भक्ती परब

सध्या रणवीर-दीपिकाचं लग्न, ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’, ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हे दोन चित्रपट, दिवाळी, काही राजकीय घटना यावरचे मीम्स व्हायरल होत आहेत. या मीम्समागचं डोकं आहे ते सर्जनशील तरुणाईचं. मीम्समधून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं सोपं काम नाही. त्यासाठी रात्रंदिवस ही मुलं मीम्सवर काम करत असतात. या मीम्सनीही आता व्यवसायाचं रूप धारण करून असंख्य तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. मुळातच उत्स्फूर्तपणे आणि सर्जनशीलतेने करायचं हे काम ही मुलं मनापासून करताना दिसतात आणि त्याची प्रचीती रोज आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळते आहे. मीम्स बनवणाऱ्या अशा तरुणाईशी संवाद साधत त्यांनी जमवलेलं हे हास्यकारण आणि त्यातून उभं राहिलेलं अर्थकारण दोन्ही जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

अभिनेता रणवीर सिंग हळूच रणबीर कपूरच्या कानात सांगतो, ‘माझ्या लग्नाला येऊन चन्ना मेरेया गाणं गाऊ  नकोस’, निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना लग्न जुळवून देणारे काका असं नाव देत आणि रणवीर-दीपिकाबरोबर जोडलेले त्यांचे छायाचित्र या अगदी ताज्या घडामोडीपासून ते दिवाळीच्या दिवशी कारीट फोडणे जरुरी आहे का.. या प्रश्नावर शास्त्र असतं ते असं आलेलं आईचं उत्तर, सकाळी भाजलेली भाकरी रात्री कशी होते.. कडकककक म्हणत येऊ घातलेल्या चित्रपटाची मस्करी किंवा ठिकठिकाणी रडताना दिसणारी अनुष्का शर्मा, दिवाळी सुट्टीची स्वप्न पाहताना दिव्यांनी लखलखणाऱ्या घरात बागडणारे आपण आणि रिअ‍ॅलिटीमध्ये घरं झाडणारी आपण मुलं.. अशा मीम्सनी सध्या समाजमाध्यमांवर बहार उडवून दिली आहे. या मीम्समुळे दिवसभरातील ताण हलका होऊ न आपल्याला खुदकन हसू फुटतं. मोबाइलमध्ये बघून हसणारा कोणी दिसला तर तो नक्कीच मीम्स बघत असणार हे अगदी पक्कं होऊन जातं, मग तो मीम्स फॉरवर्ड करणं हे ओघानं आलंच. या मीम्सने गेली ३-४ वर्ष आपल्यावर विनोदाची छडी फिरवून जादूच केलीय जणू. आपल्याला दिवसभराच्या कित्येक घटनांमध्ये फिल्मी प्रसंग आठवतात. इंजिनीअरिंगच्या मुलांना ‘थ्री इडियट्स’मधले प्रसंग आठवतात, तर खूप रडायला येतं तेव्हा अलका कुबल आठवतात, राग येतो तेव्हा अमिताभ बच्चन आठवतो तर शाळेतल्या शिक्षकांमध्ये कधी हिटलर तर कधी फिल्मी व्हिलन दिसतो. अशाच कल्पनांमधून मीम्स ही संकल्पना आकाराला आली.

‘आरव्हीसीजे’ ही चार इंग्रजी अक्षरं गेली आठ वर्ष समाजमाध्यमावरील रसिकांना परिचयाची आहेत. रजनीकांत व्हर्सेस सीआयडी जोक्स म्हणजेच आरव्हीसीजे. शाहिद जावेद अन्सारी या मुंबईकर तरुणाने एका मीडिया कंपनीची स्थापना केली. त्यांनतर त्यांनी २०१६ मध्ये यूटय़ूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मीम्सची २६ पेजेस ओपन केली. त्यातून आज त्यांची मुंबई, कोलकाता, बंगलोर आणि दिल्ली येथे कार्यालयं आहेत. यात हजारोंच्या संख्येने तरुणाईला रोजगार मिळाला आहे. घरून काम करण्याचीही त्यांनी सोय करून दिली आहे. त्यांच्याबरोबर काम करणारा योगेश व्यास सांगतो, त्याला जोक्स रचून ते लोकांना पाठवायची खूप आवड होती. तेव्हा सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे टेक्स्ट मेसेज करून त्याचे ग्रुप बनवून तो लोकांना जोक्स पाठवायचा. त्यामुळे तो मित्रांमध्ये लोकप्रिय होता. त्याचे जोक्स सगळ्यांना आवडायचे. आज स्वत:चा इम्पोर्ट-एक्स्पोर्टचा व्यवसाय सांभाळून तो मीम्स बनवतो. स्वत: अजिबात मानधन घेत नाही. पण त्यांच्याकडे काम करणाऱ्या क्रिएटिव्ह मुलांना त्यांचा मोबदला मिळतो. शाहीद हा त्याचा ग्रुपमधला मित्र, कंपनी स्थापन केल्यावर त्याने योगेशला मीम्स बनवण्यासाठी बोलावून घेतले. त्यांनतर त्यांच्या मीम्स पेजेसचा फॅन असलेल्या अंकित मोरचा त्यांच्या ग्रुपमध्ये प्रवेश झाला आणि मग या मित्रांनी मागे वळून पाहिले नाही. आज देशभर त्यांच्यामुळे कल्पकता असलेल्या तरुणांना रोजगार आणि मनासारखं काम करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. विनोदी, सामाजिक तर कधी मस्त मराठीतून बनवलेले मीम्स ही त्यांची खासियत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या तीन ते चार वर्षांत आलेल्या काही चित्रपटांचं प्रमोशनही त्यांनी केलं आहे. त्यांची लोकप्रियता पाहूनच त्यांना प्रमोशनसाठी विचारण्यात येतं, असं योगेश सांगतो. योगेश मूळचा जळगावचा आहे. त्याच्यासारखेच महाराष्ट्रातील १०० तरुण त्यांच्याबरोबर मीम्स करण्यात गुंतले असून त्यातले १५ ते २० मराठी तरुण आहेत.

मूळचा ठाण्याचा असलेला करण सोनावणे स्टॅण्डअप कॉमेडीचे कॉर्पोरेट शोज करतो. त्याला मीम्स बनवण्याची आवड निर्माण झाली. मग त्याने हळूहळू मीम्स बनवायला सुरुवात केली. त्याच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरून प्रकाशित झालेले त्याचे मीम्स लोकांना आवडू लागले. असं गेले सहा महिने त्याने लोकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर ‘भारतीय डिजिटल पार्टी’ म्हणजेच भाडीपासाठी याच महिन्यापासून मीम्स आणि ३०-३५ सेकंदाचे व्हिडीओ मीम्स तो बनवतो आहे. इन्स्टाग्रामवर गेले सहा (पान २ वर) (पान १ वरून) महिने तो मीम्स पोस्ट करतो आहे. त्यातून त्याला पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत. मीम्समधून सोशल मीडिया मार्केटिंग उत्तम प्रकारे होतं असं तो म्हणतो. पण तितकंच लोकांचं मनोरंजन होणंही महत्त्वाचं आहे. ३० ते ३५ सेकंदाच्या व्हिडीओला कॉपीराईटची समस्याही येत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.

सनत लडकत या मुलाचं बाबा मेमेवाले नावाचं फेसबुक पेज लोकप्रिय आहे. सनत आर्किटेक्चरच्या शेवटच्या वर्षांला आहे. तो आपला अभ्यास करून बाकीचा वेळ मीम्स बनवण्यासाठी देतो. ‘गेल्या ४-५ वर्षांत मीम्स हा प्रकार खूपच लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियाचं चांगलं ज्ञान असलेली आणि एडिटिंग, साऊंड सिंक, मिक्स करण्याचं तंत्र अगवत असलेली तरुणाई याकडे व्यवसाय म्हणून पाहू लागली आहे. लोकांना कधी कधी वाटतं हा फालतूपणा आहे, पण यामागे तरुणाईची कल्पकता आहे, असं तो म्हणतो. अलीकडे नवरात्रात सनतने बनवलेला अशोक सराफ आणि रंजना यांचा ‘छोगाडा’ या गाण्यावर बनवलेला व्हिडीओ मीम्स प्रचंड गाजला.

मीम्स बनण्यात सध्या मुंबईकर तरुणाई किती माहीर झाली आहे याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे हेमचंद्र सावंत, चंद्रकांत साळगांवकर, स्वप्निल कांबळे आणि दर्पण क्षीरसागर या चौकडीने सुरू केलेली ‘मुंबई मनोरंजन सेना’. यांच्या टीमने ऑगस्ट २०१७ मध्ये पहिला व्हिडीओ मीम्स अपलोड केला. लहानपणापासून चंद्रकांत आणि हेमचंद्र त्यांच्या सोसायटीच्या पूजेला किंवा शाळेच्या गॅदरिंगला असं छोटंमोठं विडंबन किंवा विनोदी नाटक स्वत: लिहून सादर करायचे. मधल्या काळात ते अचानक सगळं थांबलं होतं. पण ते परत करायची सुरसुरी होतीच आणि त्यातूनच मग मुंबई मनोरंजन सेनेचा जन्म झाला. मीम्स बनवताना कशा कल्पना सुचतात, यावर चंद्रकांत म्हणाला, ‘आपण एखाद्या गोष्टीकडे कसं बघतो हे जास्त महत्त्वाचं आहे. विनोदाचा किंवा मीम्सचा जन्म तिथे होतो. एखाद्या साध्या सरळ वाटणाऱ्या छायाचित्रातसुद्धा तुम्हाला हसून लोळायला लावणारा मिम सापडू शकतो. विनोदबुद्धी आणि तिरकसपणे बघण्याची दृष्टी हे मीम्ससाठी आवश्यक भांडवल आहे.’

हेमचंद्र हा सिव्हिल इंजिनीअर आहे. त्याचा ठाण्याला स्वत:चा इंजिनीअरिंग क्लास आहे. चंद्रकांत आणि स्वप्निल दोघांनी मास मीडियाची पदवी मिळवली आहे आणि ते एडिटिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहेत तर दर्पण जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी आहे. पुढे ‘मराठी बाबा’ वेब सीरिजमधून या ग्रुपला राकेश आणि आलापसारखे उत्तम अभिनेते मिळाले. आलापने देखील मास मीडियाची पदवी मिळवली असून राकेश डिजिटल आर्टिस्ट आहे. सध्या तरी त्यांना याचा मोबदला मिळत नाही, केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने ते काम करतात. तुम्हाला नेमकं काय हवं आहे त्यावर मीम्स बनवायचा रेट ठरतो. व्हिज्युअल्स वापरताना किंवा व्हिडीओ एडिटसाठी घेताना मूळ व्यक्तींकडून परवानगी घ्यावी लागते का? असं विचारल्यावर तशी परवानगी आम्ही घेतली नाही पण ती गरजेची असते. अन्यथा त्यांच्यापैकी कोणी आक्षेप नोंदवला तर तो व्हिडीओ काढावा लागतो, अशी माहिती त्यांनी दिली.

मीम्स हे आधी इंग्रजी भाषेत व्हायचे, त्यानंतर ते हिंदीत आले. आता मग महाराष्ट्रातील मराठी आणि मालवणी, कोल्हापुरी, पुणेरी भाषेतही ते दिसू लागले आहेत. यासाठी महाराष्ट्रातील काही तरुणांनी पुढाकार घेतला त्यातलं एक नाव म्हणजे ‘महाराष्ट्रीयन्स मीम्स’. यांची एकूण २० पेजेस आहेत. त्यात मुंबई, पुणे, नाशिक, कोकण अशी प्रांतवारीसुद्धा आहे. फुटबॉल आणि क्रिकेटच्या चाहत्यांसाठी वेगळी मीम्सची पेजेस आहेत. त्यांचे ६००० ग्रुप मेंबर्स आहेत. महाराष्ट्रातील विविध ठिकाणची मराठी मुलं आणि महाराष्ट्रातील इतर भाषिक ज्यांना मराठी येतं अशा मुलांचा हा ग्रुप आहे. पिक्स आर्ट वापरून ते मीम्स बनवतात. आणि कॉपीराईट नसलेले ओपन सोर्स असलेले व्हिज्युअल्स वापरतात. सोशल मीडिया मार्केटिंगचं गणित या मुलांना अवगत आहे. ग्रुपमधली बरीचशी मुलं कॉलेजमध्ये शिकणारी आहेत. ते त्यांच्या पेजवरून मीम्सच्या माध्यमातून हिंदी, मराठी चित्रपट, वेबसीरिज, कॅ फे, रेस्टॉरेंटमधील इव्हेंटचे प्रमोशन करतात. विनोदी चित्रपटाचं मार्केटिंग करणं सोपं पण गंभीर चित्रपटाचं कठीण असं ते सांगतात. ऋषिकेश फाळके आणि सर्वज्ञ दुदवडकर हे दोघेही लीट मीम्स मुंबईचं पेज बघतात. त्यावर मुंबईकरांच्या प्रश्नांवर असंख्य घडामोडींवर विनोदी भाष्य मीम्समधून केलं जातं. यांच्या एकूण २० पेजेसना लाखोंच्या घरात फॉलोअर्स असल्यामुळे आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवल्यामुळे मनासारखं काम करून त्यातून आर्थिक कमाईही करता येते.

डोंबिवलीकर मीम्स हेही मीम्सचं पेज असंख्य डोंबिवलीकरांच्या रोजच्या जगण्यावर हास्याची फुंकर घालतं. सारांश आणि सार्थक डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी पहाटला भेटले असताना त्यांना या पेजची संकल्पना सुचली. डोंबिवली शहराची सांस्कृतिक ओळख आणि रेल्वेने प्रवास यावर मीम्समधून ते भाष्य करतात. तसेच अनेक सामाजिक उपक्रमांना मीम्समधून लोकांपर्यंत पोहोचवतात. लोकांना खळखळून हसवणं हेच त्यांना महत्त्वाचं वाटतं.

अशा अनेक संकल्पना, भेटींमधून सांधत गेलेले हे कल्पक विचारांचे दुवे एकत्र येत गेले. मीम्सच्या निमित्ताने का होईना एकमेकांशी विचाराने जोडले गेलेल्या या तरुणाईने समाजमाध्यमांवर या मीम्सचं एक जाळंच तयार केलं आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर केवळ एकमेकांची उणीदुणी न काढता त्याला आपल्या कलेचं, हुशारीचं कोंदण देत आर्थिकदृष्टय़ाही सक्षम झालेल्या या तरुणाईच्या कल्पकतेला दाद द्यावी तितकी थोडीच!