02 December 2020

News Flash

अशी पाखरे येती.. : धीट अन् देखणे!

लाँच भर समुद्रात आली तेव्हा सीगलना पाहण्यासाठी आमच्यासह आणखी दहाबारा जण वरच्या डेकवर गेलो.

निनाद परुळेकर

नोव्हेंबर महिन्याचा उत्तरार्ध. दिवाळी नुकतीच संपून गेलेली, तरी तो आनंद तसाच सर्वत्र भरून राहिलेला होता. मुलांनाही शाळांची सुट्टी अद्याप होतीच. बच्चेमंडळींबरोबर आम्ही एलिफंटा (घारापुरी लेणी) येथे जाण्यासाठी सकाळी सात वाजण्यापूर्वीच चर्चगेटहून सरळ गेटवे ऑफ इंडियाकडे पोहोचलो. तेथे एलिफंटाची लाँच बुक करण्यासाठी तिकिटे काढली आणि आपल्या लाँचवर नंबर कधी लागतोय याची वाट पाहात उभे राहिलो.

आम्हा सर्वाचे लक्ष तोपर्यंत आमच्याच वर आकाशात उडणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पक्ष्यांकडे गेले. कबुतरांच्या आकाराएवढे, पण एकूण शरीर घाटदार अन् वेगाने इकडून तिकडे उड्डाण करत ते सीगल नुसते भटकत होते. लाँचमध्ये बसतानाही सीगल्सचे थवे आमचे लक्ष वेधून घेत होते. लाँच भर समुद्रात आली तेव्हा सीगलना पाहण्यासाठी आमच्यासह आणखी दहाबारा जण वरच्या डेकवर गेलो. त्यातल्या काहींनी आपल्याजवळच्या पुडय़ांमधून गाठिया, शेव, पापडी समुद्रात फेकायला सुरुवात केली. पण तो तुकडा खाली पाण्यात पडण्यापूर्वी सीगल हवेतच तो झेलून गिळंकृत करत होते. लाँच एलिफंटाला पोहोचेपर्यंत हा खेळ असाच सुरू होता.

धवलशुभ्र रंग परिधान केलेल्या या समुद्रपक्ष्याचे डोळे फारच सुंदर अन् भावपूर्ण असतात. हवेत उड्डाण करताना त्यांचे फैलावलेले आणि वलयांकित विशाल पंख अत्यंत आकर्षक असतात.

आपल्याकडे सीगल पक्ष्याच्या दिसणाऱ्या दोन महत्त्वाच्या जाती म्हणजे तपकिरी डोक्याचा कुरव (ब्राऊन हेडेड गल) तर दुसरी जात काळय़ा डोक्याचा कुरव(ब्लॅक हेडेड गल). आपल्या भारतात समुद्रकिनारी या दोन्ही जाती एकत्र आढळतात. पावसाळा संपल्यावर ऑक्टोबरनंतर समुद्रकिनारी तसेच अंतर्गत जलाशयाच्या किनारी हे पक्षी येतात आणि ते एप्रिल अखेपर्यंत असतात.

बंदरे, गोद्या खाडय़ांमध्ये असलेल्या जहाजांवरील फेकून दिलेल्या अन्नासाठी हे सीगल्स नेहमी घिरटय़ा घालत असतात. त्याचप्रमाणे कोळी लोकांनी फेकून दिलेले मृत मासे हे पक्षी खातात.

मध्यंतरी मी सोलापूरला कुंभारगाव (भिगवण) येथे गेलो असता तेथल्या भीमा नदीच्या परिसरात भीमेतले जलखाद्य मासे, जलकिटक वगैरे खाण्यासाठी बऱ्याच जातींच्या पाणपक्ष्यांचे थवे उपस्थित होते.

तेथे अर्थात सीगल्सबरोबर रंगीत करकोचे (हे आळशी नंबर एकचे पक्षी) म्हणजे पेंटेड स्टॉर्क्‍स, छोटे, मोठे बगळे, आयणीस असे बरेच पक्षी होते. पण दांडगट, मोठय़ाल्या चोचीचे स्टार्क्‍स, सीगल्सना पाण्यातले मासे काही खायला देईनात. त्यांना हुसकावून लावायचे आणि सारे मासे बकाबका गिळायचे.

शेवटी सीगल्सनी आपला मोर्चा वळविला आणि ते पेटेंड स्टॉर्क्‍सच्या गर्दीपासून दूरवर गेले. खाद्य खाण्याव्यतिरिक्त हे सीगल पक्षी मस्तपैकी पाण्यांच्या लाटांवर डुंबत असतात. पाण्याखाली सूर मारत असतात आणि इतर वेळी लाटांच्या लहरींवर हेलकावे खात असतात.

अशा वेळी त्यांना छानपैकी न्याहाळता येते. त्यांचे सुंदर भावपूर्ण डोळे, त्या डोळय़ांतली बब्बुळे, पाठीवरचा सफेद राखाडी रंग ल्यालेल्या पिसांचा पोत, लालचुटूक चोच, सारेच मनोहारी!

छायाचित्रकारांना निराश न करणारे म्हणून सीगल्सचा बराच बोलबाला आहे. एरव्ही कुठल्याही पक्ष्याचे छायाचित्रण करायचे असल्यास आपल्याला बरीच तयारी करावी लागते; म्हणजे निसर्गाशी मिळते-जुळते रंग असणारे कपडे घालणे, डोक्यावर टोपी घालणे, लेन्सही पक्ष्यांना सहज दिसेल, असे न ठेवणे, शक्यतो टेलिफोटो लेन्स वापरणे इत्यादी गोष्टी. थोडक्यात असे की, ज्या पक्ष्यांचे छायाचित्रण घ्यायचे आहे त्याला छायाचित्रकाराचेच नव्हे, तर त्याच्या कॅमेरा लेन्सचेही अस्तित्व जाणवू न देणे.

सीगल्सच्या बाबतीत मात्र मामलाच उलटा!

‘तुम्हाला माझे फोटो घ्यायचेत ना? मग घ्या की! किती जवळ येऊ मी तुमच्या?’ असेच जणू तो विचारत असतो! अन् हे खरे आहे. अर्थात तो बिचारा तुमच्या जवळ येतो ते या अपेक्षेने की, तुम्ही त्याला काहीतरी खाद्य देत असाल, यामध्येसुद्धा तो स्वत:ला सुरक्षित ठेवूनच तुमच्या जवळ येतो. साधारण ७०-१२० किंवा १००-३०० मिलीमीटरची टेलिफोटो झूमलेनस सीगल्सचे छायाचित्रण करण्यास खूप झाली. पण काही वेळेला ते आपल्या एवढे जवळ येतात की, आपली टेलिफोटो लेन्स कॅमेऱ्यातून काढून साधी नॉर्मल लेन्स, पन्नास मिलीमीटरसुद्धा पुरते. अन्यथा ३५-७० मिलीमीटरची झूमलेन्स पुरेशी होती.

एक गोष्ट समुद्रात लाँचमधून सीगल्सचे फोटो काढताना लेन्सला पोलरायझिंग फिल्टर (काचेची विशिष्ट गाळणी) लावल्यास निळे आकाश, निळेशार पाणी अन् यांच्यामध्ये पांढरा शुभ्र सीगल पक्षी, अशा निळय़ा पार्श्वभूमीवर सीगलचा सफेद रंग ‘उघडून’ बाहेर येतो आणि एक अप्रतिम छायाचित्र तुमच्या संग्रही जमा होते. अर्थात त्यासाठी ‘डीएसएलआर’ पद्धतीचा म्हणजेच नेहमीचा छायाचित्रकाराकडे दिसणारा कॅमेरा तुमच्याकडे असायला हवा. तो परिणाम तुम्हाला मोबाइल कॅमेऱ्यात तेवढय़ा प्रकर्षांने मिळणार नाही.

केवळ सीगल्सचे छायाचित्रण करण्यासाठी मुंबईच्या फोर्ट भागात असणारी ‘फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया’ ही संस्था हिवाळय़ात, मुद्दाम, सभासदांसाठी फोटो-सहली आयोजित करते. हेतू हा की, सीगलसारख्या देखण्या पक्ष्यांचे मनमुराद छायाचित्रण सभासदांनी करावे. अर्थात यासाठी फक्त लाँचमधून समुद्र सफर करण्याची गरज नाही. मुंबईची चौपाटी, मढ मार्वे, गोराई, केळवे, पालघर येथील समुद्रकिनारा अशाही विविध ठिकाणी फोटो-सहली घेतल्या जातात.

समुद्रकिनाऱ्याव्यतिरिक्त खेडेगावातले तलाव-तळी, नदी-नाले येथेही सीगल्सचा थोडय़ाफार प्रमाणात अधिवास असतोच, तेथेही त्यांचे दृष्टीसुख मिळते.

Email : pneenad@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 1:59 am

Web Title: amazing facts about seagulls seagull birds at gate way of india zws 70
Next Stories
1 पोटाच्या तक्रारींवर अळीव ठरतील रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे
2 diwali Recipes : करंज्या फुटू नयेत म्हणून वापरा ‘ही’ टेक्निक
3 WhatsApp Pay येताच NPCI ने घातली UPI ट्रान्झॅक्शनवर मर्यादा
Just Now!
X