महेश सरलष्कर

महाराष्ट्राचा डाव हातून निसटलाच कसा, याचे आकलन भाजपला अजूनही करता आलेले नाही. फाजील आत्मविश्वासात गर्क झालेल्या भाजपला शिवसेनेने बेसावध पकडले. त्यातून भाजपची तडफड होताना दिसते..

दिल्लीची हवा खराबच; आता तर ती इतकी धूसर झाली आहे की, दोन फुटांवरचे दिसणे मुश्कील. पण राजधानीत दिसणे-न दिसणे निव्वळ हवेबद्दल मर्यादित नसतेच. सत्तेच्या राजकारणातील हवादेखील अचानक कधी धूसर होऊन जाते, हे कळत नाही. त्याप्रमाणेच केंद्रात मांड ठोकून बसलेल्या भाजपला डोळ्यांसमोर अंधारी कधी आली, हे समजलेही नाही. डोके आपटून सावरेपर्यंत डाव हातातून निसटून गेलेला होता. महाराष्ट्राने भाजपला पुरती अद्दल घडवली! भाजपसाठी प्रश्न केवळ महाराष्ट्राचा कधीच नव्हता. त्यांच्यासाठी म्हातारी मेल्याचे दु:ख नव्हते, काळ सोकावेल याची भीती होती.. आणि ती खरी ठरू लागली आहे.

महाराष्ट्रात भाजपला बहुमत मिळण्याची खात्री होती. बहुमत मिळाले तर शिवसेनेशिवायही सरकार बनवता येऊ शकते; मग शिवसेनेची आणखी कोंडी करता येईल, हा भाजपचा मनसुबा होता. प्रादेशिक पक्षांना संपवत स्वत:ची ताकद वाढवत नेण्याचे धोरण भाजपने कित्येक वर्षांपासून अवलंबलेले आहे. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेशी भाजपचे पटलेले नाही. भाजपसाठी शिवसेना ही अवघड जागेचे दुखणे होऊन बसलेले होते. शिवसेनेने भाजपचा इतका पाणउतारा केला, तरी लोकसभेत नाइलाजाने भाजपने शिवसेनेला सहन केले. त्याचा वचपा काढण्याची नामी संधी विधानसभा निवडणुकीत मिळेल, असे भाजपला वाटले होते. मतदारांनी भाजपच्या बाजूने पूर्ण कौल दिला असता, तर शिवसेनेची राजकीय वजाबाकी ठरलेलीच होती. पण भाजपच्या दिल्लीतील चाणक्यांना मतदारांनी मराठी बाणा दाखवून दिला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्याबरोबर काँग्रेसच्याही झोळीत मते टाकून भाजपच्या आशा-आकांक्षांचा बोजवारा उडवून दिला. मग पहिली संधी मिळताच शिवसेनेने धनुष्यातून बाण सोडला. हे धाडस शिवसेना करेल याची यत्किंचितही शक्यता दिल्लीतील भाजपच्या वजिराला आली नाही. शिवसेनेचा बाण वजिरासाठी आश्चर्याचा धक्का होता. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची नव्हे, ही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे; मग इतका आक्रमकपणा आला कुठून, हे समजणे वजिराच्या आवाक्याबाहेरच होते. भाजपने शिवसेनेला खिंडीत गाठायचे होते, तर नेमके उलटेच झाले. दिल्लीतील राजकीय हवा धूसर झाली ती अशी. म्हणूनच वजिराने कित्येक दिवस मौन बाळगणेच पसंत केले.

खरे तर भाजपला स्वत:चाच संताप आलेला आहे. महाराष्ट्राचा डाव आपल्या हातून निसटलाच कसा, याचे आकलन अजूनही करता आलेले नाही. फाजील आत्मविश्वासात गर्क झालेल्या भाजपला शिवसेनेने बेसावध पकडले. त्यातून भाजपची तडफड होताना दिसते. इतकी वर्षे शिवसेनेने भाजपचा अपमान केला, भाजपने तो निमूट सहन केला. पण आता शिवसेना पूर्वीची राहिलेली नाही. त्यांच्या जागा कमी होत गेल्या आहेत. युतीत जास्त जागा भाजपच्या असतील तर त्यांनाच मुख्यमंत्री पद मिळणार, यात भाजपने शिवसेनेशी धोका कुठे केला, असा युक्तिवाद भाजपकडून केला गेला आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पक्षप्रमुखांच्या आदेशावरून राजीनामा देण्याचे धाडस केले. खरे तर सावंत यांनी राजीनामा दिला तेव्हा शिवसेनेच्या हातात काहीच नव्हते. सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वा काँग्रेसने पाठिंबा दिलेला नव्हता. आत्ताही दिलेला नाही. तरीही शिवसेनेने केंद्रातील एकमेव मंत्री पद सोडून दिले. हा शिवसेनेने विस्तवाशी केलेला खेळ आहे; पण त्यात भाजपचे नुकसान अटळ आहे!

दिल्लीत सत्तेच्या दरबारातील एखाद्या कर्मचाऱ्याचे मत जाणून घेतले, की राजकीय वारे कुठे चालले आहे, याचा अंदाज येतो. या मंडळींना एकच कोडे पडलेले आहे, की वजिराच्या हातातून महाराष्ट्र निसटलाच कसा? या मंडळींच्या बोलण्यातील अध्याहृत प्रश्न होता- वजिराला महाराष्ट्रात लोकांना वाकवणे का जमले नाही? वजिराने हा प्रयत्न विधानसभा निवडणुकीआधीच करून पाहिला होता, तो पुरता अंगाशी आला. सक्तवसुली संचालनालया (ईडी)च्या दंडुक्याची भीती शरद पवारांनी मोडून काढली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांमध्ये बोलणी सुरू असताना ईडीमार्फत मीठ पेरण्याचा खटाटोप केल्याचे बोलले जात असले, तरी त्याचा परिणाम अजून तरी दिसलेला नाही. शिवाय भाजपला जेमतेम १०५ जागा मिळाल्यामुळे फोडाफोडीचे राजकारण करूनही फारसा लाभ झाला असता, असे भाजपलाच वाटले नाही. म्हणूनच शिवसेनेशिवाय सरकार बनवणार नाही, असा ‘बाणेदार’पणा भाजपने दाखवला. पाच वर्षे त्रास देणाऱ्या शिवसेनेला अद्दल घडवायची होती, ते न जमल्याने आता ‘मित्रपक्षा’ने पाठीत सुरा खुपसल्याचा आरोप केला गेला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी- गोपनीय बैठकीत काय झाले हे उघड करायचे नसते, असा नैतिक मुद्दा उपस्थित करून शिवसेनेला पेचात टाकले ते तेवढय़ाचसाठी!

एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजपने घटक पक्षांना सहभागी करून घेतले असले, तरी ते फणा उगारणार नाहीत याबाबत भाजप दक्ष असतो. पण शिवसेनेने डंख मारला आहे. या डंखाचे विष इतर राज्यांमध्ये पसरेल याची काळजी भाजपला वाटू लागली आहे. झारखंडमध्ये ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनने भाजपशी युती न करण्याचा निर्णय घेतला असून आघाडी न करताच विधानसभा निवडणूक लढवणार आहे. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानेही झारखंडमध्ये भाजपशी काडीमोड घेतला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्याशी असलेले संबंध ही भाजपसाठी तारेवरची कसरतच राहिली आहे. महाराष्ट्रातील घडामोडींकडे नितीश कुमार यांच्यासारखा चाणाक्ष राजकारणी लक्ष ठेवून आहे. झारखंडमध्ये जनता दल (सं) स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे. त्यामुळे झारखंडमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी अस्तित्वातच राहिलेली नाही. दिल्लीत चार महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. इथे भाजप स्वतंत्र लढत असला, तरी महाराष्ट्राने प्रादेशिक पक्षांना भाजपविरोधात लढण्याचे हत्तीएवढे बळ दिलेले आहे. हरियाणात भाजपला बहुमत मिळाले नसल्याने नाइलाजाने घटक पक्षाला उपमुख्यमंत्री पद द्यावे लागले. घटक पक्षांनी उचल खाल्ली तर भाजपला नमते घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे भाजपला आगामी विधानसभा निवडणुका सोप्या राहिलेल्या नाहीत. हरियाणात मनोहरलाल खट्टर यांच्या आघाडी सरकारचा विस्तार झाला; पण भाजपचा एकही मोठा नेता शपथविधीला उपस्थित नव्हता. त्यावरूनच भाजपची सद्य मनोवस्था समजू शकते. साम-दाम-दंड-भेद या सर्व अस्त्रांचा वापर भाजपने विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केला. आत्तापर्यंत ही अस्त्रे प्रभावी ठरली होती. त्यांनी योग्य राजकीय परिणाम घडवून आणले होते. पण महाराष्ट्राने ही सगळीच अस्त्रे निष्प्रभ ठरवली. वजिराच्या रणनीतीला बसलेला हा मोठा फटका आहे. राज्यांतील सत्तेवरील पकड सैल होते की काय, अशी पाल वजिराच्या मनात चुकचुकली तर नवल नाही.

निव्वळ बोलभांडपणा करून सरकार स्थापन करता येत नसते, हे शिवसेनेला अखेर उमजले आहे. त्यामुळे शिवसेनेने रीतसर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी बोलणी केलेली पाहायला मिळाली. आता दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठीनंतर संभाव्य बिगरभाजप सरकारबाबतचे चित्र स्पष्ट होईल. भाजपला सत्तेवरून खाली खेचणारे पर्यायी सरकार स्थापन झाले, तर ते अपयशी ठरण्याची भाजपला वाट पाहावी लागेल. पर्यायी सरकार अपयशी ठरेल याचा भाजपला ठाम विश्वास आहे. पण समजा, पर्यायी सरकार ठीकठाक चालले, तर भाजपला विचारमंथनासाठी बराच वेळ मिळू शकेल. त्यात चुकांची कबुली द्यावी लागेल. आयारामांच्या ताकदीवर भरवसा न ठेवता पक्षातील कार्यकर्त्यांना-नेत्यांना अधिक महत्त्व द्यावे लागेल. तिकीटवाटपात वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवावे लागतील. दुसऱ्याचा पॅटर्न संपवण्याआधी स्वत:चा पॅटर्न निर्माण करावा लागेल. लोकांना भेटावे लागेल. लोकांचे प्रश्न रस्त्यावर उतरून जाणून घ्यावे लागतील. पण त्याआधी शिवसेनेने दिलेल्या जबरदस्त मानसिक धक्क्यातून भाजपला बाहेर यावे लागेल. आत्ता तरी भाजप महाराष्ट्र गमावल्याची खंत करत आहे. वजिराच्या मौनावरून तरी भाजप अजून त्यातून सावरला असल्याचे दिसत नाही.

mahesh.sarlashkar@expressindia.com