27 November 2020

News Flash

शिक्षण अन् नोकरीचा व्यत्यास

स्वातंत्र्यानंतर एक काळ असा होता की जितके पदवीधर, तितक्या नोकऱ्या उपलब्ध होत्या.

(संग्रहित छायाचित्र)

‘अभियांत्रिकीच्या साठ टक्के पदवीधरांना नोकरी नाही!’ हे पदवीधर- तेही इंजिनीअरिंगचे- असूनही बऱ्याच कंपन्यांनी ते नोकरीस योग्य नसल्याचे जाहीर केले आहे. एक काळ असा होता की इंजिनीअरिंग किंवा मेडिकलची डिग्री मिळाल्याबरोबर ताबडतोब नोकरी मिळत असे. म्हणून तर आर्ट्सपेक्षा या विद्याशाखांकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा जास्त कल असे. पण आज आर्थिक व औद्योगिक विश्व बदलते आहे, त्याप्रमाणे शैक्षणिक विश्वही बदलत आहे. लोकसंख्या वाढली आहे. पदवीधरांची संख्याही वाढली आहे. परंतु त्यामानाने नोकऱ्यांची संख्या फार वाढली नाही. उलट, रोबो आणि ऑटोमेशनमुळे पूर्वीच्या काही नोकऱ्या संपल्या आहेत. गेल्या काही वर्षांत आय. टी. क्षेत्रात नोकऱ्यांची संख्या वाढली खरी; पण आता ती संख्याही तेवढी वाढणार नाही असे अनुमान आहे. थोडक्यात, शिक्षण व नोकरी हे समीकरण धोक्यात आले आहे.

स्वातंत्र्यानंतर एक काळ असा होता की जितके पदवीधर, तितक्या नोकऱ्या उपलब्ध होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर भारत स्वतंत्र झाला आणि आपल्याकडे औद्योगिक क्रांतीचे युग आले. त्यामुळे नोकऱ्यांची संख्या वाढली. हळूहळू पदवीधरांचीही संख्या वाढत गेली. पण त्यामानाने नोकऱ्यांची वाढ मात्र फार झाली नाही. आज पाच ते सहा पदवीधरांमागे एक नोकरी असे समीकरण आहे. भविष्यात ते दहा ते बारा पदवीधरांमागे एक नोकरी असे होईल असा अंदाज आहे. परंतु पदवीखेरीज तरुणांकडे आता इतरही कौशल्ये असणे आवश्यक होत चालले आहे. हा बदल लक्षात घेऊन शिक्षणपद्धतीतसुद्धा बदल होणे गरजेचे आहे. केवळ जुना अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या गळी उतरवून वर्षांच्या शेवटी तीन तासांची एक परीक्षा घ्यायची आणि त्यात शंभरपैकी जे मार्क्‍स मिळतील त्यावर त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवायचे- हा विचार आता कालबाह्य़ झाला आहे. आजचा काळ आणि समाजाच्या नवीन अपेक्षा काय आहेत, ते पाहू.

व्यक्तिमत्त्व आणि व्यावहारिक ज्ञान यांना आज फार महत्त्व आले आहे. नवे पदवीधर आपले विचार कसे मांडतात? ग्रुपमध्ये काम करण्याबाबत त्यांच्या काय सवयी आहेत? दुसऱ्याचा मुद्दा शांतपणे ऐकून घेण्याची त्यांच्यात क्षमता आहे का? एखाद्या ग्रुपचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात आहे का? विविध भाषांवर त्यांचे कितपत प्रभुत्व आहे? खासकरून इंग्लिश भाषेत संभाषण करणे आणि त्या भाषेमध्ये लिहिणे या गोष्टींत संबंधित व्यक्ती पारंगत आहे का? आज बऱ्याच कंपन्यांचे व्यवहार परदेशी कंपन्यांबरोबर होत असतात. परदेशी कंपनीतील अधिकारी अशी अपेक्षा करतात, की भारतीय कंपनीतील अधिकारी त्यांच्याशी उत्तमरीत्या संभाषण करील आणि आपले विचार मुद्देसूदपणे मांडेल. ही एक कला आहे. त्याकरता तशी सवय करणे आवश्यक आहे. कुठलीही गोष्ट वेळेवर आणि अचूक करणे हे हल्ली फार जरुरीचे झाले आहे. दिलेली मुदत (डेडलाइन) पाळणे याला हल्ली नोकरी पेशात फार महत्त्व आहे. थोडक्यात, Soft Skills म्हणून ज्याला म्हणतात, त्या जर पदवीधर तरुण वा तरुणीमध्ये असतील तर त्यांना त्वरित नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.

आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कॉम्प्युटर आणि स्मार्ट मोबाइल फोनचा वापर होत आहे. नवे पदवीधर तरुण या दोन्ही गोष्टी लीलया वापरत आहेत. पण वैयक्तिक जीवनात या गोष्टी वापरणे आणि आपल्या नोकरीत त्या वापरणे यांत फरक आहे. उदाहरणार्थ, जर पदवीधर इंजिनीअर असेल तर AUTOCAD, ANSYS इत्यादी इंजिनीअरिंग सॉफ्टवेअर किंवा MATLAB, VIRTUAL INSTRUMENTATION यांसारखी सॉफ्टवेअरही त्याने आत्मसात करणे आवश्यक आहे. नुसते C किंवा JAVA Language  येऊन काम भागणार नाही, तर PYTHON सारखी भाषासुद्धा येणे जरुरीचे आहे. आज PYTHON प्रोग्रॅमर्सना प्रचंड मागणी आहे. तसेच CLOUD COMPUTING बद्दल माहिती असणेही आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रात आता इतकी कॉम्प्युटर पॅकेजेस् आली आहेत, की ती आत्मसात करून जर नोकरीच्या क्षेत्रात उतरले तर नवीन क्षेत्रांतील नोकऱ्या चटकन् मिळतील. तरुणांनी नुसताच ट्विटर आणि फेसबुकवर वेळ वाया घालवता कामा नये. याशिवाय रिपोर्ट लिहिणे, बजेट बनवणे, प्रेझेंटेशन तयार करणे, स्काइप मीटिंग करणे यासारख्या गोष्टीही अंगवळणी पाडल्या तर त्याचा नोकरी मिळवण्याच्या कामी लाभ होऊ शकतो.

शिक्षण जितके महत्त्वाचे, तितकाच अनुभवही महत्त्वाचा असतो. म्हणून बऱ्याच ठिकाणी प्रोजेक्ट्सना महत्त्व दिले जाते. उन्हाळ्याची सुट्टी एखाद्या प्रोजेक्टवर काम करण्यात घालवली तर त्यातून खूप शिकता येते. बरेच विद्यार्थी असे प्रोजेक्ट्स परदेशात जाऊनही करतात. काही विद्यार्थी ग्रामीण भागात जाऊन असे प्रोजेक्ट्स करतात, तर काही चांगल्या विश्वविद्यालयात जाऊन प्रोजेक्ट्स करतात. काही विद्यार्थी इंजिनीअरिंग कंपन्यांमध्ये जाऊन असे प्रोजेक्ट्स करतात. काही ठिकाणी शेवटच्या वर्षांत असे प्रोजेक्ट करणे हा शिक्षणक्रमाचा अविभाज्य भाग असतो. ROBOCON, BAJA CAR अशा अनेक स्पर्धामध्ये प्रोजेक्ट्स करावे लागतात. या अनुभवाचे शिक्षण फार मोलाचे असते. या अनुभवातून विद्यार्थी एक यशस्वी पदवीधर बनतो. तेव्हा पदवीबरोबरच प्रोजेक्ट्सचा काही ठोस अनुभव असणे आज जरुरीचे झाले आहे. प्रोजेक्टचा अनुभव भावी करिअरमध्ये जरूर मदत करतो.

आपल्याकडील अभ्यासक्रम शिकविण्याची पद्धत आणि परीक्षा पद्धती या दोन्ही गोष्टी जुन्या झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या अफाट वाढली आहे. शिक्षकांचा तुटवडा आहे. चांगले शिक्षक दुर्मीळ होत चालले आहेत. या गोष्टी लक्षात घेता शिक्षणातही बदल अनिवार्य आहे. आज MOOC, BLENDED LEARNING, INVERTED CLASS ROOM, MOODLE LEARNING MANAGEMENT SYSTEM  असे नवनवीन प्रयोग जगभरच्या शिक्षण क्षेत्रात होत आहेत. जरी आपल्या इथली कॉलेजेस् आणि विद्यापीठांनी हे बदल नाही स्वीकारले तरी विद्यार्थ्यांना या सुविधा अन्यत्र उपलब्ध आहेत. तेव्हा गाईड आणि क्लासेस्वर पूर्णपणे अवलंबून न राहता आता टेक्नॉलॉजीमुळे शिक्षण क्षेत्रात ज्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, त्यांचा विद्यार्थ्यांनी जरूर फायदा करून घ्यावा. NPTEL  सारख्या माध्यमातून जी लेक्चर्स उपलब्ध आहेत त्यातून क्लिष्ट विषय समजू शकतात. COURSERA, EdX  यांच्या कोर्सेसमधून विद्यार्थ्यांचे चांगले प्रशिक्षण होते. थोडक्यात, तंत्रज्ञानामुळे  उपलब्ध झालेल्या सोयीसुविधांचा जास्तीत जास्त फायदा घेऊन चांगले गुण मिळवायचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करायला हवा. अभ्यास, कला आणि क्रीडा ही शिक्षणाची तीन अंगे आहेत. हळूहळू शिक्षणसंस्थांमधून क्रीडांगण लुप्त होत चालले आहे. वैयक्तिक स्पर्धा वा सामूहिक खेळांमधून विद्यार्थी खूप काही शिकत असतात. आज जिमचे फॅड वाढले आहे. पण शरीरसौष्ठवाबरोबरच मानसिक सौष्ठव मिळविण्यात खेळ महत्त्वाची कामगिरी बजावतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी क्रीडांगण आणि खेळालाही महत्त्व देणे गरजेचे आहे. काही नोकऱ्यांत क्रीडापटूंसाठी राखीव जागा असतात. कला क्षेत्र हेही व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. चित्रकला, संगीत, वाङ्मय यांतून एक संतुलित व्यक्तिमत्त्व विकसित करता येते. अशा बहुआयामी व्यक्तीलाही नोकरीत प्राधान्य देण्यात येते.

आज जग स्पर्धात्मक बनले आहे. त्यामुळे तरुणांनी जास्त जागरूक असणे आवश्यक झाले आहे. कॉलेज किंवा विद्यापीठावरच पूर्णपणे अवलंबून न राहता स्वबळावर विविध कौशल्ये अंगी बाणवून आपण शिक्षणाचा पाया अधिक मजबूत केला तर नोकरी किंवा व्यवसायाची चांगली इमारत त्यावर रचता येते, हे निश्चित.

संजय धांडे

(लेखक आयआयटी- कानपूरचे माजी संचालक व विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 2:13 am

Web Title: graduates students required additional courses to get good job with high salary
Next Stories
1 मना, तुझे मनोगत..
2 गोष्टींच्या गोष्टींमधली धर्माधता
3 गाभाऱ्यातला देव
Just Now!
X