|| अनिल भागवत

लहान मुलांशी बोलताना घराघरांत बोलली जाणारी काही लोकप्रिय वाक्यं सांगतो. – ‘एकदा सांगून कळत नाही का?’, ‘डोळे फुटले का?’, ‘बहिरा झालास का?’, ‘आत्ताच तू काय कबूल केलंस? मग हे काय चाललंय?’, ‘तिथे ठोंब्यासारखा नुसता बसू नकोस.’, ‘धावत जाऊन पळत ये.’, ‘मला चार घासही सुखाने खाऊ देत नाहीत कारटी.’, ‘तू वेडय़ासारखी वागतेस. आता काही जेवायबिवायला मिळणार नाही.’, ‘हातातून एखादी वस्तू पडली की ‘जेवलास का नाही?’ तुमचं घर यात अपवाद असलं तर फारच आनंद आहे. प्रत्यक्षात आपल्या मुलांवर आईवडिलांचं खूप प्रेम असतं. मुलांच्या भवितव्याविषयी त्यांना मनापासून काळजी वाटते. हेतू उत्तम असूनही तोंडात असे शब्द असू शकतात. त्याशिवायदेखील काय काय घडू शकतं ते पाहायला हवं.

मोठी माणसं आणि मुलं यांच्या शरीरात बराच फरक असला तरी भावनांच्यात आपल्याला वाटतं त्यापेक्षा फार कमी फरक असतो. आनंद, दु:ख, राग, निराशा, मत्सर, वैताग अशा भावना आपल्याला असतात तशाच मुलांनाही असतात. मुलांच्या भावनांची तीव्रता जास्त असते, पण शब्दसामथ्र्य कमी असतं म्हणून ते आदळ-आपट, रडणं, हातपाय आपटणं, विध्वंस करणं, मारणं वगैरे पद्धतींने भावना व्यक्त करतात. याबाबतीत मुलांबद्दल इंग्लिशमधलं एक महत्त्वाचं वाक्य समजून घेण्याजोगं आहे. ‘इफ यू लिसन टू देअर नॉनसेन्स, दे विल लिसन टू युवर सेन्स.’ एखादं मूल जेव्हा बिघडतं तेव्हा ते आईवडिलांच्या दृष्टीने बिघडलेलं असतं, कारण आईवडिलांनी बिघडणं म्हणजे काय याची व्याख्या ठरवलेली असते. त्याच्या मुळाशी काय आहे हे बघितलं तर मुलांनी आयुष्यात यश मिळवावं म्हणून सगळी धडपड चालू असते. यश म्हणजे तीन घटकांवर अवलंबून असलेली गोष्ट असते. एक म्हणजे उपजत गुण. तुमच्या पूर्वजांच्या काही पिढय़ांपासून चांगले-वाईट सगळे गुण मुलांपर्यंत पोहोचू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे मेहनत. मेहनत मुलाने घेतलेली आणि योग्य वाढीसाठी पालकांनी केलेली आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलाचं नशीब. ज्या मेहनतीबद्दल आपण बोलतो आहोत ती एकच गोष्ट खरं म्हणजे आपल्या हातात आहे. आपले संस्कार म्हणजे त्यासंबंधीचे विचार. त्याशिवाय मुलावर शाळा, मित्रमंडळी असे इतरांचेही संस्कार होणार आहेतच.

बहुतेक लोकांनी ‘संस्कार’ शब्दाचा अर्थ हिंदू धर्मात सांगितलेल्या परंपरा पाळणं म्हणजे संस्कार असा घेतलेला आढळतो. प्रत्यक्षात दुसऱ्याचा विचार करण्याचं शिक्षण हा त्याचा खरा अर्थ असतो. पालकांना तसं प्रत्यक्षच वागावं लागतं. महत्त्वाची गोष्ट अशी की, लहान मुलं म्हणजे अखंड चालू असलेला ‘व्हिडीओ कॅमेरा’ असतो. त्या ‘रेकॉर्डिग’चा वापर मात्र ती मुलं नंतर आयुष्यात केव्हाही करतात. केव्हा तरी मुलाकडून काही तरी अनपेक्षित आपण ऐकतो आणि लक्षात येतं की, अनेक वर्षांपूर्वी तयार झालेली ती ‘व्हिडीओ कॅसेट’ आता लागलीय.

एक निराळा मुद्दा मांडतो. व्यायाम, खेळ ही गोष्ट आयुष्यभर करण्याची आहे, टेलिव्हिजनवर खेळ बघण्याची नाही, हे पटणाऱ्या लोकांची संख्या कमी असते. मग मुलांवर संस्कार होणार ते फक्त टी.व्ही., लॅपटॉप, मोबाइलवरच्या खेळाचे; मैदानावर स्वत: खेळण्याचे-मेहनतीचे नाहीत. टी.व्ही. आणि मोबाइल या दोन्हीच्या व्यसनांमध्ये मुलं गुरफटतात, अशी अनेकांची तक्रार असते. टीव्हीमुळे डोळ्यांवर आणि मुख्य म्हणजे विचारशक्तीवर, थोडक्यात मेंदूवर परिणाम होतो. मोबाइल त्याच्या छोटय़ा आकारामुळे घराबाहेरही वापरता येतो. त्यामुळे त्याचा वापर तर अमर्याद होऊ शकतो. जी मुलं ‘बालभवन’सारख्या एखाद्या ठिकाणी रोज जाऊन काही तरी खेळ खेळतात त्यांना टीव्ही आणि मोबाइल या गोष्टींचं एवढं आकर्षणच वाटत नाही. खेळांचे अनेक प्रकार असतातच; पण ज्या खेळामध्ये संपूर्ण शरीर आणि बुद्धी यांचा जास्तीत जास्त वापर होईल तो खेळ सर्वात चांगला.

पालक शाळेत छंदाविषयीही बोलणं होतं. खेळ, छंद या दोन्हीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही मिनिटं, क्षण सगळ्या काळज्या विसरणं माणसाला शक्य होतं. टीव्ही आणि मोबाइल या दोन्हीचा मी व्यसनं असा उल्लेख केला. खरं असं आहे, की कुठचीही गोष्ट पाहिजेच आणि ती नाही मिळाली तर शारीरिक क्रिया अडतात म्हटलं की ते व्यसनच म्हणावं लागतं.

आणखी एक विषय. मूल जसं मोठं होत जातं तशी त्याची पैसे या महत्त्वाच्या गोष्टीची समज वाढत गेली पाहिजे ही पालकांची जबाबदारीच आहे. मुलं ४-५ वर्षांची झाली की, महिन्याच्या मिळकत-खर्च-बचत याची चर्चा त्यांच्यादेखत व्हायला पाहिजे. सुरुवातीला मुलं एक-दोन र्वष नुसती ऐकतील. ७-८ वर्षांच्या आसपास प्रश्न विचारायला लागतील. पुढे ९-१० वर्षांची झाली की एखाद्या मुद्दय़ाबद्दल थोडंसं बोलायला लागतील. १०-१२ वर्षांची झाली की एखादी उपयोगी कल्पना मांडतील. १२-१४ वर्षांची मुलं तर हे मिळकत – खर्च – बचत यांचे तक्ते हौसेने लिहून काढतील.

पालकांचा आणखी एक काळजीचा विषय सांगतो. लहान मुलांना दिसेल ती वस्तू उघडून, तोडून-मोडून बघायची असते. कुठचंही ‘नॉर्मल’ मूल हे करणारच. कारण मूल ‘क्रिएटिव्ह’ असतं. त्याला निर्मिती करायला आवडते. तयार खेळणी आवडत नाहीत. आपल्या मुलाने भविष्यात स्वतंत्र व्हावं यासाठी खूप विचार आणि नियोजन करावं लागतं. आजी-आजोबा आणि मुलांचे पालक यांची अशा विषयांवर तपशीलवार चर्चा हवी. सगळ्यांनी ‘आपकमाई’ आणि ‘बापकमाई’ यातला फरक समजावून घ्यायला लागतो.

मुलांना स्वच्छतेचं शिक्षण देणं हाही पालकांपुढे प्रश्न असतो. दात घासणं, आंघोळीला कंटाळा करणं यावरून वाद असतो. संडासातून बाहेर आल्यावर, घराबाहेरून आल्यावर साबणाने हात स्वच्छ करणं हे मूल ऐकत नाही. याउलट उदाहरणंही आहेत. साबण, शांपू यांचा वेड लागल्यासारखा वापर करणारी मोठी माणसं आणि त्यांचं अनुकरण करणारी त्यांची मुलंही आहेत. एवढी रसायनं वापरून त्वचेला खूप नुकसान पोचतं. या सगळ्याचा समतोल पालकांना स्वत:ला पाळावा लागतो आणि मुलांना शिकवावा लागतो.

या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी प्रेमाने, समजुतीने करता येतात हे नक्की, पण बहुतेक पालकांना तेवढा संयम नसतो. त्याचा परिणाम म्हणजे रागवारागवी, धमक्या, मार, शिक्षेचे अनेक प्रकार. शिक्षेचे ‘क्रिएटिव्ह’ प्रकार वापरण्यात आया जास्त पुढे असतात. दुसऱ्यांच्या देखत बोलून आई आणि वडील दोघंही अपमान करतात. ‘जेवायला मिळणार नाही’, ‘जिन्यात जाऊन उभा राहा’, घराबाहेर उभं करून दार बंद करून घेणं, मोरीत कोंडणं हे आया जास्त करतात. अबोलासुद्धा आयांचीच मक्तेदारी आहे. पुरुष ‘गिफ्ट नाही, नवीन कपडे नाहीत’, असा पैशांच्या हत्याराचा उपयोग करतात.

पालकांना दोन टोकं समजतात. एक म्हणजे खूप, अवास्तव लाड, कौतुक आणि दुसरं म्हणजे अपमान, राग, मारपीट. या दोन्ही गोष्टी टाळण्याची समज म्हणजेच पालकत्वाचं शिक्षण.

आणखी एकच प्रश्न म्हणजे वेळ. वेळ त्यांच्याकडे नाही. शिक्षा करण्यासाठीसुद्धा वेळ द्यावा लागतो. दुर्लक्ष करण्यासाठी फक्त वेळ द्यावा लागत नाही. इच्छा असते ‘क्वालिटी टाइम’ देण्याची; पण मुलांना तेवढं पुरत नाही. त्यांना ‘क्वांटिटी’ लागतेच.

या गोष्टींना जो वेळ लागतो, तेवढाही काढता न आल्याच्या अपराधीपणामुळे अनेक आईवडील मुलांचा वाढदिवस प्रचंड मोठय़ा प्रमाणात साजरा करतात. कधीकधी आईवडील दोघांनाही वेळ नसतो. मग ‘फूड चेन्स’ संपूर्ण ‘इव्हेंट अ‍ॅरेंज’ करतात. ‘गिफ्ट, रिटर्न गिफ्ट्स’ सगळ्यासकट तयारी करतात. त्या सगळ्याची मजबूत पैशाची मागणी असते ती आईवडिलांना सगळ्यात सोपी वाटते आणि त्यातही वडिलांचा तर आग्रहच असतो की, आपण वाढदिवस ‘आऊटसोर्स’ करू या.

या देखाव्यामुळे खरा प्रश्न मला पुढे दिसतोय. सध्याची लहान मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या आईवडिलांशी कशी वागतील?

hianildada@gmail.com

chaturang@expressindia.com