03 March 2021

News Flash

टॅबू टॉक्स..!

रिलेशनशिप्स, ब्रेकअप, सेक्शुअ‍ॅलिटी असे कितीतरी कधीच वाच्यता न करायचे विषय हल्लीची तरुणाई त्यांच्या वयाच्या इतरांबरोबर बिनधास्त बोलत आहे.

‘जाहीर वाच्यता करायची नाही’ या कॅटॅगरीतले कितीतरी विषय हल्ली चारचौघांत बोलले जातात. या सो कॉल्ड निषिद्ध विषयांची.. या ‘टॅबू’ची पुटं आता गळून पडत आहेत. या टॅबू टॉक्समधून तरुण पिढीचा विस्तारलेला दृष्टिकोन मांडायचा प्रयत्न.

रीमा आणि तिच्या मित्रमत्रिणींचं सहलीला जाण्याचं प्लॅिनग चाललेलं. वॉटर रिसोर्टला जायचं नक्की झालं पण जशी सहलीची तारीख नक्की झाली तशी रीमा ओरडली. एऽऽऽ एक मिनिट.. मला नाही जमणारेय् माझे पीरिअड्स असतील तेव्हा. आपण प्लीज तारीख बदलू या. रीमाच्या या अचानक केलेल्या घोषणेने सर्व जण अवाक झाले काही सेकंद, पण तेवढय़ापुरतेच. नंतर सर्वानी.. अगदी रीमाच्या मित्रांनीसुद्धा रीमाची ही मासिक पाळीची अडचण समजून घेतली. मासिक पाळीसारखा चारचौघांत न बोलायचा विषय आता तरुण पिढीसाठी टॅबू राहिलेला नाही, हे या उदाहरणावरून दिसतंय. केवळ मासिक पाळीच नाही तर ‘जाहीर वाच्यता करायची नाही’ या कॅटॅगरीतल्या इतर किती तरी विषयांवरचे टॅबू आता गळून पडत आहेत. रिलेशनशिप्स, ब्रेकअप, सेक्शुअ‍ॅलिटी असे कितीतरी कधीच वाच्यता न करायचे विषय हल्लीची तरुणाई त्यांच्या वयाच्या इतरांबरोबर बिनधास्त बोलत आहे.

वर्षांनुर्वष आपल्या समाजात निषिद्ध मानले जाणारे, अळीमिळी गुपचिळी असं समीकरण असणारे विषय आणि त्याबद्दलच्या चर्चा याबाबत एका प्रकाशन संस्थेत कण्टेंट एडिटर म्हणून काम करणारी २८ वर्षीय अनुजा म्हणते, ‘अजूनही काही टॅबू हे आपल्या समाजाला गोचिडासारखे चिकटलेले आहेत. आजही मेडिकल स्टोअरमध्ये सॅनिटरी नॅपकिन मागताना मुलींना लाज वाटते. नॅपकिन काळ्या पिशवीतून का गुंडाळून दिले जातात, हा प्रश्न त्यांना पडत नाही. मेडिकल स्टोअरमध्ये पॅड मागणारा पुरुष आणि कंडोम्स मागणारी स्त्री आजही चच्रेचा विषय होतात.’ याउलट मत ३० वर्षांची नृत्यदिग्दर्शिका भक्ती मांडते, ‘आता मासिक पाळी हा तरी टॅबू राहिलेला नाही. माझ्या पीरिअड्समुळे कामाच्या बाबतीत निर्माण होणारी अडचण मी माझ्या सहकर्मचाऱ्यांना किंवा बॉसला न लाजता सांगते. टॅबू म्हणून समजले जाणारे मासिक पाळी, सेक्स हे विषय हे मुळात नसíगक आहेत. या विषयांना दोन विरुद्ध दिशेची टोकं आहेत. एक तर याचा फार बागुलबुवा केला जातो किंवा हे अत्यंत खालच्या पातळीवर नेऊन त्यावर अश्लील भाष्य केलं जातं. खरं तर यात समतोल साधून हे रोजच्या जगण्यातले नैसर्गिक विषय असल्याने याबद्दल बोलताना संयम राखला जाणं आवश्यक आहे.’

मासिक पाळीचा विषयावरचा टॅबू हळूहळू गळून पडतोय पण ‘सेक्स’ या विषयाबाबत तसं झालेलं नाहीये. हा विषय अत्यंत खासगी हे खरं. हा जाहीर वाच्यतेचा विषय नाहीच. आजही या शब्दाच्या उच्चारानेही अनेकांच्या भुवया उंचावतात. पण लैंगिकता हा विषय, त्याविषयीचे वेगळे विचार मात्र सध्याच्या पिढीला मान्य होऊ लागले आहेत. याबाबत बोलताना एका पीआर कंपनीमध्ये काम करणारी प्रतीक्षा म्हणते, ‘आता दबकत दबकत का होईना स्त्रीदेखील तिच्या पार्टनरबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर स्त्री-पुरुष लैंगिकता याविषयी चर्चा करायला लागली आहे. यामध्ये कुठेही अश्लीलता नाही. याबाबतच्या मानसिकतेवर, प्रश्नांवर आजच्या तरुणाईमध्ये अभ्यासपूर्ण चर्चा होत आहे. सेक्स एज्युकेशन आवश्यक आहे की नाही, या प्रश्नावर मत विचारल्यावर आधीच्या पिढीचे लोक नजर चुकवतात, पण तरुण पिढीतले लोक मात्र गंभीरपणे यावर भाष्य करतात. ही चर्चा समवयस्क गटांमध्ये होत असली तरी पालक-पाल्य, शिक्षक-विद्यार्थी अशा गटांमध्ये या चच्रेला अद्यापि सुरवात झालेली नाही, असं मला वाटतं.’

प्रसिद्ध अभिनेत्री कल्की कोएचलीनने एका इंग्रजी साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत स्वत:च्या लैंगिक आयुष्याबद्दल उघड भाष्य केलं. ‘सेक्शुअल प्रेफ्रन्सेस’वर एवढय़ा जाहीरपणे प्रथमच एखादी सेलेब्रिटी बोलली असेल. ही तिची खासगी बाब असली तरी स्त्रीची लैंगिकता या विषयावर तिने मोकळेपणाने केलेली चर्चा अनेकांना धक्का देऊन गेली. बहुतेकांना तिचा बेधडक, मोकळा स्वभाव आवडला. अशा पद्धतीने समाजातील कोणत्याही टॅबूला न जुमानता बेधडक बोलणाऱ्या कल्कीसारख्या अभिनेत्री थोडय़ाच. चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यक्ती अशा चर्चा करणं टाळतातच. चित्रपटांतही असे विषय प्रगल्भपणे हाताळले जात नाहीत. मराठी नाटकांमध्ये मात्र तर ‘लैंगिकता’ हा विषय फार पूर्वीपासून वेगवेगळ्या पद्धतीने हाताळला गेला आहे, हे विशेष. त्याला प्रगल्भ प्रेक्षकांनी आणि साक्षेपी समीक्षकांनी योग्य न्यायही दिल्याचं आपल्याला माहिती आहे. ब्रेकअप, घटस्फोट याबाबतही पूर्वीचे टॅबू मोडीत काढत मुली उघडपणे बोलू लागल्या आहेत. सेलेब्रिटींनी याची सुरवात केली होती. बिपाशा बसू, करीना कपूर, दीपिका पदुकोण, कल्की यांच्यासारख्या अभिनेत्रींनी कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्या रिलेशनशिप्सबाबत सांगून टाकलं आणि ब्रेकअप झाल्यानंतरही उघडपणे माध्यमांसमोर त्याविषयी सांगितलं.

अशा प्रकारे आणखी टॅबू मोडीत काढणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. ‘माय चॉइस’ या तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून कुणाबरोबर राहायचं, लग्न करायचं, सेक्स करायचं, हा माझा चॉइस असल्याचं ठामपणे मांडलं गेलं होतंच. त्यानंतर आणखी एका टॅबूवर तिने मात केली. आपल्या मानसिक आजारांबद्दल बोलण्याचं धाडस तिनं दाखवलं. कुटुंबाच्या पािठब्याने आणि डॉक्टरांच्या सहकार्याने मी त्या मानसिक अवस्थेतून बाहेर पडले, असं वक्तव्य तिने प्रसारमाध्यमासमोर केलं. आजही मानसिक आजारांना आपल्याकडे अंधश्रद्धेच्या चष्म्यातून पाहणारे जास्त आहेत. मानसिक आजार म्हणजे भुताटकी, नाटक, खूळ असा एकंदर समज आपल्या समाजात आहे. म्हणून मानसिक आजाराबद्दल बोलणं आजही निषिद्ध आहे. मानसिक आजार हा शारीरिक आजारांप्रमाणेच असून त्यावर मानसोपचारतज्ज्ञाकडून योग्य ते उपचार घेतल्यावर तो बरा होतो, हे सिद्ध करून दीपिकाने नवीन पायंडा पाडला आणि हा टॅबूही मोडीत काढला.

नास्तिकतेवर चर्चा तीही स्त्रीनं करणं आपल्या समाजात निषिद्धच. तुम्ही तुमच्या आईवडिलांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना तुम्ही नास्तिक आहात हे फक्त सांगून पाहा. तुम्ही एखादा गुन्हा केल्याप्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया असतील. तुमची खिल्ली तरी उडवली जाईल नाही तर तुम्हाला वेडय़ात काढले जाईल. तरीही आजकालच्या तरुणी या टॅबूला न जुमानता नास्तिकतेबद्दल उघडपणाने बोलू लागल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करू लागले आहेत. एका पीआर कंपनीमध्ये सीनिअर अकाऊंट एक्सिक्युटिव्ह म्हणून काम करणारा २९ वर्षीय तुषार भामरे म्हणतो, माणसाच्या भल्याचा थेट विचार करण्यापेक्षा ईश्वरवादाच्या तिऱ्हाईत पाप-पुण्याच्या टॅबूरूपी बडग्याकडे पाहून आपण माणसाची मदत करतो, इथेच माणूस म्हणून आपण हरतो असं मला वाटतं.

खरं तर नास्तिकतेला वेदांमध्येच स्थान आहे. चार्वाकास् किंवा कार्वक्स की नास्तिकांच्या शाळेचा वेदांमध्ये उल्लेख आहे. अजिता हा तत्त्वज्ञानी या शाळांचा प्रमुख होय. नास्तिकतेचा टॅबू हा आपल्या समाजात आजही तसाच असला तरी आजची बंडखोर तरुणाई या टॅबूला भविष्यात कितपत जुमानेल, हा प्रश्नच आहे.

यातली बहुतेक सगळे टॅबू किंवा बंधनं मुलींच्या बाबतीत आहेत, हे लक्षात आलं असेल. महिला खेळाडूंना वावरताना योग्य अशी वस्त्रं परिधान करावी लागतात. ती कमी अथवा तंग असतात म्हणून यावरूनही महिला खेळाडूंना अनेकदा विरोधाला सामोरं जावं लागतं. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीसारख्या प्रकारात पदक मिळवणारी साक्षी मलिक समाजात तयार होते, तर दुसऱ्या बाजूला कपडे कसे घालावेत याबाबत मुलींवर बंधनं येताहेत. पण या टॅबूंपासून स्वतची सुटका करून घेण्याची मुलींची इच्छा आहे. तरुण मुलंही त्यांच्या बंडखोरीला साथ देत आहेत. मुलींचे भाऊ, मित्र, प्रियकर अथवा नवरा या टॅबूचा बागुलबुवा न करता मुलींचं व्यक्तिस्वातंत्र्य मान्य करू लागले आहेत. आजच्या बेधडक तरुणाईच्या स्वातंत्र्याच्या कक्षा विस्तारतायत. त्यामुळे टॅबू हा टॅबू न राहता आता समाजाचाच एक भाग होऊ पाहतायत. मग सॅनिटरी नॅपकिनचं व्हेंडिंग मशीन पाहून कुणी आ वासत नाही आणि यूटय़ूबवरच्या ‘सेक्स चॅट विथ पप्पू अ‍ॅण्ड पापा’ या मालिकेवर कुणी आक्षेप घेत नाही. टॅबूरूपी बंधनांच्या बेडय़ा तरुण उखडताहेत हे नक्की!

हळूहळू मोडीत निघणारे टॅबू

  • मासिक पाळी
  • मानसिक आजार
  • ठरलेलं लग्न मोडणं
  • ब्रेकअप
  • ब्रेकअपनंतरची रिलेशनशिप
  • लैंगिकतेविषयी भाष्य

टॅबूमधून चतुराईने बाहेर पडायला हवं

सोशल मीडियामुळे टॅबूजमधून आपला समाज बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पण त्यावेळी आपण हाही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की टॅबूज्मधून बाहेर पडणं ही एक अंतर्गत प्रक्रिया आहे. ती त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीचे टॅबूबाबत स्वत:चे असे विचार असतात. आजही आपल्या समाजात मासिक पाळीबाबतचा टॅबू तसाच आहे. मेडिकल स्टोअरमध्ये सॅनिटरी नॅपकीन मागितल्यावर ते कागदात गुंडाळून दिले जातात. मासिक पाळी आपल्याला निसर्गाने दिली आहे. त्यामुळे स्त्रियांना मातृत्वाचा अधिकार मिळतो. त्यामुळे आपण त्याचा अभिमानच बाळगला पाहिजे. टॅबूजमधून आपण अत्यंत चतुराईनं बाहेर पडलं पाहिजे. त्याचं कुठल्या प्रकारे स्तोम, अवडंबर न माजवता त्यातून बाहेर पडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला पाहिजे. आपण किती पुढारलेले आहोत याचा देखावा करण्यापेक्षा आपण त्या टॅबूजना माणूस म्हणून कसे सामोरे जात आहोत याचा विचार केला पाहिजे. आज शहरात टॅबूजबाबत जी स्थिती आहे त्यापेक्षा वाईट परिस्थिती खेडय़ापाडय़ात आहे. आजही तेथील स्त्रिया विविध बंधनात जखडलेल्या आहेत.   सई ताम्हणकर, अभिनेत्री

टॅबूशी ‘फाईट’ करा

आपल्याकडे मुलींनी खेळण्याचा विचार करणं हासुद्धा एक टॅबूच असतो. स्वतवरचा विश्वास हाच अशा सगळ्या प्रसंगी महत्त्वाचा ठरतो. केवळ मी मुलगी आहे म्हणून मी कुस्ती करू शकत नाही असं जर कोणाचं म्हणणं असेल तर आता मी त्यांना सांगू शकते की माझ्यासारखी ‘फाईट’ करा.’

साक्षी मलिक,  कुस्तीपटू

अश्विनी पारकर, वेदवती चिपळूणकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:01 am

Web Title: lets talk about taboo
Next Stories
1 प्रिय प्रेरणादायी मैत्रिणींनो..
2 सुवर्णपदक विजेती तात्याना
3 ले ले सेल्फी ले , क्लिक : राजेंद्र धुमाळ
Just Now!
X