भारतीय टेलीकॉम कंपनी एअरटेलने ग्राहकांना दणका देणारं पाऊल उचललं आहे. कंपनीने इनकमिंग व्हॉइस कॉल्सची वैधता कमी करण्याचा निर्णय घेतलाय.

टेलिकॉम टॉकने दिलेल्या वृत्तानुसार, आधी इनकमिंग कॉलसाठी 15 दिवसांची वैधता होती मात्र कंपनीने आता वैधता कमी करुन केवळ 7 दिवसांवर केली आहे. म्हणजे इनकमिंग कॉल सुरू ठेवण्यासाठी आता ग्राहकांना आधीपेक्षा लवकर रिचार्ज करावं लागणार आहे. एअरटेलने किमान रिचार्ज स्कीममध्ये बदल केला आहे. हे केवळ प्रीपेड रिचार्जसाठी लागू असणार आहे. रिचार्जची वैधता संपल्यानंतर खात्यात बॅलेन्स शिल्लक असेल तरीही केवळ 7 दिवसांपर्यंतच इनकमिंग कॉल्स येऊ शकतील, यापूर्वी ही वैधता 15 दिवसांसाठी होती. कंपनीने हा निर्णय प्रतिग्राहक सरासरी उत्पन्न (ARPU) वाढविण्यासाठी घेतल्याचं सांगितलं जात आहे.

सध्या टेलिकॉम कंपन्या किमान रिचार्ज आणि स्मार्ट रिचार्जवर भर देत आहेत. याअंतर्गत वैधता मर्यादित असते, म्हणजे ग्राहकांना सातत्याने रिचार्ज करावं लागतं. एअरटेलच्या रिचार्ज प्लॅनची सुरूवात 23 रुपयांपासून आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून कॉलिंगसाठी वेगळं रिचार्ज करावं लागतं. दरम्यान, खिशावर थेट भूर्दंड पडणार असल्याने  एअरटेलच्या इनकमिंग कॉलच्या नव्या नियमाबाबत ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.