महेश सरलष्कर

मतदानोत्तर कलचाचण्यांचे अंदाज बिहारमध्ये सत्तांतराची चाहूल देत आहेत. १५ वर्षांच्या एकछत्री कारभारानंतर होणाऱ्या संभाव्य बदलाची उत्सुकता वाढते आहे. हा बदल महाआघाडीच्या रूपात असेल की भाजपच्या वाढत्या वर्चस्वात असेल, याचे चित्र उद्या निकालातून स्पष्ट होईल..

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या, मंगळवारी लागतील. भाजपचे खरे सर्वेसर्वा गृहमंत्री अमित शहा वगळले, तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महासचिव भूपेंदर यादव, मोदींच्या दौऱ्याच्या व्यवस्थापनासाठी देवेंद्र फडणवीस, बिहारमधून आलेले केंद्रातील मंत्री नित्यानंद राय, रवीशंकर प्रसाद असा मोठा फौजफाटा भाजपने बिहारमध्ये निवडणुकीसाठी उतरवलेला होता. पण दाखवले जात होते वेगळेच. ही निवडणूक भाजपसाठी दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे, त्यासाठी ‘चाणक्यनीती’ने खेळ खेळला जात आहे. पूर्ण क्षमतेने भाजप या निवडणुकीत उतरलेला नाही. भाजपला फक्त मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या वर्चस्वाला धक्का लावायचा आहे अशी चर्चा घडवून आणली जात होती. भाजपला फारसे यश मिळाले नाही तर त्याची कारणमीमांसाही तयार होती. पण सत्तेच्या राजकारणात सत्ता टिकवण्याला अधिक प्राधान्य असते. हातात असलेली सत्ता गमावल्यावर, हा पराभव आगामी काळातील डावपेचाचा भाग होता असे विश्लेषण कोणताही राजकीय पक्ष करत नसतो. त्यामुळे भाजपसाठी बिहारची विधानसभा निवडणूक अन्य राज्यांइतकीच (आगामी पश्चिम बंगाल इतकीच) महत्त्वाची होती. एका मुरलेल्या, अस्सल बिहारी पत्रकाराने अगदी हात आखडता घेऊन काढलेल्या अंदाजानुसार, राजद ८०, काँग्रेस ३०, डावे १५;  म्हणजे महाआघाडीला १२५ जागा मिळू शकतील. आघाडी बहुमताचा आकडा पार करू शकेल. भाजप ६५, जनता दल (सं) ४०, लोकजनशक्ती ५ आणि बसप-अन्य वगैरे ७ असे वाटप होईल. म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) १०५ जागा मिळतील. तिसऱ्या टप्प्यांतील मतदान संपल्यानंतर शनिवारी प्रसिद्ध झालेल्या मतदानोत्तर कलचाचण्या कमी-अधिक प्रमाणात हाच अंदाज मांडतात. या कलचाचण्यांनी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्या महाआघाडीला तुलनेत जास्त जागा दिल्या आहेत. काही चाचण्यांनी महाआघाडीला दोनतृतीयांश बहुमताचा कल दाखवला आहे. मतदानोत्तर चाचण्यांतील अंदाज तंतोतंत खरे होतात असे नाही, पण ते कल स्पष्ट करतात. प्रत्यक्ष निकालात महाआघाडीने खरोखर बहुमताचा आकडा पार केला वा तिथपर्यंत मजल मारली तर, हा निव्वळ सत्ताधारी जनता दलाचाच (संयुक्त) नव्हे, तर मित्रपक्ष भाजपचाही पराभव ठरतो.

मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजानुसार, भाजपच्या जागा वाढतील आणि नितीशकुमार यांच्या जनता दलाच्या (सं) जागांमध्ये घट होईल. प्रचारसभेत मोदी-नड्डांपासून सगळ्या भाजप नेत्यांनी बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होण्याची शक्यता व्यक्त केली होती. पण ही बाब अधोरेखित करताना मुख्यमंत्री मात्र नितीश असतील हेही ते सातत्याने सांगत होते. त्याचा अप्रत्यक्ष अर्थ होता की, जनता दलाच्या तुलनेत भाजपच्या जागा जास्त असतील आणि तरीही भाजप नितीश यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देऊ करेल. पण ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी एनडीएला सत्ता स्थापण्याइतपत जागा मिळवाव्या लागतील. मतदानोत्तर अंदाजानुसार, भाजपची कमाल मजल ७०-७५ जागांपर्यंत जाईल. जनता दलाच्या वाटय़ाला ४०-४५ जागा मिळाल्या तर, बिहारमध्ये एनडीएचे सरकार पुन्हा स्थापन होईल. पण मतदानोत्तर कलचाचण्यांनी सढळ हाताने देऊ केलेल्या या कमाल जागा आहेत. बिहार निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यांत भाजप आणि जनता दलातील विसंवाद चव्हाटय़ावर आला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी नागरिकत्वाचा मुद्दा काढून ‘घुसखोरां’ना बाहेर काढण्याची भाषा केली होती. डिवचल्या गेलेल्या नितीशकुमार यांनी- कोण बाहेर काढतेय बघू, असे म्हणत योगींना ठणकावले होते. भाजपने लोकजनशक्ती पक्षाला बिहारमधील एनडीएतून बाहेर पडायला लावून मतदारांमध्ये गोंधळ निर्माण केला. परिणामी एनडीएतील दोन्ही घटक पक्ष एकमेकांच्या जागांवर किती ‘प्रभाव’ टाकतात यावर आता एनडीएचे बलाबल ठरणार आहे आणि ते मतदानोत्तर कलचाचण्यांमधून भाजप व जनता दलाला मिळू शकणाऱ्या किमान जागांच्या अंदाजावरून दिसते. मग एनडीएला बहुमतासाठी निकालोत्तर कसरत करावी लागेल. या चाचण्यांनी महाआघाडीला झुकते माप दिले असले तरी भाजप-जनता दलाला सत्ता स्थापनेची संधी मिळणारच नाही असे नाही, अशी किंचितशी का होईना आडवाट मतदानोत्तर अंदाजांतील आकडय़ांनी देऊ केली आहे.

मतदानोत्तर अंदाजांतील बदलाचे वारे खरे ठरले तर बिहारला तेजस्वी यादव हे तरुण मुख्यमंत्री मिळतील. त्यांनी केलेल्या झंझावाती प्रचाराला मतदारांनी दिलेली ही पावती असेल. नितीशकुमार यांनी प्रचार करताना मतदारांना बिहारच्या १५ वर्षांपूर्वीच्या जंगलराजची भीती दाखवली. १९९०-२००५ या १५ वर्षांत बिहारमध्ये अराजक माजले तसे पुन्हा होऊ नये यासाठी जनता दलाला संधी देण्याचे आर्जव त्यांनी केले. तर मोदींनी काश्मीरपासून बिहारी अस्मितेपर्यंत अनेक मुद्दे उपस्थित केले. पण अखेरच्या टप्प्यांत प्रचाराचा जोर राहिला, तो कोण किती रोजगारनिर्मिती करणार, त्यासाठी कोणत्या आघाडीकडे क्षमता आहे, यावरच! महाआघाडीला बहुमत मिळाले तर रोजगाराच्या मुद्दय़ाची चर्चा होईल. तरुणांनी रोजगाराच्या अपेक्षेने जातीचा मुद्दा बाजूला ठेवून राजदला मते दिली का, नितीशकुमार यांचे अतिमागास-अतिदलित हे हक्काचे मतदारदेखील त्यांना सोडून गेले का, याचेही विश्लेषण केले जाईल. २०१७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या आणि २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने प्रचंड विजय मिळवला होता. त्याचे श्रेय भाजप केंद्राने राबवलेल्या योजनांना देतो. योजना लोकांपर्यंत पोहोचल्या, त्याला मतदारांनी प्रतिसाद दिल्याचा दावा केला जातो. या निवडणुकीत मतदारांनी जातीच्या गणितांपलीकडे जाऊन भाजपला मते दिली असे मानले जात आहे. केंद्राच्या सगळ्याच योजना सगळ्या लाभार्थीपर्यंत पोहोचल्या असे नव्हे. पण या योजना आपल्यापर्यंत पोहोचू शकतात ही आशा मतदारांमध्ये निर्माण झाली होती आणि तीच सप-बसप यांच्या जातीच्या गणितावर मात करून गेली. मतदानोत्तर अंदाज तेजस्वी यादव यांना आशा दाखवणारे आहेत. बिहारमध्ये महाआघाडीचा विजय झाला तर तो लोकांनी तेजस्वी यादव यांच्या आश्वासनांना दिलेला प्रतिसाद असू शकतो. १५ वर्षांपूर्वी संपुष्टात आलेले लालूराज तरुण मतदारांनी पाहिलेले नाही. त्यांना तेजस्वी यादव हे आशा-आकांक्षांची पूर्ती करू शकणारे नेते वाटले तर ते जातींच्या पलीकडे जाऊन महाआघाडीच्या पारडय़ात मते देतील व सत्तेसाठी कौल देऊ शकतील. म्हणून बिहारमध्ये सत्ताबदलाची उत्सुकता अधिक आहे.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशात पक्षाच्या ताकदीपेक्षा राजद व जनता दलाचा वाटा अधिक होता. या वेळीही काँग्रेस जिंकू शकणाऱ्या जागांचे श्रेय राजदला द्यावे लागेल. महाआघाडीची सत्ता आली तर काँग्रेसला त्यात वाटाही मिळेल. पण बिहारमध्ये पक्षाच्या वतीने फक्त राहुल गांधी यांनी प्रचार केला. काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस असेल तर त्या यशाचे श्रेय राहुल गांधी यांना दिले जाऊ शकते. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका होणार असून नव्या आणि जुन्या नेत्यांच्या संघर्षांत बिहारमधील काँग्रेसचे हे किंचित यशदेखील गांधी निष्ठावानांसाठी मोठे ठरू शकेल. जानेवारीपर्यंत राहुल गांधी पक्षाध्यक्ष होतील असे मानले जाते. तमिळनाडू, केरळ या दक्षिणेकडील राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून लोकसभेचे सदस्य बनले आहेत. बिहारच्या निवडणुकीत राजद व काँग्रेस यांच्यासह भाकप, माकप व भाकप-माले हे डावे पक्षही महाआघाडीत सहभागी झाले होते. पुढील सहा महिन्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असून माकप-काँग्रेस आघाडी भाजप व तृणमूल काँग्रेस यांच्या विरोधात लढू शकेल. पश्चिम बंगालसाठीही भाजपचे दीर्घकालीन राजकीय गुंतवणुकीचे नियोजन आहे. बिहारमधील निकालाचे पडसाद पश्चिम बंगालमध्ये उमटतात का, हे पाहायचे.

mahesh.sarlashkar@expressindia.com