टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने नवीन ब्रॉडबँड प्लॅन लाँच केले आहेत. जिओ फायबरच्या 399 रुपयांच्या ब्रॉडबँडला टक्कर देण्यासाठी एअरटेलने 499 रुपयांच्या किंमतीपासून ब्रॉडबँड प्लॅन आणले आहेत. या प्लॅन्समध्ये ग्राहकांना 1Gbps पर्यंत स्पीडने अनलिमिटेड डेटा वापरण्यास मिळेल. तसेच, एअरटेल एक्स्ट्रीम अँड्राइड 4K टीव्ही बॉक्स आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी मोफत सब्स्क्रिप्शनही मिळेल.  एअरटेल एक्स्ट्रीम बंडल प्लॅन्स सात सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत. नवीन युजर्सनाही या प्लॅन्सचा फायदा मिळेल. सर्व एअरटेल एक्स्ट्रीम फायबर प्लॅन्स आता अमर्याद डेटासोबत उपलब्ध आहे. त्यामुळे आता ग्राहकांना डेटा संपण्याची भीती नाही.

Reliance Jio ला टक्कर देण्यासाठी एअरटेलने पाच नवीन ब्रॉडबँड प्लॅन्स लाँच केले आहेत. यामध्ये 499 रुपये, 799 रुपये, 999 रुपये, 1499 रुपये आणि 3999 रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. ग्राहकांना या प्लॅनमध्ये एअरटेल एक्स्स्ट्रीम 4K टीव्ही बॉक्स घेण्याचाही पर्याय मिळेल. एअरटेल एक्स्स्ट्रीम 4K टीव्ही बॉक्ससाठी ग्राहकांना 1500 रुपये द्यावे लागतील. हे पैसे रिफंडेबल असतील. म्हणजे कंपनीला बॉक्स परत केल्यानंतर तुम्हाला 1500 रुपये पुन्हा मिळतील. जाणून घेऊया या प्लॅन्सबाबत :

499 रुपयांचा प्लॅन :-
या प्लॅनमध्ये ग्राहकांना दर महिन्याला 499 रुपये भरावे लागतील. यामध्ये ग्राहकांना 40 MBPS स्पीडसह अनलिमिटेड डेटा वापरण्यास मिळेल. याशिवाय अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचाही फायदा मिळेल.

799 रुपयांचा प्लॅन :-
799 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 100 MBPS स्पीडसह अनलिमिटेड डेटा वापरण्यास मिळेल. यासोबतच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचाही फायदा आहे.

999 रुपयांचा प्लॅन :-
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 200 MBPS च्या हाय-स्पीडसह अनलिमिटेड डाटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सेवा मिळते.

1499 रुपयांचा प्लॅन :-
1499 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 300 MBPS हाय स्पीडसोबत अनलिमिटेड डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा मिळेल.

3999 रुपयांचा प्लॅन :-
हा एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्ससह येणारा सर्वसमावेशक प्लॅन असून यामध्ये ग्राहकांना तब्बल 1Gbps हाय स्पीडसोबत अनलिमिटेड डाटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सेवा मिळते.