News Flash

साहसी सफरीच्या वाटेवर

शारीरिक आणि मानसिक क्षमता आणि संयम यांची कसोटी पाहणाऱ्या साहसी स्पर्धाची तरुणाईला प्रचंड ओढ आहे.

(संग्रहित छायाचित्र)

दिशा खातू

शारीरिक आणि मानसिक क्षमता आणि संयम यांची कसोटी पाहणाऱ्या साहसी स्पर्धाची तरुणाईला प्रचंड ओढ आहे. काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी या तरुणाईला स्वस्थ बसू देत नाही. पुण्यातील ‘एन्डुरो’ या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या तरुणांचा आकडा आणि उत्साह पाहता साहसी सफर हा केवळ खेळ राहिला नसून मानसिकदृष्टय़ा कणखर होण्यासाठी दिलेली परीक्षा असल्याची प्रचीती येते.

खरा साहसी खेळ हा निसर्गात सुरू होतो, रुजतो, वाढतो, खुलतो, फुलतो आणि बहरतो. खरा साहसी खेळ अथवा क्रीडाप्रकार स्वत:सोबतच इतरांना प्रेरित करतो. तो खेळ खेळतानाच, खेळ सोडून वैयक्तिक आयुष्यात तो शिस्त आणतो, कोणत्याही आव्हानांना संयतपणे सामोरे जायला शिकवतो. व्यावहारिक ज्ञान, जगात वावरायचे भान, स्वयंशिस्त, नेतृत्वगुण, व्यवस्थापनकौशल्य आणि सहा अनेक गोष्टी चार भिंतींच्या शाळेत एका मर्यादेच्या पलीकडे शिकता येत नाहीत. त्यासाठी अनौपचारिक बाह्य शिक्षणासारखा पर्याय नाही. मनुष्यप्रजातीच्या अगदी सुरुवातीपासून निसर्ग हाच माणसाचा गुरू राहिला आहे.

नेमका हाच विचार करून पुण्याच्या ‘नॅशनल एज्युकेशन फाउंडेशन’ म्हणजेच ‘एनईएफ’ने सुमारे २७ वर्षांपूर्वी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. शाळकरी मुलांना निसर्गाकडे नेत, चार भिंतींच्या शाळेपलीकडे नेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधायचे ठरवले. गेली २७ वर्षे ही शिबिरे सुरू आहेत. या शिबिरांना मिळणाऱ्या प्रतिसादातूनच ‘एनईएफ’ने १६ वर्षांपूर्वी ‘एन्डुरो’ या साहसी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यास सुरुवात केली. भारतातील पहिली आणि सर्वात मोठी साहसी-थरारक सांघिक क्रिडा स्पर्धा ओळखली जाते. देशभरातून आणि देशाबाहेरील २०० संघांनी आजवर या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

सह्यद्रीच्या अनवट वाटा, दऱ्या-डोंगर, ऊन-थंड वारा याची तमा ना बाळगता अनेकांनी या स्पर्धेमुळे आपल्यातील सकारात्मक बदल अनुभवला आहे. या वेळी सायकल कंट्रोल करणे, सायकल घेऊन डोंगर चढणे, सायकलिंग पूर्ण झाल्यावर ट्रेकिंग मग नदीत उडी मारून कायाकिंग करावे लागते. या फेब्रुवारीतील स्पर्धेसाठी आम्ही ऑक्टोबरपासून सराव सुरू करतो, असे चार वर्षे सलग स्पर्धा खेळणाऱ्या स्मिता पाटील यांनी सांगितले. तरुणांना निसर्गात नेऊन ट्रेकिंग, सायकलिंग, कयाकिंग, रायफल शूटिंग, हाइक अँड बाइकच्या साहाय्याने त्यांना आव्हानांना सामोरे जाण्याचे कसब नकळतपणे शिकवले जाते, असेही पाटील म्हणाल्या.

प्रत्येक संघात किमान एका मुलीचा समावेश आवश्यक असतो. यात मानसिक आणि शारीरिक कणखरता, वेळेचे व्यवस्थापन, सांघिक कौशल्य आणि नेतृत्वगुण शिकवून जात असल्याचा हजारो तरुणांचा अनुभव आहे.

ही स्पर्धा संपूर्ण २ दिवस होणार असल्यामुळे सर्व स्पर्धकांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी मार्शल्सना पेलावी लागते. स्पर्धेची तयारी, प्रत्यक्ष स्पर्धा जिथे पार पडते तिथे स्वत: हे मार्शल्स ट्रेकिंग, सायकलिंग करीत स्पर्धेच्या ठिकाणी तिची व्यवहार्यता तपासतात, असे ‘एनईएफ’चे प्रमुख प्रसाद पुरंदरे सांगतात.

स्पर्धेचे स्वरूप

‘एनईसीसी एनईएफ एन्डुरो’ ही स्पर्धा येत्या २३ आणि २४ फेब्रुवारीला होत आहे. स्पर्धेसाठीची नावनोंदणी सुरू झाली आहे. या स्पर्धेत पुणे आणि परिसरातल्या ग्रामीण स्पर्धकांसह मुंबई, नाशिक,नागपूर, सातारा, कोल्हापूर, बेंगळूरु, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद इथले स्पर्धक दरवर्षी आवर्जून सहभागी होतात. प्रत्येक गटातल्या पहिल्या तीन संघांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक दिले जाते. पूर्ण करणाऱ्यांना पदक दिले जाते. या स्पर्धेसाठी अंतरानुसार २५ किलोमीटर, ७० किलोमीटर आणि १०० किलोमीटर असे तीन मुख्य गट आणि त्यातले उपगट असणार आहेत. १०० किलोमीटर अंतरासाठीच्या गटात ऑल मेन, ऑल गर्ल्स आणि मिक्स (मिक्स टीममध्ये किमान एक स्त्री स्पर्धक आवश्यक) हे गट, ७० किलोमीटर अंतरासाठीच्या गटात यात एक पुरुष आणि एक स्त्री स्पर्धक आवश्यक आहेत. यासह सर्व पुरुष, सर्व स्त्रिया आणि एकत्रित हे उपगट असतात. २५ किलोमीटर अंतराची स्पर्धा ही सर्वासाठी खुली असते. स्पर्धेच्या प्रत्येक गटातल्या टीममध्ये किमान तीन स्पर्धक असणे आवश्यक असणार आहे.

अनुभवाचे बोल

मी २०१६ साली एन्डुरो स्पर्धेत भाग घेतला होता. यासाठी मी एका वर्षांपासून तयारी करत होतो. दिवसाला ६ ते ८ तास सराव करावा लागत होता. त्याचबरोबर व्यायाम, डाएट करावे लागत होते. त्या वेळी स्पर्धा ३ हजार ४४५ किमीपर्यंत होती. या स्पर्धेत आपला आत्मविश्वास, सहनशक्ती, ऊर्जेचा कस लागतो. सध्या अनेक नवोदीत तरुणांना या स्पर्धेसाठी प्रशिक्षण देत आहे. 

– विष्णू नायर, इंग्लंड

मी बायकर असून सध्या मी साहसी खेळाच्या कार्यशाळा घेतो. पूर्वी मी बायसायकलिंग आणि मोटरसायकलिंग एन्डुरो स्पर्धा खेळल्या आहेत. आता त्यात खूप बदल झाला आहे. एका खेळाडूची परीक्षा फक्त एका स्पर्धेत न घेता. विविध स्पर्धा एकाच वेळी घेऊन केली जाते. यासाठी एकूण शरीर आणि मनाचा बॅलन्स करावा लागतो. सलग पाच ते सात वर्षांचा सराव हवा, शरीराची ठेवण त्या पद्धतीने केली पाहिजे. मग स्पर्धेसाठी म्हणून एक वर्ष आधी कसोशीने तयारी केली पाहिजे. यात आपण सराव एका वातावरणात करतो तर स्पर्धा दुसऱ्या वातावरणात होते. त्यामुळे आपले शरीर अधिकाधिक रोगप्रतिकारक बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा लागतो.

– मार्क हेन्री, फ्रान्स

 

पूर्वतयारीसाठी कार्यशाळा

यंदा या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी ‘एनईएफ’तर्फे विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ही कार्यशाळा ९ आणि १० फेब्रुवारीला होणार आहे. या कार्यशाळेत साहसी खेळांच्या स्पर्धेची तयारी कशी करावी, बेसिक फिटनेस, आहार आणि साहसी खेळांचे साहित्य याविषयी आधीच्या स्पर्धेतले विजेते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी पूर्वनावनोंदणी करणे आवश्यक असणार आहे. ‘एनईसीसी एनईएफ एन्डुरो’ या स्पर्धेची अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी www.nefenduro.com या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2019 2:39 am

Web Title: information about pune enduro competition
Next Stories
1 कॉलेज आठवणींचा कोलाज : कडक शिस्तीतली हजेरी
2 सेल्फीस  कारण की..
3 स्वादिष्ट सामिष : सिसम सीड चिकन बाइट्स
Just Now!
X