News Flash

संतांच्या अमृतवाणीची भावस्पर्शी अनुभूती

आत्मा असून संतपीठाचे आद्याचार्य श्री ज्ञानेश्वर हे प्राण आहेत.

पंढरीचा श्रीविठ्ठल हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक भावजीवनाचा आत्मा असून संतपीठाचे आद्याचार्य श्री ज्ञानेश्वर हे प्राण आहेत. महाराष्ट्रातील अठरापगड जातींत निर्माण झालेल्या संतांनी या मूलभूत प्रेरणाशक्तींचा आधार घेत संतवाङ्मयाची उदंड निर्मिती केली. संतसाहित्य व लोकसंस्कृतीचे व्यासंगी अभ्यासक व संशोधक डॉ. रामचंद्र देखणे यांनी संतसाहित्याच्या या विविधांगी दालनाचं दर्शन आपल्या ‘शारदीचिये चंद्रकळे’ या पुस्तकातून प्रभावीपणे घडवलं आहे. या पुस्तकात डॉ. देखणे यांनी संतसाहित्यातील तत्त्वज्ञान, काव्य, रूपकं आणि भावदर्शन याबद्दलचं मूलगामी चिंतन मांडून वाचकांना ज्ञानसमृद्ध केले आहे. त्यांच्या या तत्त्वचिंतनाला भावस्पर्शी स्वानुभवाची जोड मिळाली आहे. त्यामुळे ते कोरडं न राहता रसाळ आणि प्रवाही झालं आहे.

पंढरीचा पांडुरंग आणि आषाढी वारी हा संतसाहित्याचा गाभा असून तो धागा पकडत डॉ. देखणे यांनी विविध लेखांद्वारे संतसाहित्याच्या अमृतरसाची आनंदानुभूती वाचकांना करून दिली आहे. महाराष्ट्राचा लोकदेव श्रीविठ्ठल, पंढरपुरा नेईन गुढी, संतसाहित्यातील श्रीकृष्ण, संतसाहित्यातील दिवाळी, गौळण- एक रूपककाव्य, संत एकनाथांचा मराठी अभिमान आदी २० लेखांचा हा संग्रह असून त्याद्वारे लेखकाने तत्त्व आणि भावदर्शन समर्थपणे घडवलं आहे. काही लेखांत अप्रकाशित पैलूंवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. पैकी एका लेखात आद्य शंकराचार्याचा ‘मायावाद’, संत ज्ञानेश्वरांचा ‘चिद्विलासवाद’ आणि महाकवी रवींद्रनाथ टागोर यांचा ‘सौंदर्यवाद’ यांच्यातील ज्ञानभूमिकेतून असणारी समानता प्रभावीपणे उलगडून दाखवण्यात आली आहे. महाराष्ट्रात बहुरूढ असणाऱ्या श्री ज्ञानेश्वरीच्या तुलनेत ज्ञानदेवांचे ‘अमृतानुभव’ आणि ‘चांगदेव पासष्टी’ हे ग्रंथ सामान्य भक्तांना आकलनास जरासे अवघड मानले जातात. मात्र ‘अमृतानुभव- सिद्धानुभवाचे चिंतन’ या लेखात त्यांनी या ग्रंथांतील दहा अध्यायांचा मुद्देसूद आणि सोप्या भाषेत परिचय करून दिला आहे. लोकमान्य टिळकांच्या अलौकीक प्रतिभेतून साकारलेला ‘गीतारहस्य’ याही अवघड समजल्या जाणाऱ्या ग्रंथाचं अंतरंग ‘गीतारहस्य- गीताशास्त्राचे प्रवृत्तीदर्शन’ या लेखात मांडले आहे.

या निवडक तत्त्वचिंतनात्मक लेखांबरोबरच संतसाहित्याच्या विविध दालनांतील भावदर्शनही प्रभावी झालं आहे. ‘मैत्र विठ्ठलाशी’मध्ये संत कवयित्रींचं विठ्ठलाशी मायबाप-सखा-बंधू अशा नात्यांनी जडलेला प्रेमभाव, ‘ऐसी कळवळ्याची जाती’मध्ये संतसाहित्यातील आईचं उभं केलेलं तरल रूप, ‘संतसाहित्यातील श्रीकृष्ण’ या लेखात तत्त्वदर्शी कृष्णापेक्षा लोकसंस्कृतीत रुजलेलं गोकुळातल्या श्रीकृष्णाचं खटय़ाळ लीलादर्शन, ‘वनी का वसंतु जैसा’ या लेखातील वसंत ऋतूचं मनोज्ञ दर्शन, तसंच संतांची गौळण, भारुडं यामधील भावरूपकं अशा अनेक अंगाने केलेलं हे भावदर्शन मनाचा ठाव घेतं. डॉ. देखणे हे गेली अनेक वर्षे पंढरीची वारी करत असून त्यांची स्वत:ची दिंडीही आहे. या अमृतसोहळ्याचा वारकरी भक्त या नात्याने त्यांच्या जीवनात वारीची झालेली सुरुवात, दिंडीची स्थापना आणि या वाटचालीतले हृदयस्पर्शी अनुभव ‘वारी- एक आनंदानुभव’ या लेखात त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. ते चिंतनशील आहेत. ‘संत-साहित्यातील काही पत्रे’ हा लेखही रंजक आणि उद्बोधक आहे. चांगदेवांना ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं ‘चांगदेव पासष्टी’ हे ग्रंथरूप पत्र, रुक्मिणीने श्रीकृष्णाला लिहिलेलं श्रीमद्भागवतात आलेलं जगातील पहिलं प्रेमपत्र, संत एकनाथांच्या भारुडात जीवाने वैकुंठवासी नांदणाऱ्या धन्याला लिहिलेलं पत्र, तसंच शिवाजीरावानं जीवाजीरावास अर्थात शिवतत्त्वाने जीवास लिहिलेलं पत्र अशा विविध पत्रांद्वारे वाचकांना निखळ आनंद मिळतो.

सध्याच्या बाजारू संस्कृतीत सर्वच भारतीय सणांचे ‘इव्हेंट’ झाले आहेत. या सणांमागील तत्त्वज्ञान, हेतू आणि मानवी जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम यांचा दिवसेंदिवस लोप होत आहे. इंटरनेटसह विविध माध्यमांद्वारे या सणांची माहिती आपल्यावर आदळत असते, पण प्रत्यक्ष जीवनात मात्र कृत्रिमता आणि प्रदर्शन वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर यातील ‘संतसाहित्यातील दिवाळी’ हा लेख या सणामागील मर्म उलगडून दाखवणारा आहे. ‘भजन- सामवेदाचं लोकरूप, कीर्तन परंपरेची महत्ता, गौळणींमधील रूपकं, संत एकनाथांचा मराठी अभिमान’ हे लेखही उत्तम आहेत. डॉ. रामचंद्र देखणे यांच्या सखोल चिंतनातून व्यक्त झालेला या पुस्तकातील रसाळ वाक्यज्ञ, संतसाहित्यातील ‘सोनियाच्या खाणी’ वाचकांना उघडवून देणारा आणि विवेकरूपी वेलीची लावणी करणारा ठरतो.

‘शारदीचिये चंद्रकळे’- डॉ. रामचंद्र देखणे, उत्कर्ष प्रकाशन, पृष्ठे- १७९, किंमत- २०० रु.

– दीपा भंडारे

deepabhandare23@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 2:48 am

Web Title: ramchandra dekhane book sharadichiye chandrakala
Next Stories
1 माऊंट रशमोर : अद्भुत पर्वतशिल्प
2 ‘जाने भी दो यारो’ आज अशक्य..
3 पैशाचा अर्थ!
Just Now!
X