सुहास जोशी

शीर्षक वाचूनच एकदम चटपटीत काहीतरी असणार याची खात्री पटली असेलच. हे सगळं आहेच भन्नाट. प्रत्येक छोटय़ा मोठय़ा शहराचं असं काही तरी खास असतंच. सोलापूरची खासियत ही शेंगा चटणी, कडक भाकरी आणि शेंगा भाजी ही आहे. पण हे चित्र गेल्या २० वर्षांत तयार झालं आहे. पूर्वी हॉटेलमध्ये, ढाब्यावर हे पदार्थ अगदीच ठरावीक ठिकाणी मिळायचे. शेंगा भाजीचा प्रकार सोलापूर परिसरात तर शेंगा झुणका म्हणून केला जायचा. फोडणीत शेंगदाण्याचं जाडंभरडं कूट टाकून हा सुका पदार्थ दही-भाकरीबरोबर खाल्ला जायचा. तर कडक भाकऱ्या एका विशिष्ट समाजामध्ये केल्या जायच्या. या पातळ भाकऱ्या पापडाप्रमाणे असत. प्रवासातदेखील टिकत. चटणी तर नेहमीच होती. पण आज सोलापुरातील ढाब्यांवर, हॉटेलात, शहरातील अनेक हॉटेलमध्ये शेंगदाणा चटणी, भाजी आणि कडक भाकरी सर्रास मिळते. अगदी एसटी स्टॅन्डसमोरील सर्वात जुन्या अशा इडली गृहामध्येदेखील हे प्रकार मिळतात. शहरात शेंगा भाजी-कडक भाकरीसाठी काही ठरावीक हॉटेल्स प्रसिद्ध आहेत. १०-१० भाकऱ्यांची पाकिटेही अनेक ठिकाणी विकली जातात. चटणी विकणाऱ्यांची संख्या बरीच आहे. सोलापूरला थेट पर्यटनासाठी जाण्याचे तसे फार काही मोठे कारण नाही. पण पुणे अथवा पंढरपूरमार्गे तुळजापूर, अक्कलकोट आणि हैदराबादला जाताना सोलापूर हमखास थांबायचे ठिकाण आहे. त्यामुळे वाटेत या पदार्थाचा आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही.