात ६० हजारांच्या आसपास ‘रीट्वीट’ मिळाले. सरकार, विश्वासम आणि भारत आने नेणू या दाक्षिणात्य चित्रपटांच्या नावाने यंदाच्या वर्षी जास्त हॅशटॅग झाले, तर ‘मीटू’ आणि ‘जस्टिस फॉर असिफा’ या मोहिमांमध्ये सर्वात जास्त नागरिकांनी हॅशटॅग करून त्यांचा पाठिंबा दर्शवला. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी करवाचौथच्या वेळी ट्वीट केलेल्या फोटोला २ लाख १५ हजार लाइक्स मिळाले.

२०१८ मधील सर्वात जास्त चर्चिली गेलेली ट्विटर खाती

संकलन – ऋषिकेश मुळे

@rushikeshmule24