वैशाली पटवर्धन-शेंद्रे, क्रेफेल्ड, जर्मनी.

जर्मनीत महायुद्धादरम्यान बरेच बॉम्ब पडले होते. त्यांपैकी काही अधूनमधून सापडल्यास ते लगेच तसं जाहीर करतात. इथे कुठलीही इमारत काही वर्षांनी खूप जुनी वाटायला लागली तर ती पाडून पुन्हा बांधली जाते. तसे अनेकदा इमारत पाडताना बॉम्ब मिळतात, पण मिळाल्यावर अतिशय तातडीने हालचाल केली जाते.

Malaysia Military Helicopters Crash
मलेशियामध्ये दोन लष्करी हेलिकॉप्टरची हवेत भीषण धडक; १० जणांचा मृत्यू, घटनेचा व्हिडीओ समोर
hitler swastika banned in switzerland
स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
newzealand visa rules changed
भारतीयांना फटका! न्यूझीलंडकडून व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल, काय आहेत नवे नियम?

माझे पती अंबरीशच्या नोकरीनिमित्त क्रेफेल्डमध्ये आम्ही अडीच वर्ष होतो. डय़ुसेलडॉर्फमधले भारतीय क्रेफेल्डमधील श्रीलंकन मंदिरात येतात. आपण परदेशात गेल्यावर आपल्यासारख्या चेहऱ्यामोहऱ्याची व्यक्ती बघून पटकन वाटतं की ते भारतीय आहेत.. आपल्याला क्षणभर विसर पडतो की, ते आशियाईही असू शकतात.. जर्मनीत माझं तसंच झालं होतं. नंतर कळलं की इथे श्रीलंकन तमिळी खूप आहेत. ते या मंदिरात सगळे सणवार छान साजरे करतात. इथल्या गर्द वृक्षराजीने नटलेल्या भागात मुलांना खेळायला मिळतं. पिकनिक, वॉक, ट्रेल करता येतो. डय़ुसेलडॉर्फसह बाकीच्या शहरांतही फिरणं व्हायचं. क्रेफेल्डमध्ये प्रदूषण जवळपास नव्हतंच. आम्ही भारतात परतल्यावर ही गोष्टी अगदी प्रकर्षांने जाणवली. जर्मनीत महायुद्धादरम्यान बरेच बॉम्ब पडले होते. त्यांपैकी काही अधूनमधून सापडल्यास ते लगेच तसं जाहीर करतात. इथे कुठलीही इमारत काही वर्षांनी खूप जुनी वाटायला लागली तर ती पाडून पुन्हा बांधली जाते. तसे अनेकदा इमारत पाडताना बॉम्ब मिळतात, पण मिळाल्यावर अतिशय तातडीने हालचाल केली जाते. क्रेफेल्डमध्येही बॉम्ब सापडला होता. आम्हाला दारं-खिडक्या बंद करून घरातच थांबायला सांगितलं होतं ठरावीक वेळ. तेव्हा खूपच भीती वाटली होती.. मुख्य प्रश्न होता तो भाषेचा. ते जर्मनच बोलतात, त्यामुळे त्यांनी केलेली घोषणाही जर्मन भाषेमध्येच झाली होती. तेव्हा मला जर्मन येतं नव्हतं, पण आमच्या इमारतीतील मैत्रिणीला इंग्लिश येत असल्याने तिच्याकडून मला कळलं. मी एकटीच होते घरी. मग अंबरीशला फोन केल्यावर तो म्हणाला, ‘हो, ठीक आहे. हे इथे नेहमी घडतं.’ तेव्हा वाटलं की महायुद्धाच्या वेळी या लोकांना किती आणि कायकाय सोसावं लागलं असेल.. त्यांच्या कुटुंबाचं काय झालं असेल.. वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर या इमारती खूपच सुंदर आहेत. ऐतिहासिक आणि पुरातन वास्तूंचं जतन त्यांनी फार चांगल्या प्रकारे केलं आहे. अनेक पर्यटकांचं आकर्षण ठरणारं  ‘कलोन कॅथ्रेडल’ महायुद्धाच्या वेळी जमीनदोस्त झालं होतं. त्याची सुयोग्य रीतीने पुन:उभारणी करण्यात आली. या वास्तुजतनाचं महत्त्व आपणही लक्षात घेण्यासारखं आहे.

क्रेफेल्डमध्ये अधिकांशी जर्मन, श्रीलंकन तमिळी आणि तुर्की लोक आहेत. अलीकडच्या काळात सीरियन लोक निर्वासित म्हणून येत आहेत. त्यांना नोकरीसाठी जर्मन भाषा येणं अनिवार्य आहे. बँकांच्या व्यवहारातही इंग्रजी नाही. हे भाषिक प्रेम मला आवडलं. तिथे तरुण लग्न करत नाहीत. लग्न केलं तरी संमिश्र करतात. त्यामुळे भाषा जपण्यासाठी इतरांनी ती शिकणं अनिवार्य करण्याचं जर्मनांनी ठरवलं असावं. एकूणच युरोपीय देशांतीलच भाषा बोलल्या जातात. आपल्याकडे असं शक्य नसलं तरी किमान राष्ट्रभाषा हिंदी सगळ्यांनी स्वीकारायला हवी. शिक्षण कोणतंही घेतलं तरी एक मातृभाषा मुलांना शिकवायला हवी. तिथे जाताना काही जुजबी शब्द मी शिकून गेले होते. तरी काही वेळा शब्द न कळल्याने मजा यायची. हळूहळू आम्ही शिकलो. तिथल्या शासनाकडून जर्मन येण्यासाठी एक अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यातली पन्नास टक्के रक्कम शासनातर्फे भरली जाते. जर्मन भाषा इतरांना येण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आमचा तिथे राहायचा कालावधी वाढल्यावर मी जर्मन शिकायचं ठरवलं. माझा मुलगा अनयच्या किंटरगार्डनमध्ये जर्मन बोलायचा आग्रह धरला गेला. आता अनयला चांगलं जर्मन बोलता येतं. सुदैवाने त्याच्या मित्राच्या आईला चांगलं इंग्रजी येत असल्याने शाळेच्या नोटीसविषयी ती मला सांगायची. मी तिथे जर्मनची एक लेव्हल पूर्ण केली असून इथेही जर्मन शिकते आहे. तिथे परदेशी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात पहिले सहा महिने जर्मन शिकावंच लागतं. मात्र तिथल्या तरुणाईला इंग्रजी शिकायला आवडतं, हेही दिसून येतं.

तिथे पायाभूत सुविधांचा विचार करताना वयस्क माणसं, लहान मुलं, अपंगांचा प्राधान्याने विचार केला जातो. त्यांच्यासाठी फुटपाथला स्लोप करतात. ट्रेन-बसमध्येही विचारपूर्वक सुयोग्य सुविधा दिल्या जातात. दर शुक्रवारी फार्मर्स मार्केट भरतं. सुपरमार्केटही जवळच्या अंतरावर आहे. रविवारी मात्र सगळं बंदच असतं. त्यामुळे काही खरेदी करायची असेल तर शनिवार संध्याकाळपर्यंतच दुकानं सुरू असतात. तिथे फॅमिली लाइफ खूप जपतात. ऑफिसला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर जास्त केला जातो. सकाळी दिवसभराच्या हवामानाचा अंदाज वेबसाइट किंवा रेडिओवर ऐकून तसं तयार होऊ न घराबाहेर पडतात. अठराव्या वर्षांनंतर मुलांना पैसे कमावून स्वत:च्या पायावर उभं राहायला शिकवलं जातं. मुलं लहान-मोठी नोकरी करतात. कोणतंही काम करणं कमीपणाचं मानलं जात नाही. करिअरबदलाचा विचार सर्रासपणे केला जातो. एकटं राहणाऱ्या वयस्कांना कुणाच्या आधाराची गरज भासत नाही. त्यांची काळजी सरकार घेतं. कॉल केल्यावर त्यांना अत्यावश्यक सेवा पुरवली जाते. आपण मदत करणं ही गोष्ट वयस्करांना फारशी रुचत नाही. शिकता शिकता कमवण्यासाठी, वयस्क-अंधांना मदत करण्यासाठी काही छोटेछोटे कोर्सेस केले जातात.

तिथं रुळायला तसा थोडा वेळ गेला. एक तर तिथे सगळी कामं स्वत:च करायला लागायची. मायदेशातील पदार्थाची चव जिभेवर रुळलेली असते. त्यामुळे परदेशात गेल्यावर या गोष्टी प्रकर्षांने जाणवतात. आपले मसाले, सामोसा, वडापाव वगैरेची आठवण येते. सुदैवाने या पदार्थाचं सगळं साहित्य मिळतं, फक्त ते आणून करावं लागतं. तशी डय़ुसेलडॉर्फमध्ये भारतीय रेस्तराँ आहेत, पण प्रत्येक वेळी लांब जाणं शक्य नसतं. तिथल्या मैत्रिणी अजूनही संपर्कात आहेत. या मैत्रिणींना भारतीय पदार्थ खूप आवडायचे. मी केलेले पोहे, मोदक त्यांना खूपच आवडले होते. तिथली भारतीय रेस्तराँ खूप चांगली चालतात आणि तिथे जर्मन लोक जास्ती असतात. त्यांना चिकन, दाक्षिणात्य पदार्थाची चव आवडते. मात्र मुळात या लोकांचा खाण्यापिण्याकडे विशेष कल नसतो. थंड हवामानामुळे मांसाहारच अधिक असतो. तोही बऱ्याचदा कच्चा आणि सॉसेजेससोबत खातात. ब्रेडचे विपुल प्रकार मिळतात. तरुणाई पबमध्ये आणि कॅफेमध्ये वयस्क लोक अधिकांशी दिसतात. फुटबॉलची खूपच क्रेझ आहे. फुटबॉलची मॅच सगळ्यांसोबत एन्जॉय केली जाते. आपापल्या क्लब, खेळाडूंना सक्रिय पाठिंबा दिला जातो. सायकलिंग खूप केलं जातं. चालण्यासाठी, सायकलिंग आणि गाडय़ांना वेगवेगळ्या मार्गिका आखलेल्या असतात. स्विमिंग, जिम योगासनं आवडीने करतात. ही मंडळी कायमच नीटनेटकी राहतात. वयस्क स्त्रियांना गळ्यात मोत्याची माळ घालायला आवडतं. तरुणाई एकदम फॅशनेबल आहे. ब्रॅण्डेडपासून सेकंड हॅण्डपर्यंत सगळ्या वस्तू वापरल्या जातात. सतत सेल वगैरे सुरू असतात. गिफ्ट देताना छानपैकी रॅप करून दिलं जातं. एकंदरीतच या लोकांना शॉपिंग करायला जाम आवडतं. दुर्दैवाने भारत म्हटलं की, अनेकांच्या डोळ्यांसमोर गरिबीच येते. त्याचं कारण मीडिया किंवा चित्रपट किंवा आणखीन काहीही असू शकेल.. पण माझ्या मैत्रिणीला भारताची व्यवस्थित माहिती होती. तिला भारतात यायचं आहे. तिथल्या ओळखीच्या आजींशी जर्मनीमध्ये लिहिलेल्या ईमेलद्वारे ती संपर्कात आहे. तिथे असताना ते आजी-आजोबा आमच्या घरी आले होते. त्यांना दिलेली इडली-चटणी, गोडाचा शिरा, चवीला लोणचं खूप आवडलं. आपल्याकडे शूज बाहेर काढायची पद्धत त्यांना माहिती होती. तिथल्या तरुणाईला आपल्या सणावारांविषयी कुतूहल वाटतं. साडी त्यांना फार आवडते. क्रेफेल्डमध्ये भारतीय कमी, श्रीलंकन तमिळी लोक बऱ्यापैकी होते. डय़ुसेलडॉर्फमधल्या मराठी मित्रमंडळातल्या बऱ्याच सांस्कृतिक कार्यक्रमांना आम्ही जायचो. तरुणाईला रॉक म्युझिक खूप आवडतं. पंधरवडय़ाच्या विंटर मार्केटमध्ये खूप एन्जॉय केलं जातं. स्टेज शो केले जातात. विद्यार्थ्यांना फोटोग्राफीचीही आवड आहे. प्रात्यक्षिक आणि व्यावहारिक ज्ञान मिळवण्यावर जास्ती भर दिला जातो.

वाहतुकीचे नियम, कायदा आणि सुव्यवस्था यथास्थित पाळली जाते. हॉर्न वाजवला जात नाही, कुणी वाजवल्यास तो आपला अपमान समजला जातो. नियम मोडला गेल्यास लगेचच दंड केला जातो. क्वचित काही वेळा जर्मन व्हिसा ऑफिसमधून बोलतोय, असं भासवत व्हिसा वैध नसल्याचं सांगून अमुक रक्कम भरायला सांगणारे फ्रॉड कॉल्स येतात, त्या वेळी आधी व्हिसा ऑफिसमध्ये चौकशी करा, असं परिचितांना सांगण्यात आलं होतं. दहशतवादी हल्ल्यांनंतर सुरक्षाव्यवस्था अधिक कडक केली गेली आहे. क्रेफे ल्ड आणि भारतातील राहणीमानाचा खर्च जवळपास सारखाच होता, पण तिथल्या मोठय़ा शहरात राहाणं परवडत नाही. कुटुंबातील सदस्यांच्या संख्येप्रमाणे फ्लॅट दिले जातात. दर दोन वर्षांनी फर्निचर बदलायची हौस तिथल्या अनेकांना आहे. वापरलेलं फर्निचर ते घराबाहेर ठेवतात. ते कुणाला आवडलं तर घेऊन जातात किंवा फर्निचरचा ट्रक येऊन ते घेऊन जातो. त्यांच्या घरात जुन्या चित्रांचं कलेक्शन निगुतीनं केलेलं असतं. घराची सजावट सुंदर रीतीने केली जाते. बागकामाची फार आवड असून ते मेंटेन ठेवावंच लागतं.. क्रेफेल्डच्या अनेक छान आठवणी येत आहेत. किती किती सांगू.. जणू तिथे गेल्यासमान काही क्षणांचा भास होतो आहे..

viva@expressindia.com