डॉ. किरण नाबर, त्वचारोगतज्ज्ञ

पांढरा कोड (व्हिटिलिगो) या त्वचेशी संबंधित आजाराचे अनेक रुग्ण अवतीभवती दिसतात. तरीही या आजाराबाबत मात्र अजूनही समाजातील अढी कायम असून अनेक गैरसमजही आहेत. तेव्हा या आजाराबाबत सखोल माहिती घेणे गरजेचे आहे.

 कोड म्हणजे काय?

हा त्वचेचा आजार आहे. त्वचेत रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशी नष्ट होतात आणि त्वचेवर सफेद रंगाचे चट्टे दिसू लागतात.

हा आजार कोणाला होऊ शकतो?

हा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. १०० जणांमध्ये एक टक्के लोकांना याची लागण होतो. आजार झालेल्या एकूण रुग्णांपैकी जवळपास ३० टक्के रुग्णांमध्ये अनुवंशिकतेमुळे झाल्याचे दिसून येते. याचा अर्थ कुटुंबामध्ये कोणाला झालेला नसूनही हा आजार होऊ शकतो. बहुतांश रुग्णांना या आजाराचा पहिला चट्टा लहानपणी किंवा ३० वर्षांच्या आत आलेला असतो.

कोड म्हणजे कुष्ठरोग का?

कोड म्हणजे कुष्ठरोगच हा मोठा गैरसमज आहे. कोड असलेली व्यक्ती सफेद चट्टे सोडल्यास पूर्णपणे निरोगी असते. कुष्ठरोग हा जंतूसंसर्गामुळे होत असून यात अंगावर पांढुरके (एकदम सफेद नाही) किंवा लालसर चट्टे येतात. या चट्टय़ांना सुन्नपणा असतो. कोड हा आजार संसर्गजन्य नाही. कुष्ठरोग (बहुजीवाणू प्रकारातील असल्यास) संसर्गजन्य आहे.

आहाराशी याचा संबंध आहे का?

अत्याधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये एखादी गोष्टा जास्त खाल्ल्याने किंवा आहारातून वगळल्याने कोड होत असल्याचे आढळून आलेले नाही. दूध अधिक प्यायल्याने कोड होतो, असा समज असून त्यात कोणतेही तथ्य नाही. पण एकूणच चौरस आहार, ज्यामध्ये बीटा कॅरोटीन, अ‍ॅण्टीऑक्सिडंटयुक्त पदार्थाचा (गाजर, टोमॅटो, फळे, फळभाज्या, पालेभाज्या) आहारात समावेश असणे गरजेचे आहे.

हा आजार अंगभर पसरतो का?

एकदा छोटा पांढरा चट्टा आला की आजार अंगभर पसरतो, अशीही भीती अनेकांमध्ये असते. ही भीती चुकीची असून केवळ ५ ते १० टक्के व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असते. जवळपास ९० टक्के रुग्णांमध्ये हा आजार शरीराच्या ठरावीक भागात सीमित राहतो.

पूर्णपणे बरा होतो का?

आजारात लवकर उपचार सुरू केले आणि प्रमाण तुलनेने कमी असेल तर आधुनिक औषधोपचाराने बरा होऊ शकतो. काही जणांमध्ये त्याची वाढ थांबून सफेद रंग असलेल्या ठिकाणी त्वचेचा मूळ रंगही परत येतो. तर काही जणांत हा आजार फक्त ओठ व बोटे, तळहात, तळपायापुरता सीमित असतो.(लिप-टिप सिन्ड्रोम) या ठिकाणी केस नसल्याने रंग पूर्णपणे परत येईलच असे नाही. अशा ठिकाणी शस्त्रक्रिया करावी लागू शकते.

कारणमीमांसा

स्वयंप्रतिरोध (ऑटोइम्युनिटी) – या आजारात आपलीच रोगप्रतिकारशक्ती आपल्या रंगाच्या पेशीविरुद्ध काम करतात आणि रंगपेशी नष्ट होतात. हे होण्यात जनुकीय प्रभावही असतो. फार थोडय़ा व्यक्तींना हा आजार नेहमीच्या वापरातील वस्तूंमुळेही होतो. उदाहरणार्थ, प्लास्टिक चप्पल, प्लास्टिकचा चष्मा, घडय़ाळ्याचा पट्टा, अंर्तवस्त्रांचे इलॅस्टिक इत्यादी. अशा परिस्थितीत या वस्तूंचा जिथे संपर्क होतो त्याच ठिकाणी हा आजार होतो. या वस्तूंमधील रासायनिक द्रव्यामुळे रंगपेशींना इजा होते आणि त्या नष्ट होतात.

घाबरू नका!

कोड आलेल्या व्यक्तीने घाबरून जाऊ नये आणि उदास होऊ नये. कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये. मनाचा आणि रंगपेशींचा जवळचा संबंध असतो. संयम बाळगून उपचारामध्ये सातत्य ठेवावे. तसेच समाजानेही या व्यक्तींना इतरांप्रमाणेच वागणूक द्यावी. भेदभाव करू नये. हा आजार संसर्गजन्य नाही हे लक्षात ठेवावे.

  उपाय

*  या आजारात उपाय करताना त्या व्यक्तीचे वय, कोडाचा कालावधी, व्याप्ती, व्यक्तीला असलेले इतर आजार, त्याची औषधे याचाही विचार करावा लागतो. तसेच तो भरभर वाढतो, हळूहळू वाढतो की पूर्णपणे वाढ थांबली आहे हे पाहणे गरजेचे असते. कोड अधिक वाढत असल्यास काही कालावधीसाठी स्टिरॉईड किंवा संरक्षण शक्ती नियंत्रणात ठेवण्याची औषधे देण्याचीही आवश्यकता भासू शकते. अन्यथा मलम, जीवनसत्त्व, अ‍ॅण्टीऑक्सिडंट यांचाही चांगला परिणाम होतो. रंगपेशींना चालना देणारी काही औषधे तोंडावाटे घेऊन दर दोन तासांनी ऊन दिल्यासही चांगला परिणाम होतो.

*  अल्ट्राव्हायलेट थेरपी – यात विशिष्ट अतिनील किरणांच्या उपचारांनी रंगपेशींना चालना मिळते आणि आजाराची वाढ थांबण्यास मदत होते. लेझर पद्धतीनेही परिणाम दिसून येतो. हे उपचार आठवडय़ातून दोन-तीन वेळा घ्यावे लागतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*  ज्या व्यक्तींना कमी प्रमाणात किंवा ज्यांच्यामध्ये कोडची वाढ थांबली आहे अशांसाठी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. चांगल्या त्वचेचा पातळ पापुद्रा काढून त्यातल्या रंगपेशी प्रयोगशाळेत वेगळ्या केल्या जातात. जिथे कोडाचा डाग आहे तेथील बाह्य़ त्वचा लेझरच्या साहाय्याने काढून तिथे या रंगांच्या पेशीचे द्रावण सोडले जाते. त्यानंतर काही महिन्यांनी तिथे रंगद्रव्य तयार होऊन त्वचा पूर्ववत होते.