देशात करोनाग्रस्तांची संख्या सतत वाढत असताना देशातील मोठी विमान कंपनी एअर इंडियाने करोना लसीकरणाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार मे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण केलं जाणार आहे. कंपनीच्या प्रवक्त्याकडून याबाबत माहिती देण्यात आली.

एअर इंडियाच्या वैमानिकांच्या संघटनेने कंपनी व्यवस्थापनाकडे १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन लसीकरण केले जावे अशी मागणी केली होती. जर मागणी मान्य झाली नाही तर काम बंद आंदोलनाचा इशारा पायलट्सकडून देण्यात आला होता. काम बंद आंदोलनाचा इशारा देणारे पत्रही कंपनीच्या संचालकांना पाठवण्यात आले होते.


अखेर कर्मचाऱ्यांच्या मागणीला यश आले आणि काल एअरइंडियाच्या प्रवक्त्याकडून या महिन्याच्या अखेरपर्यंत कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण केलं जाईल अशी माहिती देण्यात आली. करोना काळात विमान प्रवासावर निर्बंध असले तरी वंदे भारत मिशन किंवा अन्य काही विशेष विमानांचं उड्डाण होत असतं, त्यासाठी अनेक क्रू आणि पायलट कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत.