पळणे हा सर्वोत्तम व्यायाम असल्याने अनेक जण सकाळी जॉगिंगला जातात. मात्र अनेकदा बाहेर पळायला जाणे जमत नाही. त्यामुळे जागच्या जागी पळणे (जॉगिंग इन प्लेस) हा व्यायाम घरच्या घरी करू शकता. घराबाहेर पळायला जाणे किंवा ट्रेडमिल यंत्रावर पळणे यापेक्षा हा अधिक सोपा व्यायामप्रकार आहे. उन्हाळय़ात अधिक उष्णतेमुळे किंवा हिवाळय़ात थंडीमुळे घराबाहेर पडणे जमत नाही. त्यामुळे घरच्या घरी हा व्यायाम करणे शक्य आहे. या व्यायामाने तुम्ही बऱ्यापैकी उष्मांक कमी करू शकता. वाढलेले वजन कमी करण्यासाठी हा एक चांगला व्यायामप्रकार आहे.

कसे कराल?

*      सुरुवातीला वेगाने पळू नका. आधी वॉर्म अप करण्यासाठी हळूहळू पळा. तुमची पावले जमिनीपासून केवळ एक ते दोन इंचावर असतील अशा पद्धतीने पळा. एक पाय वर एक पाय खाली अशा पद्धतीने पळले पाहिजे.

*  हा व्यायाम करताना हात स्थिर ठेवू नका. पळताना ज्याप्रमाणे हात हलतात, त्याप्रमाणे दोन्ही हात वर-खाली करून हलवणे आवश्यक आहे.

*  काही वेळाने पळण्याचा वेग वाढवून पावले अधिकाधिक उंचावर येतील, अशा पद्धतीने पळा.पाय गुडघ्यामध्ये काटकोनात येतील या उंचीवर पळले तरी चालेल.

*  प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार पळावे. किती वेळ पळायचे आहे हे ठरवून घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*  पळणे थांबवायचे असल्यास एकदम थांबवू नका. पुन्हा वेग कमी करून हळूहळू थांबवा.