scorecardresearch

करोनाष्टक : हवीहवीशी गृहकैद

आपले राहिलेले वाचन ती पूर्ण करते. संध्याकाळी पाककलेची हौस भागवते.

करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव.. 

सुनीता श्रीनिवास केळकर : टाळेबंदी सुरु झाल्यावर घराबाहेर पडायचे नाही. कुणी कुणाकडे जायचे नाही, यायचे नाही. असे बरेच नियम आले. कारण यामुळे घरातील मदतनीस माणसेही येणार नव्हती. धुणी-भांडी, फरशी, के र सारे काही घरातल्यांनाच करावे लागणार होते.

पण दोन-तीन दिवसांनंतर सगळ्याची सवय झाली.  सगळे घरीच असल्याने कामाची विभागणी झाली. सारे एकत्र असल्याने गप्पा-गोष्टी, चेष्टा-मस्करी जोरात सुरू होती. दुपारच्या वेळेत प्रत्येक जण आपापले काम करतो. सून आर्किटेक्ट आणि लेक्चरर आहे. काम आणि मुलांचा अभ्यास यामुळे तिला दुसरे काही करायला मिळत नव्हते. आपले राहिलेले वाचन ती पूर्ण करते. संध्याकाळी पाककलेची हौस भागवते. बारावीतली नात तिला मदत करते. सहावीतल्या नातवाला रोबो प्रोग्रॅमिंगची खूप आवड आहे. त्यामुळे तो त्यातील माहिती घेत असतो. अनेक ऑनलाइन अभ्यासक्रम करत असतो. माझा मुलगाही घरून काम करत असल्याने नातवंडांना त्यांचे बाबा आता जास्त वेळ मिळू लागले आहेत.

गंमत म्हणजे आजोबा आता सगळ्यांना मदत करतात. दुपारचा चहा करून प्रत्येकाच्या हाती आणून देतात. या सगळ्यामुळे माझेही काम कमी होऊन मीही भरतकाम आणि विणकाम करत बसते. त्या नमुन्यांचे फोटो व्हॉट्सअ‍ॅप गटावर टाकते आणि त्यावर किती कौतुक होते, म्हणून सांगू. आता माझे वय ७१ आहे. आजकाल अशा कौतुकाची सवयच राहिली नाही त्यामुळे त्याचे विशेष वाटते.

संध्याकाळी मात्र मी दासबोधाचा अभ्यास करते. सध्या तिसऱ्या वर्षांची परीक्षा देत आहे. करोनामुळे ही गृहकै द झाली आहे खरी पण सगळे एकत्र आणि आनंदी असल्याने ती हवीहवीशी वाटत आहे.

प्रार्थनेचे महत्त्व

अनघा सावंत, लालबाग : टाळेबंदीला आता दोन महिने झाले. सारे घरातच आहेत. घरातील कामे वाढली तरी त्याचे विभाजनही होते आहे. कु णालाच कसली घाई नाही. निवांतपणा मिळाला आहे. सध्या अनेक ऑनलाइन स्पर्धा चालू आहेत. मला वाचनाची तसेच लिखाणाची आवड असल्यामुळे या स्पर्धामध्ये मी नेहमी भाग घेते.

एका लघुकथा लेखन स्पर्धेत मला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पहिल्याच प्रयत्नाला बक्षीस मिळाल्याने आनंद झाला. दुपारच्या वेळात वाचन करते. मोत्यांच्या माळा, तोरणे, कं ठी बनवते.  रोज संध्याकाळी मुलांना ओंकार आणि प्रार्थना शिकविण्यास सुरुवात केली आहे. मुलांनाही त्याची गोडी लागली आहे. दिवेलागणीच्यावेळी देवासमोर बसण्याची वेळ कधी नव्हे ती सध्या येते आहे. त्यामुळे विशेष समाधान वाटत आहे.

घरच्या घरी व्यायाम

पद्माकर औटी, सानपाडा, नवी मुंबई : आम्ही पतीपत्नी ज्येष्ठ नागरिक आहोत. मी वय वर्षे ८० तर पत्नी ७५. या करोना काळात शरीराला आणि मनाला सकारात्मकरीत्या गुंतवून ठेवण्यात दोघे यशस्वी झालो आहोत, असे म्हणता येईल. गेली ३५-४० वर्षे आमचे सकाळचे फिरणे ठरलेले असायचे. आता मात्र घरात बंदिस्त झालो.  सुरुवातीला

पार्किं गमध्ये फे ऱ्या मारत होतो, पण तेही बंद झाल्यावर घरात सूर्यनमस्कार, पद्मासन, योगासने, प्राणायाम  करू लागलो. व्यायाम म्हणून इमारतीच्याच पायऱ्या चढतो-उतरतो.  संगणक आणि मोबाइलवरून बिले भरण्याचे, ई-पुस्तके  वाचण्याचे सुरू आहे. संगीतही ऐकतो. परदेशातील मुलांशी छान संवाद साधतो. पत्नी वेळ घरकाम, टीव्ही यात जातो. एकू णच दोघे या काळात न कं टाळता आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो आहे.

गायनाची आवड जपतो

राजेंद्र तारे, डोंबिवली. : मी आणि पत्नी म्हणजे जातीचे भटके . टाळेबंदी जाहीर झाल्यावर सुरुवातीला भलतेच हैराण झालो. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर दोघे मनसोक्त भटकं ती करत असतो. ती आता थांबली. नुकतीच आमची नर्मदा परिक्रमा झाली होती. ती करून प्रसन्न मनाने घरी आल्यावर आवराआवर सुरू होती. घर लावणे, मदतनीसांकडून साफसफाई करून घेणे सुरू होते, तितक्यात ही टाळेबंदी जाहीर झाली. आता के र, लादी, भांडी, बाजार, स्वयंपाक अशी सगळीच कामे आम्हा दोघांवर येऊन पडली. कारण मदतनीस ताईसुद्धा येऊ शकणार नव्हत्या. सुरुवातीला सारे अवघड झाले, नंतर मात्र त्याची सवय झाली. सुरुवातीला वाटले की हात-पाय दुखतील पण तसे काहीच झालेले नाही. टाळेबंदीचा हा फायदाच म्हणावा लागेल की, त्यामुळे तंदुरुस्ती वाढलीच. पत्नी मेघा रोजच्या जेवणासोबत उन्हाळी वाळवणेही करते आहे.  शेवभाजीपासून मिसळीपर्यंत, दाबेली, इडली डोसा, डाळ बट्टी, पिठातल्या मिरच्या, कैरीची विविध प्रकारची लोणची, ठेचा, मेतकुट भात, वडापाव असे एकाहून एक सुंदर पदार्थ तिने केले. पूजा करतानाही आम्ही विविध स्तोत्रे मोबाइलवर लावून ठेवतो. ऐकायलाही प्रसन्न वाटते. कधीकधी मुली-जावयांबरोबर खेळ रंगतो. निवांत वामकु क्षी मिळते. दुपारनंतर चहा-पाणी झाल्यावर दोघे कराओके  ट्रॅकवर गाण्याचा सराव करतो. पत्नी तर उत्तम गाणे म्हणते. गाण्याच्या विविध ऑनलाइन  उपक्रमांमध्ये आम्ही सहभागी झालो आहोत. त्यामुळे वेळ छान जातो.

जादू अ‍ॅनिमेशनची

वेदांत जगदीशचंद्र फाटक, इयत्ता सातवी, नंदादीप विद्यालय, गोरेगाव : करोनाच्या संकटामुळे मला अचानक सुट्टी मिळाली, ती सुद्धा मोठी.  सुरुवातीला काही दिवस अभ्यास करत होतो. आईने त्याचे वेळापत्रकच तयार करून दिले होते. शाळेतूनही ऑनलाइन अभ्यास दिला होता. त्यानुसार मी गणित आणि इंग्रजी विषयाचा अभ्यास करीत आहे. मग घरात असलेल्या गोष्टींच्या पुस्तकातील गोष्टी पुन:पुन्हा वाचल्या. ताईसोबत कॅ रम, उनो, सापशिडी खेळलो.  करोनाविषयीच्या बातम्या पाहतो, वाचतो. व्हॉट्सअ‍ॅपवरून मित्रांशी संवाद साधतो. दूरदर्शनवर रामायण, महाभारत पाहिले. हनुमानाच्या त्यातील करामती खूपच आवडल्या. हे करतानाच ताईसह मी नवी गोष्ट शिकलो. ती म्हणजे, अ‍ॅनिमेशन फिल्म तयार करणे. छोटय़ा छोटय़ा फिल्म तयार करून त्यांना मी आवाज दिला आहे. ते यूटय़ूबवर अपलोडही के ले आहे. या प्रत्येक व्हिडीओतून मी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न के ला आहे.

अनुभव लिखाणात रमलो

लक्ष्मण संगेवार, नांदेड. : लेखन कलेकडे कधी फारसा वळलो नाही पण टाळेबंदीने मात्र हातात पेन घेऊन लिहायलाच बसवले. कोणाला भेटायचे नाही, बोलायचे नाही अशा या काळात आपल्या मनातील भावना, विचार शब्दबद्ध करणे म्हणजे संवाद साधण्यासारखेच झाले. अगदी कागदावर मन मोकळे करत असे. आता माझे वय ६५ या इतक्या कालखंडात आलेल्या अनुभवांवर, विविध विषयांवर ५०हून अधिक लेख लिहून ते समाजमाध्यमांवर टाकले. त्याला छान प्रतिसादही मिळाला. विषय अर्थातच सुचतील ते.. पन्नास वर्षांच्या नाटय़, आकाशदर्शन, प्रवास, वाचन, सामाजिक क्षेत्रातील सहभागामुळे आठवणी भरपूर. या लेखांचे आता वाचन करावे आणि तेही समाजमाध्यमांवर प्रसारित करावे, असा सल्ला युवामित्रांनी दिला आहे, पाहू ते कसे होते.

ऑनलाइन स्पर्धाची गंमत

मुग्धा पोटे : टाळेबंदी झाली आणि सारे काही बंद झाले. या  नकारात्मकतेपासून दूर जाण्यासाठी ऑनलाइन स्पर्धाची कल्पना सुचली. आमच्या कु टुंब या व्हॉट्सअ‍ॅपवरील गटावर सगळ्यांना विचारले, सगळ्यांनी होकार दिला. परदेशातल्या व्यक्तींचीही वेळ लक्षात घेतली आणि सारे जण या स्पर्धासाठी तयार होऊ लागलो. चित्रकला, वेशभूषा, पुरुषांची पाककला स्पर्धा, करोनासंबंधित संदेश तयार करणे, भेटपत्रे, पाढे पाठांतर, घरातील एखादा कोपरा सजवणे अशा विविध स्पर्धा घेतल्या. सगळ्यांनीच त्यास भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक जण रोजच्या स्पर्धेची वाट पाहू लागला. त्यासाठीच्या तयारीत व्यस्त राहिला, सकारात्मक राहिला. त्यामुळेच दिवसेंदिवस या स्पर्धा अधिकच रंगत गेल्या. या स्पर्धासोबत आम्ही गाण्यांच्या मैफिली, कथाकथन, काव्य वाचन, नाटुकल्या असे उपक्रमही चालवले. या सगळ्यामुळे या संकटकाळात सगळे एकमेकांपासून लांब असून मनाने जवळ आले.

चित्र रेखाटन

शीतल खडसे, नागपूर : करोनामुळे सारेच घरात बसले पण घरात बसून करायचे काय, हा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. मी गृहिणी आहे. सुरुवातीला नवनवे पदार्थ बनवले, पण लवकरच त्याचा कं टाळा आला. खरे तर मला चित्र काढायला खूप आवडते पण कधी वेळच मिळाला नाही. आता वेळच वेळ असल्याने चित्र काढायला सुरुवात के ली. पण घरात रंग नव्हते म्हणून पेन्सिलने रेखाटने काढायला सुरुवात के ली. रोज एक ते दीड तास चित्र रेखाटते. त्यात वेळही छान जातो. सराव होतो आणि यामुळे कलेतही सुधारणा झाली आहे.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा ( Kutumbkatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta readers innovative activities at home during lockdown zws

ताज्या बातम्या