डाव्या विचारसरणीचे कट्टर समर्थक, भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ, अंधश्रद्धा तसेच अण्वस्त्रविरोधी चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते, तीव्र राजकीय-सामाजिक जाणीव असलेले विचारक, नाटकाचा जबरदस्त ध्यास आणि अभ्यासक, समांतर नाटक-चित्रपटांतील लक्षवेधी अभिनेते आणि दिग्दर्शक.. ही नुकतेच दिवंगत झालेल्या डॉ. हेमू अधिकारी यांची विविध रूपे. त्यांचे बालपणापासूनचे मित्र आणि ज्येष्ठ नाटय़समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी रेखाटलेले त्यांचे हे शब्दचित्र..

पूर्वकल्पना असते. शक्यता तर अधिकांश असते. पण प्रत्यक्षात ती रूपांतरित होते आणि ‘आ’ वासून समोर उभी राहते तेव्हा कोलमडायला होते. पायाखालची जमीनच हादरते.

हेमू अधिकारी. माझा सहा दशकांचा जीवश्चकंठश्च मित्र. वर्षभर आजाराशी झुंज देत होता. गोळ्यांचा मारा चालू होता. प्राणवायू सतत नाकाशी होता. केव्हातरी तो निघायचा. तेव्हा खूप आशा वाटायची. जिंकतोय असं दिसायचं. पण क्षणभरच.

झगडणं, जगण्यासाठी संघर्ष करीत राहणं हा जणू त्याचा स्थायीभावच होता. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ असो, अण्वस्त्रविरोधी शांतता चळवळ असो, लोकविज्ञान चळवळ असो की समांतर नाटय़ मंच फेडरेशनच्या मागण्या असोत; या सर्व चळवळी सचेतन राहण्यासाठी आणि ईप्सित साध्य करण्यासाठीच्या लढाईत त्याचे योगदान असायचेच. पण गेल्या वर्षभराची  लढाई ही त्याची त्याच्याशीच होती. त्याच्या औषधांबरोबरची. त्याच्या प्रकृतीबरोबरची.

प्रकृती त्याच्या लेखनकार्यात अडथळे आणीत होती. त्याचं सामाजिक कार्य, विज्ञान क्षेत्रातील त्याची कामगिरी, प्रायोगिकतेबद्दलची त्याची जाण, आजच्या रंगभूमीबद्दलचा त्याचा अनुभव, दृष्टिकोन, त्याने काढलेले निष्कर्ष.. सारे काही शब्दबद्ध केले जात होते. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे लिहिणे थांबले होते. पण बोलणे चालू होते. ते ध्वनिमुद्रित आणि टंकलिखित होत होते. एका काळाचा पट म्हणून एकूणच अवकाशाचा सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून धांडोळा घेणारा शोधप्रवास म्हणून हे पुस्तक फार महत्त्वाचं होतं. आजाराशी दोन हात करत असताना पुस्तक तयार होत आलं. नावही ठरलं- ‘नाटय़ विज्ञान समाजेन : वृत्त आणि विचार’! मुखपृष्ठ झालं.  प्रकाशनाची तारीख ठरली. २८ फेब्रुवारी २०१७. प्रकाशनाला चार दिवस उरले. प्रकाशक म्हणायला लागले, ‘‘प्रकाशन पुढे ढकलूया. चुका सुधारायच्या आहेत.’’ मी म्हणालो, ‘‘असेल तसं.. नसेल त्याच्याविना, पण पुस्तक विज्ञान दिनी.. २८ फेब्रुवारीलाच प्रकाशित व्हायला पाहिजे.’’ त्याची एकूण परिस्थिती बघून आम्ही  सगळेच धास्तावलो होतो. अखेर प्रकाशन समारंभ यथास्थित पार पडला. त्याला त्याचं पुस्तक त्याच्या हयातीतच बघायला मिळालं. आम्ही कृतकृत्य झाल्याचा नि:श्वास टाकला.

आपल्या छोटय़ाशा भाषणात पुस्तकामागचा पुष्पा भावेंनी लिहिलेला ब्लर्ब वाचून दाखवताना मात्र हेमूचा बांध फुटला. त्याला अश्रू आवरता येईनात. इतका भावविवश होताना हेमूला उभ्या आयुष्यात मी कधीच बघितला नव्हता. (त्याला आगामी चाहूल लागली असेल का?)

त्याच्या साहाय्याने आणि प्रेरणेने आम्ही जी ‘बहुरूपी’ नावाची प्रायोगिक नाटय़संस्था पंधरा वर्षे निरलसपणे  चालवली, वेगवेगळ्या प्रकारची- प्रायोगिक  आणि बिनप्रायोगिक- आशयपूर्ण नाटकं रंगमंचावर आणली, त्या आम्हा सर्वाचा केवळ मार्गदर्शकच नव्हे, तर सुमारे ५० सभासदांचा- रंगकर्मीचा तो कुटुंबप्रमुख होता. प्रत्येकाशी जणू त्याचं अतूट नातं होतं. प्रत्येकाचा सर्वच बाबतीतला तो सल्लागार होता. तो आमच्यातला.. आम्हाला भक्कम धैर्य देणारा धीरोदात्त नेता होता. तोच हेमू असा कसा गलबलेल? काय आलं असेल त्याच्या मनात? कसली भयशंका?

शास्त्रज्ञाला भय कसलं? शास्त्रीय दृष्टिकोन तळागाळात रुजवण्यासाठी एखाद्या मिशनऱ्याप्रमाणे त्याने अथक परिश्रम केले. शाळांतून, महाविद्यालयांतून भाषणं केली. कार्यशाळा घेतल्या. पुस्तिका लिहिल्या, वाटल्या. भाभा अणुसंशोधन केंद्रात तो शास्त्रज्ञ होता. आपल्या संस्थेतील शास्त्रज्ञ सिद्धिविनायकाच्या रांगेत तासन् तास वेळ फुकट घालवतात याचा त्याला तीव्र संताप यायचा. संगणकाला हार घालणाऱ्यांचा, त्याला गंध-फुले वाहणाऱ्यांचा त्याला राग यायचा. तो नास्तिक होता. पण त्याचा प्रचार त्याने कधीच केला नाही. देवभोळेपणावर, बुवाबाजीवर मात्र त्याने जोरदार कोरडे ओढले. ‘आंतरनाटय़’च्या ‘गॅलिलियो’मध्ये तो क्युरेटरची भूमिका करायचा. अणुबॉम्बच्या निर्मितीत  सहभाग असणाऱ्या शास्त्रज्ञ ओपेनहायमरच्या खटल्याचं नाटक त्याला करायचं होतं. विज्ञानावर आधारित एकांकिका  स्पर्धात त्याचा सक्रिय सहभाग असायचा. आजच्या नेत्यांच्या अशास्त्रीय विधानांवर तो लेखांतून सपाटून वार करायचा. विज्ञानाच्या गैरवापराची चिंता त्याला सदैव असायची. ‘अखेरचे पर्व’ हे राजीव नाईक याचं नाटक त्याला खूप आवडायचं, ते त्यातील विश्लेषणात्मक ऐतिहासिक आणि शास्त्रीय  दृष्टिकोनामुळे! दहशतवादाचं ज्वलंत उदाहरण म्हणून चिंतामणराव कोल्हटकरांचं ‘सं. पूर्णावतार’ त्याला फार प्यारं होतं. या दोन्ही नाटकांत तो अगदी समरसून काम करायचा.

नाटक व विज्ञान यांची सांगड घालण्याच्या प्रयत्नात तो नेहमी असायचा. नाटकातील विज्ञान आणि विज्ञानातील नाटय़ यांचा शोध तो घेत राहायचा. ‘आधुनिक’ म्हणवल्या जाणाऱ्या व्यावसायिक नाटकांतील छुपी पारंपरिकता त्याला अस व्हायची. स्त्रियांचे देव्हारे माजवून त्यांची अवहेलना आणि अपमान करणाऱ्या नाटकांचा तो कट्टर विरोधक होता.

त्याचं सामाजिक भान जबरदस्त होतं. राजकारण असो वा समाजकारण; कलावंताला कुठली तरी ठाम भूमिका ही घेतलीच पाहिजे आणि त्या भूमिकेसाठी वाटेल ती किंमत मोजायची त्याची तयारी असली पाहिजे, असं तो नेहमी म्हणत असे.

‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात एका सामान्य माणसाची अवघी पाच मिनिटांची त्याची भूमिका तुफान गाजली. ‘जुलूस’मधला वृद्ध तसंच ‘ढोलताशे’ नाटकातला त्याचा ‘बळवंतराव’ प्रेक्षकांवर छाप टाकून गेला. त्याचं कारण हेमूचं अभिनयकौशल्य हे तर होतंच; पण त्याचबरोबर त्याची तीव्र सामाजिक जाणीव त्या- त्या भूमिका अधिकच भेदक करायला त्याला उपयोगी पडल्या.

१९६५ मध्ये नाटय़शिक्षणाचे महत्त्व पटलेली मंडळी फारशी नव्हती. त्या काळात हेमूने के. नारायण काळे आणि प्रभाकर गुप्ते यांच्या नाटय़शिक्षणाच्या वर्गात त्याने आपले नाव दाखल केले आणि हेमूचा नाटकाकडे पाहण्याचा एकूण दृष्टिकोनच बदलून गेला. त्याचं फलित त्याने स्थापन केलेल्या आमच्या ‘बहुरूपी’ला मिळालं आणि प्रायोगिक नाटकं करणाऱ्यांत आमच्या संस्थेचं नाव अग्रक्रमाने घेतलं गेलं. हेमू अमेरिकेला दोन वर्षांसाठी  गेला होता तेव्हा तेथील ‘मायझर’ या नाटकात त्याने महत्त्वाची भूमिका केली होती. हेच नाटक आचार्य अत्र्यांनी ‘कवडीचुंबक’ या नावानं रूपांतरित केलं होतं. हेमूने माझ्याकडून ‘मायझर’मधला काही भाग अनुवादित करून घेतला आणि त्या भागासह ‘कवडीचुंबक’ची नवी रंगावृत्ती तयार केली. शिरीष पै यांची अनुमती घेऊन अत्रे-मोलियर यांचा संमिश्र ‘कवडीचुंबक’ हेमूच्या दिग्दर्शनाखाली नव्या आकृतिबंधात सादर केला गेला. पॅन्टोमाइम पद्धतीने बसवलेला हा ‘बहुरूपी’चा वेगळा नाटय़प्रयोग प्रेक्षकांना तुफान आवडला. मध्यांतर न घेता हे संपूर्ण नाटक दीड तासात सादर केलं गेलं होतं.

समांतर नाटकांप्रमाणेच समांतर चित्रपटांतही हेमूने आपला ठसा उमटवला. ‘आक्रीत’, ‘कथा’, ‘ध्यासपर्व’, ‘ रेस्टॉरंट’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘दोपहरी’ हे त्यातील काही चित्रपट.

हेमूची आणि माझी मैत्री गेल्या ६० वर्षांची. मला अनुवादक-नाटककार बनवला तो हेमूनेच. मी माझा लिहिण्याचा कंडू शमवण्यासाठी खूप अलंकारिक लिहायचो. मोठमोठय़ा नाटककारांच्या टाळीबाज संवादांची माझ्यावर मोहिनी होती. त्या जाळ्यातून मला वर काढण्याचे अािण मला अधिकाधिक वास्तवाकडे नेण्याचे श्रेय सर्वस्वी हेमूचे. मीताक्षरी संवाद कसे लिहायचे आणि कृत्रिमतेचा अव्हेर कसा करायचा हे हेमूनेच मला शिकवले. त्यांचा परिणाम कसा प्रभावी होतो हे पटवून दिले. माझ्यातल्या आधुनिकतेचे आणि पुरोगामित्वाचे पालनपोषण हेमूने केले. नाटय़समीक्षेच्या संदर्भात  आमचे बरेच मतभेद व्हायचे, पण वादविवादानंतर आम्ही समेवर यायचो.  मी इतकं ‘कडक’ लिहू नये असं त्याला मनापासून वाटायचं. तर ‘वृत्तपत्रात तसं लिहिणं ही गरज असते, अन्यथा तुमचं मत दुर्लक्षित केलं जातं,’ असं माझं मत होतं. राजकारणाचा त्याचा सखोल अभ्यास होता. राजकीय नाटकांच्या संदर्भात मी नेहमीच त्याच्याशी विचारविनिमय करायचो.

छबिलदासच्या तळावर आम्ही दोघे असायचो. ‘शिवाजी मंदिर’ आम्ही कधी त्याज्य मानलं नाही. ‘शिवाजी मंदिर’वाले छबिलदासची पायरी क्वचितच चढायचे. त्यामानाने छबिलदासी मात्र ‘शिवाजी मंदिर’ला बऱ्याच प्रमाणात भेट द्यायचे. कालांतराने हा दुरावा संपुष्टात आला.

मी आणि हेमू एकाच कॉलेजमध्ये होतो. तेव्हापासून ते अगदी काल-परवाच्या पंच्याहत्तरीपर्यंत आम्ही दोघांनी एकत्र नाटकं पाहिली. काही चुकामूक झाली तर दूरध्वनीवरून पाहिलेल्या नाटकाचं नाव न पाहिलेल्याला कळवलं जायचं. आणि मग केव्हातरी घनघोर चर्चा. (अर्थात पुढचं नाटक पाहायच्या अगोदर.) आज आठवतात ते पृथ्वीराज कपूरचे ऑपेरा हाऊसमध्ये झालेले नाटय़प्रयोग.. वरच्या मजल्यावरच्या गॅलरीतून हातात पुठ्ठय़ाचे पंखे घेऊन आम्ही ‘दीवार’ आणि ‘पठाण’ ही नाटकं पाहिली होती. नटवर्य नानासाहेब फाटक यांचं ‘हॅम्लेट’ तर आम्ही दोघांनी मिळून किती वेळा पाहिलं असेल, कुणास ठाऊक!

लंडनमधली शेक्सपिअरची  नाटकं करणारी कुठली तरी नाटक कंपनी आली होती. ‘मॅक्बेथ’चा प्रयोग होता. चेटकिणीच्या प्रवेशात तीन चेटकिणी अधांतरी झोके घेत कढईभोवती फिरायच्या. त्यानंतरच्या एका किल्ल्यावरच्या  प्रसंगात पहिल्या मजल्याइतक्या उंचीवरून चेटकीण खाली उभ्या असलेल्या मॅक्बेथला चिडवते. मॅक्बेथ रागारागाने बाजूचे जिने चढत तिच्यापर्यंत पोचतो. आणि तिची मानगूट धरून तिला जोरात खाली फेकतो. चमत्कारिक हसण्याचा आवाज घुमतो आणि चेटकिणीला फेकणाऱ्या मॅक्बेथच्या हातात राहतो तो फक्त तिचा अंगरखा. चेटकीण नाहीशीच झालेली असते. मॅक्बेथ खाली वाकून बघतो तर तेथे असतो फक्त सन्नाटा. प्रेक्षकांच्या प्रचंड टाळ्या!

‘नाटय़ आणि गिमिक यांचा योग्य मेळ!’ .. हेमू हे दृश्य बघितल्यावर म्हणाला. दुसरं त्याच कंपनीचं नाटक ‘रोझन कँट्स अ‍ॅण्ड गिल्डस्टन’ (‘हॅम्लेट’ नाटकातील दोन पात्रांवरचं वेगळं नाटक!) या नाटय़प्रयोगाचा पडदा उघडतो तेव्हा रंगमंचावर पूर्ण काळोख. पाश्र्वभागी अंधारलेले आकाश. वारा सुटला आहे. त्याला समुद्राच्या लाटांचा आवाज साथ देत आहे. एका टोकाला उंचावर टांगलेला कंदील वाऱ्याच्या झोताने डोलतोय. पाण्याचा चुळुकबुळुक असा लयबद्ध आवाज. या पाश्र्वभूमीवर दोघांचे संवाद कानावर पडतात. पाचच मिनिटं. लख्ख उजेड येतो तो राजवाडय़ात. केवळ एका हलणाऱ्या कंदिलाच्या  साहाय्याने आणि वारा व पाण्याच्या आवाजाने चालणाऱ्या बोटीचा भास निर्माण केला गेला होता. हेमू म्हणाला, ‘‘याला म्हणतात कल्पकता आणि सूचकता!’’

साठ वर्षांपूर्वी  पाहिलेले हे रंगमंचीय प्रसंग नुकतेच पाहिल्यासारखे डोळ्यासमोर येतात. फक्त आज दाद द्यायला माझ्यासोबत हेमू नाही.

मी राहायचो दादर पश्चिमेला- गोखले रोडवर. तर हेमू खोदादाद सर्कलला. नाडकर्णी आणि अधिकारी यांच्यामध्ये फक्त टिळक पूल होता. आणि तो अभेद्य होता. पत्ता विचारला तर सांगायचे : संध्याकाळी ज्या पुलावर हेमू किंवा कमलाकर दिसतील तो ‘टिळक ब्रिज’!

आम्ही दोघे एकाच कॉलेजमधले आणि एकाच वर्गातले. तरीदेखील आमची मैत्री जमली कशी आणि एवढी वर्षे न तुटता टिकली कशी, हे आमचं आम्हालाच कधी कळलं नाही. आमचे स्वभाव एकमेकांपासून भिन्न. तो एका विशिष्ट राजकीय विचारधारेशी बांधलेला. मी कुठल्याच पक्षाचा नाही. बिलकूल उजवा नाही आणि टोकाचा डावाही नाही. हेमू डावाच. हेमू तसा पूर्वाश्रमीचा गंभीर, शीघ्रकोपी. मी नाटक सोडून सगळ्याच गोष्टी चेष्टेवारी नेणारा. मला ललित साहित्याची आवड, लिहिण्याची खुमखुमी. हेमूला वैचारिक आणि राजकीय लेखन अधिक पसंतीचे. मला अलंकारिक भाषेचा हव्यास, तर त्याला निखळतेचा अट्टहास. त्याला पारंपरिकता त्याज्य. मी पारंपरिकतेत आधुनिकता शोधणारा. त्याचं राजकीय आणि सामाजिक भान कमालीचं तीव्र. माझं आपलं जेमतेम. अशी अनेक स्तरांवरची मतभिन्नता असूनही आमची मैत्री अखंड राहिली, याचं कारण आमच्या दोघांचा आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय.. ‘नाटक’! नाटक आमच्यापेक्षा मोठं आहे आणि ते अधिकाधिक उंचावण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, ही आमची दोघांची धारणा. नाटकाच्या अधोगतीच्या विरोधात आम्ही सतत उभे राहिलो. नाटकातील वेगळेपणाचा सतत शोध घेत राहणं हेच आमच्या दोघांच्या घट्ट मैत्रीचं रहस्य. ‘राजसंन्यास’मधल्या हिरोजी-साबाजीच्या मैत्रीचं दैवत शिवाजीमहाराज हे होतं. आमचं दोघांचं मैत्रेय ‘नाटक’ होतं. त्या मैत्रीचं उदक माझ्या हातावर सोडून हेमू निघून गेला. उरलो मी आता अर्धा.. फक्त लिहिण्यापुरता!