02 June 2020

News Flash

करोनाष्टक

एकूणच सक्तीच्या सुट्टीतले हे दिवस आम्ही वायफळ गप्पांमध्ये न दवडता त्याचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करत आहोत.

संग्रहित छायाचित्र

करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..

ग्रंथ पठणाचा तास

* सुचित्रा साठे, ठाणे

ध्यानीमनी नसताना अचानक हे करोनाचे संकट जगावर आले. सुरुवातीला त्याचे गांभीर्य समजले नाही, पण नंतर माध्यमांतल्या बातम्यांवरून ते समजू लागले. हे काय बाई नवीन असे करोनाविषयक प्रत्येक बातमी वाचताना वाटत असे. इतकाच करोनाशी संबंध होता. बघता बघता करोनाच्या बातम्यांच्या जागा व वेग वाढला आणि स्वच्छतेचे नियम  ऐकू येऊ लागले.  परिस्थिती आटोक्यात येण्याऐवजी चिघळू लागली आणि  सगळे खडबडून जागे झाले, संपर्क टाळण्याचे उपाय युद्धपातळीवर जाहीर होऊ लागले.

ठाण्याच्या आमच्या विवेक दासबोध मंडळानेही निर्णय घेतला, सर्व वर्ग बंद ठेवायचे. मंडळाच्या  मीराताई लिमये दासबोध, ज्ञानेश्वरी, भागवत अशा आध्यात्मिक ग्रंथांच्या अभ्यासक, प्रचारक, प्रसारक. त्या आठवडय़ातून तीन दिवस दासबोध, ज्ञानेश्वरी, भागवत या ग्रंथांवर निरूपण करतात.  खरेतर हे सगळे वर्ग बंद केले होते, पण मीराताईंनी यातून मार्ग काढला. सोमवारी भागवताचा वर्ग असतो म्हणून मीराताईंनी नेहमीप्रमाणे अभ्यास करून नवव्या स्कंदातील ३ अध्यायांचं निरूपण ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून विवेक दासबोध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोस्ट केले. त्याचबरोबर ते ३ अध्याय घरी वाचण्याचे, त्यांचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. जेणेकरून ग्रंथाच्या अभ्यासात विषयाच्या एकसंधपणामध्ये खंड पडणार नाही. त्यामुळे वेळ नेहमीप्रमाणे चांगला जाईल आणि घरातल्यांनाही आई  किंवा आजी काय करते, याची थोडीफार माहिती होईल. सतत चारी बाजूंनी करोनाचाच बागुलबुवा अंगावर येत असल्यामुळे अस्वस्थ झालेल्या मनाला विरंगुळा मिळेल. हे सारे साध्य करण्याचे सामथ्र्य या ग्रंथांत आणि मीराताईंच्या रसाळ निरूपणामध्ये नक्कीच होते. बाहेरचा वर्ग बंद असला तरी प्रत्येकीच्या घरात हा वर्ग ऑनलाइन सुरूच राहिला आहे.  दासबोधाच्या बाबतीत  सखोल दासबोध अभ्यासक्रम  महिन्याभरापूर्वीच चालू केला होता. या नव्याच्या नवलाईमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून गुरुवारी दासबोधाच्या समासाचे निरूपण आणि प्रश्नपत्रिका नेहमीच्या वेळी साडेचारला ग्रुपवर पोस्ट केली. काहीही घडलं तरी फोन करून विचारण्याची मुभा दिली. प्रश्नपत्रिका सोडवण्यात सगळ्या जणींचे दोन-तीन दिवस छान जाणार होते. अर्थात हे सर्व, आधी केले मग सांगितले, या भूमिकेतून केले. ही प्रश्नपत्रिका सोडवताना वेळ कसा घालवावा हा प्रश्नच उरला नाही. शुक्रवारच्या ज्ञानेश्वरी वर्गाच्या बाबतीतही दहाव्या अध्यायाला सुरुवात करायची  होती. त्यासाठी,‘ नववा महत्त्वाचा अध्याय अभ्यासायलाच हवा, ही सुट्टी म्हणजे जणू गृहपाठ पक्का करण्याची संधीच आहे,’असं सांगत सगळ्या मैत्रिणींना ताईंनी अभ्यासालाच बसवले. दहाव्या अध्यायातल्या १० ओव्यांचे निरूपण ग्रुपवर टाकले. दोन एकादशा असल्यामुळे ९-९ गीतेचे अध्याय एकादशीला गीता पठण करायला येणाऱ्या भगिनींनी आपल्या घरी केले. ‘सर्व काही चालू ठेवायचे फक्त आपापल्या घरी,’असा मीराताईंचा आग्रहच आहे. तो आम्ही पाळला. रविवारी मौनव्रत आणि  मनात अखंड नाम जपत राहायचे, असा प्रस्ताव आत्ताच आला आहे, सर्वाना तो मान्यही होतो आहे. घरातल्या मुलाबाळांनाही आपल्या आई-आजी असा अभ्यास करतायत हे पाहून मजा वाटते आहे. एकूणच सक्तीच्या सुट्टीतले हे दिवस आम्ही वायफळ गप्पांमध्ये न दवडता त्याचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न करत आहोत.

आमचा नारायण

* नमिता राकेश वर्तक

आमच्या आयुष्यात सागर ४ वर्षांपूर्वी आला.  बाबांना पेस मेकर लावला होता. त्यांच्यासाठी कोणीतरी कायमचा मदतनीस ठेवणे गरजेचे होते. हॉस्पिटलच्या एका वॉर्डबॉयने सागरचे नाव सुचवले. एवढासा मुलगा दुसऱ्या दिवशी आम्हाला भेटायला आला. मूर्ती एवढीशी, पण डोळ्यात चमक. अगदी चुणचुणीत. दुसऱ्याच दिवसापासून आमच्याकडे यायला लागला. मूळचा देवगडचाच, मग काय. बाबांशी मालवणीत संवाद व्हायला लागले, सकाळी बरोब्बर ८ वाजता  यायचा आणि संध्याकाळी ७ वाजता निघायचा. कधीच सुट्टी घेतली नाही. आला की स्वच्छ हात-पाय धुऊन मग बाबांकडे जायचा. हळू हळू रुळायला लागला. बाबांची तब्येतसुद्धा सुधारायला लागली. त्यांची सगळी औषधे याला तोंडपाठ.  बाबांबरोबर राहून साहित्य, कथा, अग्रलेख यातले त्याला कळू लागले. मुळातच लाजराबुजरा असलेल्या सागरचा स्वभाव आपण बरे की आपले काम बरे, असा होता. त्याला मुंबईत केवळ काम करायचे नव्हते तर शिकण्याची खरीखुरी इच्छा होती. त्यामुळे आमचे ६ महिन्यांचे काम संपल्यानंतर त्याला आम्ही आमच्याकडेच राहायला बोलावले. दुसऱ्याच दिवशी एक छोटीशी सुटकेस घेऊन स्वारी हजर. त्याला पाटकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. सकाळी कॉलेज आणि दुपारी आल्यावर घरात सगळ्या कामात मदत. बाबांना लॅपटॉपपासून मोबाईलपर्यंत सगळे काही तो शिकवतो. घरची  कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडल्यावर हाच रिपेअर करणार.  आईला तिच्या कामात मदत करतो. आम्हा सगळ्यांबद्दल त्याला खूप प्रेम आणि आपुलकी आहे. आमच्या बाबांनी त्याला नाटकातल्या वेगवेगळ्या पात्रांची नावे ठेवली आहेत, त्यात त्यांचा हात कोणी धरूच शकत नाही, हाडाचे समीक्षक आहेत ना. आमच्या नातेवाईकांत, मित्रमंडळींतही हा सागर प्रसिद्ध आहे.

तर या लॉकडाऊनच्या काळात आमच्या सागरची आम्हाला खूप मदत झाली. या काळात घरात बसून काय करावे, हा प्रश्न या पठ्ठय़ाला पडत नाही, कारण त्याच्या अंगी असलेली कलाकुसर. त्याचे वडील घर बांधतात, कलेचा वारसा त्याला वडिलांकडूनच मिळाला असावा. तर सागरने या लॉकडाऊनच्या काळात कागदापासून अनेक सुंदर वस्तू बनवल्या आहेत. कागदापासून सायकल, मोर, मोटरसायकल अशा अनेक गोष्टी तो बनवत असतो. या सगळ्या कलाकुसरी पाहता पाहता आमचा वेळही छान जातो. ही सक्तीची सुट्टी सागरमुळे छान कलात्मक झाली आहे.

सकारात्मक स्तब्धता

* अर्चना जोशी

अमेरिकेतील माझ्या बिझी मुलानेही जेव्हा आमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर करोनाचा उल्लेख केला तेव्हा, आम्हा साऱ्यांनाच जाणीव झाली, की हे संकट साऱ्या जगालाच भारी पडणार आहे. या करोनामुळे सारेच जग स्तब्ध झाले आहे. खरेतर आधी हा करोना म्हणजे मला  केवळ चिनी लोकांचाच वाटत होता. आपल्याकडे काही तो येणार नाही, असे वाटत होते पण असले आमचे सगळे अंदाज करोनाने फोल ठरवले. वृत्तपत्रातील बातम्या आणि सोशल नेटवर्किंग करून मिळत असलेली माहिती यामुळे जीव गांगरून गेला.

दिवसातून एकदा करायच्या आंघोळीसाठीही त्रासिक चेहरा करणारा नवरा ऑफिसमधून आल्या आल्या बाथरूममध्ये शिरायला लागला. स्वच्छतेशी ‘पुरानी दोस्ती’ असलेले सासरे, सगळ्यांचे मोबाइल, घरातील उपकरणे आणि दरवाजाच्या खिट्टय़ासुद्धा  ९९.९९% ‘जर्म फ्री’ करायला लागले. ‘आमच्या काळी नव्हती बाई असली थेरं’ असे म्हणणाऱ्या सासूबाईसुद्धा ‘हँडवॉश’, सॉनिटायझर वापरू लागल्या.

मध्येच मुलीने इटलीमधील एक व्हिडीओ पाठवला ज्यात सगळे रहिवासी आपापल्या गॅलरीमध्ये येऊन वातावरण संगीतमय करत होते. किती सुंदर वाटले तो व्हिडीओ पाहून.

तसे पाहता, सगळीकडे थोडे गोंधळात पाडणारे वातावरण नक्कीच आहे. पण सध्या तरी यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे शांत राहणे. स्तब्ध राहणे. ज्यांना या विषाणूशी लढण्यासाठी अहोरात्र परिश्रम करावे लागत आहेत त्यांच्यासाठी आपण आपल्या जगण्याचा वेग थोडा काळ थांबवूया. आपण घरात राहून त्यांचे काम थोडे कमी करूया. कारण आपण घरात राहिलो तरच या करोनापासून आपला बचाव होईल. इतके तर आपण नक्कीच करू शकतो. आम्ही तर अगदी आनंदाने आणि मनापासून ते करत आहोत.

करोनाला हरवूया

* अश्विनी पवार

करोनाने सध्या साऱ्या जगाला जेरीला आणले आहे. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवरील आपल्या प्रतिकारशक्तीची कसोटी हा करोना पाहत आहे. पण आपण त्याला हरवायचेच आहे. आधी मनातून आणि मग शरीरातून, कारण अर्धी लढाई मनातून जिंकायची असते.

या करोनामुळे मिळालेल्या सक्तीच्या सुट्टीमुळे माझ्यासारख्या वर्किंग वुमनला थोडा निवांतपणा मिळाला आहे. बाकीच्या वेळी घडय़ाळाच्या तालावर चालणारी मी आता माझ्याच तालावर चालते. कित्येक दिवस खादाड नवऱ्याच्या अनेक फर्माईशी रेंगाळलेल्या होत्या. त्या आता पूर्ण करत आहे. एरव्ही भल्या सकाळी सुरू होणारा दिवस आता जरा निवांत सुरू होतो. रोजची धावपळ, घरातील कामे, ऑफिस यातील ओढाताणीतून थोडी मुक्तता होतेय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबाशी बोलायला खूप वेळ मिळतोय. सुसंवादाचे महत्त्वाचे पण हरवलेले साधन हाताला गवसल्यासारखे वाटतेय. सर्वजण एकत्र बसून छान हसत-खेळत गप्पा मारत जेवण करतोय, हे चित्र कित्येक दिवसांत नजरेस पडले नव्हते, ते आता अनुभवायला मिळतेय. भविष्यात करावयाच्या कामांच्या पूर्ततेसाठी लागणारी ऊर्जा साठवून ठेवायचा हा काळ आहे असे मला वाटते. आपल्यापैकी प्रत्येकानेच या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायला हवा. म्हणजे बघा ना, आपण नेहमी तक्रारी करत असतो की रोजच्या कामातून आपले छंद, आवडी-निवडी जोपासायला  वेळ मिळत नाही. पण या सक्तीच्या सुट्टीने या गोष्टींना वेळच वेळ मिळालाय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘दमलेल्या आई- बाबांची कहाणी’ ऐकणाऱ्या छोटुकल्यांना आई-बाबांचा ‘लाख’ मोलाचा वेळ मिळाला आहे. नोकरीत मिळणाऱ्या हजारो रुपयांपेक्षाही ‘मौल्यवान’ आनंद अनुभवायला मिळतोय.

आपणच श्रेष्ठ हा मानवी अहंकार गळून पडला आहे. रस्ते शांतपणे मोकळा श्वास घेतायत. या करोनाच्या निमित्ताने आपण निसर्गाचे मोठेपण जाणून घेऊ आणि ते जपण्याचा प्रयत्न करू. असे कितीही करोना आले तरी निसर्गाशी असलेली दोस्तीच आपल्याला त्यापासून वाचवू शकते.

कविता वाचनाचा आनंद

* विठ्ठल जाधव, शिरूरकासार,(बीड)

करोनाचा विळखा वाढतच आहे. त्याने अवघ्या जगाला हादरवून सोडले आहे. आमची दोन्ही मुले पुण्याला पिंपरी-चिंचवड येथे शिक्षण घेतात. आम्हाला त्यांची काळजी वाटत होती. कारण पुण्यामध्ये या विषाणूची तीव्रता अधिक होती. रोज मोबाइलवर संपर्क चालू होता. चीन, इटली या देशांची अवस्था ऐकून तर जास्तच भीती वाटत होती. इकडे वृद्ध आई- वडिलांना सोडून जाता येणार नाही तर तिकडे मुलांची काळजी लागून राहिली होती. बाहेर जायची सोय नाही. शेवटी करोनापासून खबरदारी म्हणून मुलांना सुट्टय़ा मिळाल्या. ते गावी आले. गाठीभेटी झाल्या. दहा दिवसांपासूनचे संशयाचे वातावरण निवळले. काळजी कमी झाली. घरात कोंडून घेणे कुणालाच आवडत नाही किंबहुना फिरत्या माणसाला तुरुंगकोठडी वाटते. साधारण तेरा वर्षांपासून मुलं आमच्यापासून दूर आहेत. नोकरीनिमित्ताने आम्हीही बाहेर असतो. त्यामुळे एकमेकांच्या गाठीभेटी, संवादही कमी होतो. मुले घरी आल्यामुळे घराला घरपण आल्यासारखे वाटायला लागले. ते मोबाइलवर रमतात. मग आम्ही एक उपक्रम सुरू केला आहे. रोज आमच्या एका कवितेचे छायाचित्रण घरीच करत आहोत. मुलगा तंत्रज्ञानाची माहिती सांगतो. असा शब्द वापरा, अशी दुरुस्ती करा. अनेक सूचक शब्द घरातून ऐकायला येतात. जगात आम्हाला माहिती नसलेल्या घटनांची माहिती मुले देतात. घरातच मोबाइल, स्टँड, सर्व साधनसामुग्री आहे. छायाचित्रण होते. मिश्रण होते. घराचाच स्टुडिओ झालाय. छायाचित्रित केलेल्या कविता सोशल मीडियाद्वारे पाठवतो. त्यावर चर्चा होते. चांगल्या विचारांची पेरणी त्यातून होतेय आणि मुलांशी संवादही होतो. घरातच सर्वजण थांबतो. मी अभ्यासाला बसलो की, मुलेही अभ्यास करतात. घरात संस्कारवर्गच भरतोय हल्ली. सतत वीस सेकंद हात धुणे चालू आहे. कितीतरी दिवसांनी साऱ्यांची एकत्र अंगतपंगत होते. बाहेर पडू नका, हे सरकारचे सांगणे आम्ही साऱ्यांनी कसोशीने पाळले आहे. नातेवाईकांची चौकशीही केवळ फोनवरून करतो आहे. आपण सगळ्यांनीच ही अशी काळजी घेऊया, घरात थांबूया आणि करोनाला पळवून लावूया.

कौटुंबिक आनंदाचा डोस

*  वृषाली कुलकर्णी

आत्ताआत्तापर्यंत म्हणजे साधारण फेब्रुवारी संपेपर्यंत असे वाटत होते की, करोना केवळ चीनमध्येच असेल. जगभरच्या विज्ञानावर शास्त्रज्ञांवर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे त्यावर काही ना काही उपाय सापडेल, हा विश्वास होता. स्वाईन फ्लूप्रमाणेच करोनासुद्धा असाच जाईल, असे वाटत होते. पण दुर्दैवाने तसे झाले नाही.

एक मार्चला मुलगी परदेशातून येणार होती, पण त्याही वेळेस फक्त येताना स्वत:ची काळजी घे, मास्क लाव एवढेच सांगितले. दहा मार्चनंतर जसजसे भारतातल्या रुग्णांची संख्या वाढायला लागली तसे सगळ्यांचीच काळजी वाढायला लागली.  इतकी की मुलीने थोडेसे डोके दुखते म्हटले आणि एकदा शिंक दिली आणि मी सगळ्या तापाच्या, डोकेदुखीच्या गोळ्या तिच्या समोर ठेवल्या. किंबहुना १-२ डोस तिला घ्यायला लावले, नीलगिरीचा वाफारा, आल्याचा चहा, वेगवेगळे बाम लावून तिला हैराण केले, पण नशिबाने दोन तासांतच ती आणि आम्ही सगळेच नॉर्मलवर आलो. पण १५ मार्चनंतर खरी परीक्षा सुरू झाली.

सगळे काही बंद. त्यामुळे मी, नवरा आणि मुलगा, मुलगी घरातच बसलो. होम क्वारंटाइन. आधी सगळेच खूप बेचैन झाले, कारण सगळे कार्यक्रम विस्कटले. पण हळूहळू त्यातून सावरलो. सकाळी उठून चौघांनी व्यायामाला सुरुवात केली. सतत बाहेर न जाता घरातल्याच गोष्टी वापरून स्वयंपाक करतो आहे. त्यानिमित्ताने खरेतर वेगवेगळे पदार्थ तयार होतायत. मदतनीस मावशींना सुट्टी दिली आहे. सगळी कामे वाटून घेतली आहेत. त्यामुळे कुणालाच कामाचा भार येत नाही. सगळेच स्वावलंबी झाले आहेत. दुपारचा वेळ नुसते झोपून घालवायचा नाही असे ठरवून वाचन आणि माझे थोडे लिखाणही सुरू आहे. संध्याकाळी मुले फक्त घराजवळ थोडेसे पळायला जातात. रात्री जेवणानंतर पत्ते, कॅरम सुरू आहे. एकमेकांच्या मदतीने साफसफाईसुद्धा करत आहोत. माळा साफ करताना मिळालेले जुने अल्बम आणि चौघांनी मिळून ते एकत्रितपणे पाहणे आणि त्यावर हास्यविनोद करणे यासारखे सुख नाही. तशी एका बाजूला थोडी चिंता आहेच, कारण ही साथ आहे तोपर्यंत घरात बसल्यावर नंतर पगाराच्या बाबतीत काहीतरी कमीजास्त होणार. त्यामुळे नुकसान आहे, पण सकारात्मकरीत्या पाहिल्यास त्यादरम्यान साऱ्यांनी लुटलेला हा एकत्र कुटुंबाचा आनंद या सगळ्यापेक्षा मोठा आहे.

चंद्र-सूर्याची भेट

विनायक चंद्रकात नरेगल

मी एका अमेरिकन कंपनीत काम करतो. आमची कंपनी अमेरिकेत असल्यामुळे तिथल्या वेळापत्रकानुसार चालते. मग तिथल्या दिवसाच्या वेळेत इकडे रात्र. गेली कित्येक वर्षे माझी रात्रपाळी असते.  तर माझी पत्नी मात्र आपल्या भारतीय वेळेप्रमाणे काम करते. ती दिवसा कार्यालयात जाते. मी रात्री. मी पहाटे जेव्हा घरी येतो, तेव्हा ती झोपलेली असते आणि ती जाते तेव्हा मी झोपलेला असतो. गमतीने म्हणायचे झाले तर अगदी चंद्र—सूर्याप्रमाणेच झाले आहे. एक मावळला की दुसरा उगवतो. त्यामुळे एकाच घरात राहून आमची भेट केवळ सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी होते. आता दोघांनाही घरून काम करण्याची परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे चक्क दिवसभर आम्ही एकमेकांना बघतोतरी. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवता येतो. हे सर्व शक्य झाले, या करोनामुळे. हे संकट आहे खरेच पण त्याचे हे चांगले परिणामही पाहू या आणि या काळात दु:खी न राहता आनंदी होऊ या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 1:05 am

Web Title: some select experiences quarantine abn 97
Next Stories
1 करोनाष्टक
2 समाजसेवकांचे आभार
3 पुस्तकांच्या जगात..
Just Now!
X