काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ या कंपनीत फेसबुक आणि अन्य काही परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केली होती. त्यानंतर आता अ‍ॅमेझॉन ही ई-कॉमर्स कंपनी भारती एअरटेलमध्ये २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या भारती एअरटेलमधील काही हिस्सा खरेदी करण्याचा हा व्यवहार सुरूवातीच्या टप्प्यावर असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्यवहाराशी निगडीत काही सूत्रांनी याबाबत माहिती दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर हा व्यवहार पूर्ण झाला तर अ‍ॅमेझॉन भारती एअरटेलमधील ५ टक्के हिस्सा हा बाजारभावानं खरेदी करणार आहे. रॉयटर्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एअरटेल ही भारतातील तिसरी सर्वाक मोठी टेलिकॉम कंपनी असून सध्या एअरटेलचे ३० कोटी ग्राहक आहेत. सध्या जागतिक बाजारपेठेतील काही मोठ्या कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. अशावेळीच हे वृत्तही समोर आलं आहे. रिलायन्स जिओ ही एअरटेलची प्रतिस्पर्धी कंपनी आहे. रिलायन्स जिओमध्ये महिन्याभराच्या कालावधीतच फेसबुक, केकेआर आणि अन्य कंपन्यांच्या माध्यमातून १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे.

दरम्यान, एअरटेल आणि अ‍ॅमेझॉनशी निगडीत तीन पैकी दोन सूत्रांनी हा व्यवहार सुरूवातीच्या टप्प्यात असल्याची माहिती दिली. तसंच या व्यवहाराच्या अटी बदलूही शकतात किंवा हा व्यवहार पूर्णही होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. सध्या हा व्यवहार गोपनीय ठेवायचा असल्या कारणानं सूत्रांनी आपली माहिती उघड केली नाही.

अॅमेझॉन सध्या अनेक गुंतवणुकीच्या पर्यायांवर विचार करत आहे. यामध्येत ८ ते १० टक्क्यांपर्यंतचा हिस्सा खरेदी करण्याचाही पर्याय सामिल असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसंच जिओनं सध्या केवळ मोबाईल प्लॅटफॉर्मवरून डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित कंझ्यूमर प्लॅटफॉर्मवर बदल केला आहे. एअरटेलही तसं करू शकतं, असं सूत्रांनी स्पष्ट केलं.

अ‍ॅमेझॉन, भारती एअरटेलचा नकार

दरम्यान, भविष्यातील अनुमानांवर कंपनी कोणतंही भाष्य करत नाही, अशी प्रतिक्रिया अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली. तर सर्व डिजिटल कंपन्यांचं नियमित काम आपला प्रोडक्ट, कॉन्टेंट आणि सेवा ग्राहकांना देणं इतकंच आहे. त्याव्यतिरिक्त सध्या सांगण्यासारखं काही नाही, असं एअरटेलकडून सांगण्यात आलं.

अ‍ॅमेझॉनसाठी भारत ही एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ आहे. तसंच ई कॉमर्स क्षेत्रात कंपनी विस्तार करण्याच्याही प्रयत्नात आहे. सध्या कंपनीनं भारतात वॉईस अ‍ॅक्टिव्हेटेड स्पीकर्स, व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि क्लाऊड स्टोअरेजद्वारे डिजिटल सर्व्हिसेसचा विस्तार केला आहे. सध्या देशातील वाढत्या इंटरनेट आणि स्मार्टफोन युझर्सपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा मानस आहे.