05 July 2020

News Flash

फेसबुकचा मुखवटा

कर्कपॅट्रिक हे जगप्रसिद्ध ‘फॉच्र्युन’ नियतकालिकाचे तंत्रज्ञानविषयक लेखक आहेत.

‘द फेसबुक इफेक्ट’- डेव्हिड कर्कपॅट्रिक,

फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्क हे आज आपल्या जगण्याचा भाग झाले आहेत. मात्र, हे बदल अनुभवताना आणि पारंपरिक वा नवी माध्यमं वापरताना आपण एक व्यक्ती व समुदाय म्हणून त्यांच्या परिणामांबाबत सजग असतोच असं नाही. माध्यमं अशी आंधळेपणानं वापरणं किती धोक्याचं आहे याची जाणीव आपल्याला अधूनमधून होते; पण ती तेवढय़ापुरतीच. ‘द फेसबुक इफेक्ट’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचं वाचन या पाश्र्वभूमीवर महत्त्वाचं ठरतं. डेव्हिड कर्कपॅट्रिक यांच्या मूळ पुस्तकाचा अनुवाद वर्षां वेलणकर यांनी केला आहे. मूळ पुस्तक २०१० मध्ये प्रसिद्ध झालं. त्यानंतरच्या सहा वर्षांत जग आणि फेसबुक आणखी बदललं आहे. ही मर्यादा ध्यानात घेतली तरीही फेसबुकसारख्या माध्यमाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी हे पुस्तक आपल्याला देतं.

कर्कपॅट्रिक हे जगप्रसिद्ध ‘फॉच्र्युन’ नियतकालिकाचे तंत्रज्ञानविषयक लेखक आहेत. मार्क झकरबर्गसह अनेकांच्या मुलाखती घेतल्यानंतर पत्रकारितेच्या शिस्तीनं फेसबुकचे अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी यात केला आहे. योग्य ठिकाणी संबंधितांची वक्तव्यं देत स्वतची निरीक्षणं आणि मतं ते तत्कालीन संदर्भात नोंदवतात. त्यांचा हा प्रयत्न स्तुत्य असला तरी ‘द फेसबुक इफेक्ट’ त्याच्या नावानुरूप फेसबुकच्या परिणामांची सखोल चिकित्सा करण्यात कमी पडतं. लेखकाचा मूळचा पिंड पत्रकाराचा असल्यानं वार्ताकन अधिक झालं आहे आणि त्यामानानं विश्लेषण अपुरं पडतं.

फेसबुक कसं सुरू झालं, मार्क व त्याच्या सहकाऱ्यांची त्यामागची भूमिका काय होती, या साध्या कल्पनेचं व्यवसायात रूपांतर कसं झालं, याचा तपशीलवार प्रवास लेखकानं रेखाटला आहे. त्याजोडीनं प्रत्यक्ष फेसबुक कसं विकसित होत गेलं आणि त्यातून मानवी संवादही कसा घडत किंवा बिघडत गेला, याची माहिती आणि तज्ज्ञांनी त्यावर केलेलं भाष्यही यात वाचायला मिळतं. मात्र, या दोन्हीची इतकी सरमिसळ झाली आहे, की माहिती वेगळी करून फेसबुकच्या परिणामांबाबतची सूत्रं वाचकालाच नेमकेपणानं हेरावी लागतात.

कोलंबियातल्या ऑस्कर मोराल्सच्या कथेनं पुस्तकाची सुरुवात होते. दहशतवाद्यांनी पळवून नेलेल्या एका मुलाच्या सुटकेसाठी त्यानं ‘वन मिलियन व्हॉइसेस अगेन्स्ट एफएआरसी’ असा ग्रुप फेसबुकवर बनवला. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. लाखोंच्या संख्येनं मोच्रे निघाले. त्यामुळे राज्यकर्त्यांवरचा दबाव वाढला आणि दहशतवाद्यांविरुद्ध ठोस कारवाई झाली. या पाश्र्वभूमीवर ‘फेसबुक हेच आमचं मुख्यालय होतं; वर्तमानपत्र होतं आणि आमची प्रयोगशाळाही होती,’ हे विधान वाचकांच्या मनात घुसतं. समाजमाध्यमांची अशी ताकद ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’, मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्तानं आपण अनुभवली. फेसबुकच्या वापरामध्ये विधायक गोष्टींबरोबरच घातक शक्यताही लपलेल्या आहेत. अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठाच्या वसतिगृहात फेसबुकची सुरुवात झाली. मार्क झकरबर्गनं संगणकशास्त्र शिकताना ‘कोर्समॅच’ नावाचं सॉफ्टवेअर विकसित केलं. मित्रमत्रिणींनी निवडलेल्या अभ्यासक्रमांच्या माहितीच्या आधारे स्वत: कुठले विषय निवडायचे, हे ठरवण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याची मदत होत होती. महाविद्यालयातल्या सर्वात ‘हॉट’ चेहऱ्याचा शोध घेणारं ‘फेसमॅश’ही मार्कनं बनवलं. त्यासाठी त्यानं विद्यापीठातल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती असलेल्या दस्तावेजातली- म्हणजे ‘फेसबुक’मधली छायाचित्रं विनापरवाना वापरली. त्यावर मोठी टीका झाली आणि मार्कची इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. मार्कच्या अशा उद्योगांतूनच पुढे ‘द फेसबुक’ सुरू झालं. फेसबुकची कल्पना व तंत्रज्ञान चोरल्याचे आरोपही मार्कवर झाले. पण पुढे तडजोडीतून हे खटले निकाली निघाले.

११ जानेवारी २००४ रोजी फक्त ३५ डॉलर भरून ‘द फेसबुक डॉट कॉम’ची नोंदणी झाली आणि ४ फेब्रुवारीला ते हार्वर्डमधल्या विद्यार्थ्यांसाठी खुलं झालं. त्याची विलक्षण वेगानं प्रगती झाली. पुढं ते सर्वासाठी खुलं झालं. त्याचं व्यावसायिक मूल्यांकनही अब्जावधी डॉलपर्यंत गेलं. हा प्रवास भारावून टाकणारा आहे. मात्र, एवढय़ावरच समाधान न मानता फेसबुकसारख्या नव्या माध्यमाच्या वाढीची कारणं आणि राजकीय अर्थशास्त्राच्या चौकटीत त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न अत्यावश्यक आहे.

फेसबुक हे प्राधान्यानं माहितीच्या देवाणघेवाणीचं, अभिव्यक्तीचं आणि मित्रांशी संवादाचं माध्यम आहे. ते कसं असावं यासंबंधी मार्क झकरबर्गच्या कल्पना स्पष्ट आहेत. प्रारंभीच्या मुलाखतींमध्ये मार्कनं त्याला फेसबुक हे व्यवसायात परिवíतत करण्यापेक्षा आनंद देणारी गोष्ट म्हणून जपणं महत्त्वाचं वाटतं, असं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात ती इंटरनेट क्षेत्रातली एक बडी कंपनी बनली. सुरुवातीला सव्‍‌र्हर आणि इतर खर्च भागवण्यासाठी व व्यवसायात गुंतवणूक मिळवण्यासाठी मार्क व त्याच्या सहकाऱ्यांना खूप धडपड करावी लागली. पण नंतर भांडवलदारच त्यांच्या पाठीशी लागले. नव्यानं उभारी घेत असलेली ही कंपनी विकत घेण्यासाठी वॉिशग्टन पोस्ट, व्हायकॉम, याहूसारख्या कंपन्या मागे लागल्या. गुगल व मायक्रोसॉफ्टचीही त्यासाठी स्पर्धा लागली. एक्सेल पार्टनर्स या फर्मनं भांडवली बाजारात फेसबुकचं सुरुवातीचं मूल्यांकन ९.८ कोटी डॉलपर्यंत केलं. काही वर्षांतच ते वाढत १५ अब्ज डॉलपर्यंत गेलं. ही माहिती वाचताना बडय़ा जाहिरातदारांना संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक महत्त्वाचं का वाटलं, आणि भांडवलदारही त्याच्यामागे का लागले, याची उत्तरं सापडतात.

फेसबुक सुरुवातीला फक्त विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित होतं. ते त्यांचा मित्रांमधला चेहरा बनलं होतं आणि त्यांच्या नित्यकर्माचाही भाग झालं होतं. त्याची वॉल म्हणजे सार्वजनिक फलकच झाला. नंतरच्या टप्प्यात विद्यार्थी, प्रौढ आणि सरतेशेवटी ‘फेसबुक सगळ्यांसाठी व सगळीकडे’ असा त्याचा प्रवास झाला. फोटो शेअिरग, टॅिगग, न्यूज-फीड आदी नव्या सुविधांमुळं त्याचं आकर्षण वाढत गेलं व त्याची सदस्यसंख्याही वेगानं वाढली. हे विद्यार्थी कोणासाठी तरी ग्राहक होते, हे लक्षात घेऊन लेखक म्हणतो, ‘कुठल्याही उत्पादकासाठी विद्यार्थीवर्ग हा सर्वात मोठा ग्राहक आहे. याच काळात आयुष्यावर प्रभाव पाडणाऱ्या सवयी जडतात आणि खरेदीसंदर्भातील सवयींचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो.’ शिवाय ते युझर साइटवर जो वेळ देत होते त्याची आकडेवारी भांडवलदारांना थक्क करणारी होती. तेव्हा अशा मोठय़ा ग्राहकवर्गाचं लक्ष वेधून घेण्यासाठी जाहिरातदारांचा फेसबुककडे ओढा वाढणं स्वाभाविक होतं. त्यांना ‘नेटवर्क इफेक्ट’चाही फायदा मिळाला. मात्र, जाहिरातदारांना खूश करताना वापरकर्त्यांच्या आनंदात बाधा येणार नाही असे प्रयोग व वेगळ्या पद्धतीने उत्पन्न मिळवण्याचे मार्ग मार्क व त्याच्या सहकाऱ्यांनी शोधले. ‘कॉस्ट पर थाऊजंड वू’, ‘कॉस्ट पर अ‍ॅक्विझिशन’ यांसारख्या गोष्टींचा त्यात समावेश होता. पण सर्वच गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे झाल्या नाहीत. उदा. ‘न्यूज-फीड’ला प्रारंभी मोठा विरोध झाला. तो प्रकट करण्यासाठी फेसबुकवरच मोठे ग्रुप स्थापन झाले. त्यांच्या दबावामुळे मार्कला माफी मागावी लागली आणि फेसबुक वापरणाऱ्यांचे खासगीपण जपण्यासाठीचं धोरण तातडीनं तयार करावं लागलं. तरीही फेसबुकवरील व्यक्तिगत माहितीची गोपनीयता हा सार्वकालिक चिंतेचा विषय आहे आणि भविष्यातही तो तसा राहण्याची शक्यता आहे. मार्क रोटनबर्ग या तज्ज्ञाने यासंदर्भात गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. तो म्हणतो, ‘युझरनं पुरवलेल्या माहितीचा काही भाग फेसबुक जाहिरातदारांना पुरवतं व त्यातून आíथक फायदा मिळवतं. आपल्या व्यक्तिगत माहितीचा कसा वापर केला जातो, याबाबत युझर मात्र अनभिज्ञ आहे.’

‘फेसबुक हे एक सामाजिक साधन आहे!’ यावर मार्कची अढळ श्रद्धा आहे. या माध्यमामधून आपण स्वतची एक डिजिटल ओळख निर्माण करतो आणि आपण जे काही करतो त्याचा एक डिजिटल ठसा तिथं राहतो. न्यूयॉर्कमधील एक तंत्रज्ञ जेफ पॅलर या सर्वाला ‘लाइफ ३.०’ म्हणतात. आपल्या ऑनलाइन व ऑफलाइन जगण्यातल्या सीमारेषा धूसर होताहेत. मात्र, या डिजिटल ओळखीवर व माहितीवर नियंत्रण कोणाचं, हा कळीचा मुद्दा अनुत्तरितच राहतो. यासंदर्भात लेखक म्हणतो की, ‘फेसबुकवरची कोणतीही माहिती गोपनीय नाही, हे वास्तव आहे. स्वतचं व्यक्तिमत्त्व फेसबुकसारख्या माध्यमातून उघड केल्यावर बेधडक वर्तन केलं वा मूर्खासारखे वागलात तर सार्वजनिक बदनामी अटळ आहे.’

लेखकानं नोंदवल्याप्रमाणे फेसबुक हे आजवरच्या इतिहासात सर्वात जास्त वापरलं जाणारं माध्यम आहे. ऑनलाइन असलेल्या प्रत्येक व्यक्तीची डिरेक्टरी बनण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे. ती अधोरेखित करताना लेखक म्हणतो, ‘जगातील सगळ्या ब्लॉगवरचे शब्द एकत्र केले तरीही फेसबुकच्या निव्वळ न्यूज-फीडमधल्या शब्दांची संख्या त्याच्या दहापट आहे.’ याचा स्पष्ट अर्थ असा की, मायकेल कोसिन्स्की यांनी उल्लेख केलेला ‘डेटाबॉम्ब’ आधीपासूनच अस्तित्वात आहे. या फेसबुक ग्राहकांचं चलनीकरण आधीच सुरू झालं आहे आणि ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्याच्या राजकीय वापराच्या शक्यताही स्पष्ट झाल्या आहेत. ‘डिजिटल लोकशाही’, ‘पब्लिक डिप्लोमसी २.०’ या संकल्पनांमधल्या विधायक शक्यता लक्षात घेतल्या तरीही फेसबुकसारख्या माध्यमांवर उपलब्ध प्रचंड माहितीच्या- ‘डेटाबॉम्ब’च्या गरवापराच्या निव्वळ कल्पनेनंही अंगावर काटा येतो. हा धोका किती आहे? पुस्तकातलाच एक उतारा पुरेसा आहे..

‘आपण दिलेल्या माहितीतून तयार झालेल्या डेटाच्या संरक्षणासाठी व इतरांपासून त्याला धोका पोहोचू नये यासाठी फेसबुकने कितीही पर्याय दिले तरी ती माहिती फेसबुकसाठी कायम खुली असणार आहे. आपली माहिती एका ठिकाणी केंद्रित करणारी ती यंत्रणा आहे. लोकांच्या माहितीचं संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मार्कचे शब्द दिलासा देणारे असले तरी ते कायमस्वरूपी तसे राहतील याची ग्वाही फेसबुक देऊ शकतं का? यदाकदाचित भविष्यात मार्कचं या यंत्रणेवरचं नियंत्रण गेलं तर फेसबुक ही स्वतच सतत इतरांवर निगराणी ठेवणारी भव्य यंत्रणा बनेल!’ फेसबुक, सोशल नेटवर्क आणि एकूणच माध्यमांच्या परिणामांबाबतचं भान येण्यासाठी ‘द फेसबुक इफेक्ट’ हे पुस्तक जरूर वाचावं.

‘द फेसबुक इफेक्ट’- डेव्हिड कर्कपॅट्रिक,

अनुवाद- वर्षां वेलणकर,

मेहता पब्लििशग हाऊस, पुणे.

पृष्ठे- ३९४ , मूल्य- ३९५ रुपये

प्रा. संजय तांबट sanjayvtambat@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2017 2:11 am

Web Title: david kirkpatrick book facebook effect review
Next Stories
1 आजच्या तरुणांचे प्यारव्यार
2 समग्र आयुष्याचा ‘व्यामोह’
3 फुले परंपरेची मर्मग्राही चिकित्सा
Just Now!
X