डॉ. आनंद नाडकर्णी , मनोविकारतज्ज्ञ

प्रामुख्याने तणावाचे दोन भाग आहेत. एक आवश्यक तणाव आणि दुसरा अनावश्यक तणाव. आयुष्यातून तणावमुक्त राहण्यासाठी आवश्यक तणाव आणि अनावश्यक तणाव या दोन्हीमधील फरक समजून घेणे गरजेचे आहे. आवश्यक तणाव हा समोर येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी उद्युक्त करतो. हा ताण व्यक्तीच्या सुयोग्य अशा मुख्य गरजांना मिळवण्यासाठी व्यक्तीला कार्यशील करतो. माझ्या मते एकंदरीतच हा ताण हवा कारण हा ताण असल्याशिवाय व्यक्तीला प्रगती करता येत नाही. अनावश्यक ताण हा उद्दिष्टापासून दूर नेतो. विधायक पर्यायांपासून दूर नेतो. मी माझ्या आयुष्यात हाच फरक सतत डोक्यात ठेवतो. आपण अनेकजण प्रत्येक गोष्टीला तणावाने तोलतो. मात्र तणाव हा मनातूनच निर्माण होतो. आपण एखाद्या गोष्टीचा खूप खोलवर विचार करतो. हा विचार करत असताना त्याची प्रगल्भता इतकी जास्त असते की त्या एखाद्या गोष्टीचा विचार करत असताना आपण त्याच्याशी संबंधित इतर दुसऱ्या गोष्टीत हरवून जातो आणि त्याच गोष्टीचा जास्त विचार करायला लागतो. ही एक निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. आपण ज्या गोष्टीचा मनात विचार करत असतो त्या गोष्टीच्या विचारातच त्याचे उत्तर असते. मनुष्य कोणत्याही गोष्टीचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी तो विचार त्याला पडलेला एक प्रश्न असतो. मी या विचारांच्या जोडय़ा केल्या आहेत. उद्दिष्टय़ आणि प्राधान्य, नियंत्रणामधले आणि नियंत्रणाबाहेरचे घटक, समस्या आणि दोष, व्यक्ती आणि वर्तन अशा या चार जोडय़ा आहेत. प्रत्येक गोष्टीचे एक वेगळे वैशिष्टय़ आहे. जसे यातीलच एका जोडीचे सांगायचे तर व्यक्ती आणि वर्तन ही जोडी मी ताण आल्यानंतर लक्षात ठेवतो.

एखाद्या वेळी आलेला राग हा व्यक्तीचा नसून त्या व्यक्तीच्या वर्तनाचा असतो. प्रत्येक ताण हा त्या त्या परिस्थितीला, घटनेला अनुसरून आलेला असतो. मी भावनिक ताकद वाढवतो. मी माझा आनंद वाढवतो. मी माझ्या आनंदासाठी कुटुंबाबरोबर वेळ घालवतो. वाचन करतो, चित्रपट पाहतो, संगीत ऐकतो. या गोष्टी अनावश्यक तणावापासून मला दूर ठेवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. माझे काम आणि माझा अभ्यास हेदेखील मला आनंद देतात.