रोहित जाधव rohitj1947@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यटनासाठी नेहमीच्या ठिकाणापेक्षा जरा हटके काही पाहायचे असेल तर सह्य़पर्वतरांगेच्या उत्तर टोकावर असलेल्या सुरगाणामध्ये भटकायला हवे. सुरगाणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जशी मोठी तसेच त्याला लाभलेले नैसर्गिक सौंदर्यदेखील आहे. सह्याद्रीच्या चणकापूर-केम या डोंगररांगेत नार-पार-गिरणा या नद्यांच्या उगमस्थानात वसले आहे. नाशिक जिल्ह्य़ाच्या ठिकाणापासून हे ९० किमी अंतरावर आहे.

बोरगावमार्गे सुरगाण्याला जाताना वाटेत चिराई घाट लागतो. तेथे ब्रिटिशकालीन एक भिंत दिसते. तिकडेच पुढे चिराई डोंगरावर गिरणा नदीचा उगम आहे आणि गिरिजामातेचे मंदिरसुद्धा आहे. येथील केळावन धबधबासुद्धा खूप उंच आहे, तर सुरगाण्यातील बारे गावाजवळील भिवतास हा धबधबा म्हणजे उंच व खोल धबधब्यांचा समूहच. येथे सूर्यकिरणे डोंगरावरून अशी पडतात जणू पाण्याला केशरी रंगच दिला आहे. पाण्याचा खळखळाट तीन किमीवरूनच ऐकू येतो, पण केवळ पावसाळ्याच्या तीन महिन्यांतच त्याचा आनंद घेता येतो. पावसाळ्यात हा भाग अतिशय विलोभनीय दिसतो. पुढे माणी गावाजवळ बेलबारी हे तीर्थक्षेत्र आहे. या बेलबारीचा शिवलीलामृतात उल्लेख येतो. येथे फक्त बेलाचीच झाडे आहेत व एका टेकडीवर माणकेश्वर महादेव मंदिर आहे. मुळातच या टेकडीचा आकार एका शिवलिंगासारखा आहे. तेथील नंदी फारच मोठा आहे.

तालुक्यातील शिंदे या गावाजवळ केमच्या डोंगरावरून पारगंगा या नदीचा उगम होतो. तेथे महालक्ष्मीचे अतिशय प्राचीन मंदिर आहे तसेच महालक्ष्मीची दुर्मीळ मूर्तीसुद्धा आहे. सुरगाण्याच्या बाजूलाच नवापूर रस्त्याला भदर हे गाव आहे. ते एक मोठे संस्थान होते. येथे एक मध्ययुगीन शिवमंदिर फार सुंदर आहे, कारण एक झाड त्यावर वाढले आहे. येथे जवळच एक वडाचे झाड आहे. त्याला फासा वड असे म्हणतात, कारण त्यावर ब्रिटिशांनी १०८ लोकांना फाशी दिली होती. पूर्वजांच्या शौर्याला स्मरण करण्यासाठी आजही भदरचे लोक एका विशिष्ट दिवशी तेथे जमून शौर्यगीत गातात.

सुरगाण्यातील पायविहिरीसुद्धा खूप सुंदर होत्या. त्यातील रंगत विहीर, खोकर विहीर, पाल विहीर प्रसिद्ध होत्या, पण काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे सध्या त्या दुर्लक्षित आहेत. इकडेच उंबरठाण मार्गावरील पिंपळसोंडजवळील तातापाणी येथे गरम पाण्याचे कुंड आहेत. तसेच रंगत विहिरीजवळील डोंगरावर पेंडार देवाची शिळा आहे. पुढे माजघर येथे नटेश्वर महादेवाचे अतिशय दुर्गम भागात छोटेखानी मंदिर आहे; पण तेथील निसर्ग बारमाही अद्भुत आहे. सुरगाणा भूमीतील काही गावे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहेत.

इतिहासात हे गाव रामनगर संस्थानच्या आधिपत्याखाली येत असे. येथे महत्त्वाची सहा संस्थाने होती. त्यातील सुरगाणा हे मोठे. अगोदर या गावाचे नावाचे नाव निम्बारघोडी होते. येथील संस्थानिक राजे पवार घराण्यातील प्रसिद्ध राजे प्रतापराव यांच्या कार्यकाळात त्या गावाचे नाव सुरगाणा असे पडल्याचे समजते.

पवार संस्थानिक राजे मूळचे माळव्यातील परमारवंशीय. एका नोंदीनुसार या घराण्याची वंशवेल अगदी उज्जेनच्या सम्राट विक्रमादित्यापर्यंत पोहोचते. पुढे अनेक वर्षांचा दुष्काळ व अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे त्यातील काही कुटुंबे गुजरातमधील लाट प्रदेशात स्थायिक झाली. दुसऱ्या सुरत स्वारीवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हातगड किल्लय़ामार्गे मार्ग दाखवून मदत केली होती व साल्हेरच्या १६७१ च्या युद्धावेळीसुद्धा मदत केली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना साल्हेर व हातगडाची देशमुखी दिली होती. या घराण्याचा प्रसिद्ध मोतीबाग राजवाडा अजूनही सुरगाण्यात आहे. या घराण्यात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले, त्यातील यशवंतराव पवारांनी पानिपतच्या युद्धातसुद्धा मोठाच पराक्रम गाजवला होता. त्यांचा पराक्रम पाहून पेशवे दरबारातून त्यांना मानाचे कडे दिले गेले होते.

पुढे ब्रिटिश लढय़ात मल्हारराव पवार यांना ब्रिटिशांनी भदर येथे फाशी दिली होती. त्यानंतर त्यांचे भाऊ  भिकाजी पवार यांनी १८२० मध्ये  ब्रिटिश सत्ता उलथवून सुरगाणा स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. १८५७ साली राजा रवी राव पवार यांनी स्वातंत्र्यलढय़ात उडी घेतली. पुढे शंकरराव, प्रतापराव, यशवंतराव आणि धैर्यशीलराव असे राजे झाले. पवार घराण्याची सोयरिक सातारच्या घराण्याबरोबरच बडोदा, ग्वाल्हेर, कोल्हापूर या संस्थानिकांशीसुद्धा आहे.

सुरगाण्यातील आदिवासी शेतकरी बांधवसुद्धा खूप प्रयोगशील आहेत. ते आंतरपीक शेतीत कांदा-मिरची आणि स्ट्रॉबेरी हे पिके घेतात. तसेच सुरगाणामधील तांदूळ, मध, काजू हेसुद्धा विशेष प्रसिद्ध आहेत. येथील बोलीभाषा अतिशय शुद्ध आहे. ऐकायला पुणेरी वाटावी अशी मराठी-डांगी-कोकणी भाषेचे एकत्रीकरण आहे. येथे कोकणा-वारली व महादेव कोळी जातीचे आदिवासी बांधव गुण्यागोविंदाने राहतात. जवळच सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच हातगड किल्ला व दळवट हे भूकंपाचे केंद्रबिंदू असलेले ठिकाणदेखील आहे. एकंदरीतच एक दिवसाच्या सहलीत यातील सर्व ठिकाणे बघून होतात.

 

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historical surgana in nashik district zws
First published on: 13-03-2020 at 03:30 IST