पर्यावरण आणि साहित्य यांच्या परस्परसंबंधांवर भाष्य करणारे विपुल लेखन इंग्रजी व पाश्चात्त्य वैचारिक जगतात झाले आहे व होत आहे. परंतु मराठीत समीक्षक रा. ग. जाधव यांच्यासारख्या काही मोजक्या समीक्षक-विचारकांचा अपवाद सोडल्यास याविषयी फारसे लिखाण उपलब्ध नाही. पर्यावरणीय प्रश्न जागतिक स्तरावर महत्त्वाचे ठरत असताना मराठी समीक्षेतील ही लेखनउणीव खटकणारीच आहे. या पाश्र्वभूमीवर ‘मराठी कादंबरी- सृष्टी आणि दृष्टी’ हे डॉ. सुहास पुजारी यांचे प्रबंधवजा पुस्तक ही उणीव काही प्रमाणात दूर करणारे आहे. पर्यावरण व समाज यांच्यातील परस्परसंबंध अनेकदृष्टय़ा परस्परांवर प्रभाव पाडत असतात, हे ध्यानात घेऊन या पुस्तकातील विषयाची मांडणी करण्यात आलेली आहे.

पहिल्या प्रकरणात लोकसंख्यावाढ, जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, जंगलतोड, जैवविविधतेचा ऱ्हास अशा पर्यावरणीय प्रश्नांचा आढावा घेऊन उर्वरित चार प्रकरणांमध्ये डॉ. पुजारी यांनी मराठी साहित्यातील पर्यावरणीय भानाचे स्वरूप सोदाहरण स्पष्ट केले आहे. यासाठी मुख्यत्वे कादंबरी या साहित्यप्रकाराचा विचार पुस्तकात करण्यात आला आहे. हे करताना डॉ. पुजारी यांनी १९६० ते २०१० या कालखंडातील मराठी कादंबऱ्यांचा पर्यावरणीय जाणिवेतून मागोवा घेतला आहे. पर्यावरणाविषयीचे भान या कादंबऱ्यांतून कशा प्रकारे व्यक्त झाले आहे, हे त्यांनी आपल्या विवेचनातून साधार स्पष्ट केले आहे. र. वा. दिघे, श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर यांच्या साहित्याविषयी या पुस्तकात विवेचन आले आहेच; याशिवाय भालचंद्र नेमाडे, अरुण साधू, मधुकर वाकोडे, पुरुषोत्तम बोरकर, आनंद यादव, सदानंद देशमुख, प्रवीण बांदेकर आदींच्या कादंबऱ्यांमध्येही पर्यावरणीय वास्तवास दिला गेलेला प्रतिसाद डॉ. पुजारी यांनी दाखवून दिला आहे.

पर्यावरण आणि साहित्य यांच्यातील परस्परसंबंधांविषयी जागतिक  स्तरावर होत असलेल्या मंथनापासून प्रस्तुत पुस्तक अलिप्त असले तरी मराठीत आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या विषयाचा वेध मात्र त्यात घेण्यात आलेला आहे. त्यामुळे साहित्याच्या अभ्यासकांना हे पुस्तक फार वेगळी दृष्टी देणारे नसले तरी या विषयाचा विचार करण्यास प्रवृत्त करणारे ते नक्कीच आहे.

‘मराठी कादंबरी- सृष्टी आणि दृष्टी’- डॉ. सुहास पुजारी,

सुविद्या प्रकाशन, पृष्ठे- १४२, मूल्य- १४० रुपये.