पर्यटन विशेष
करिअर, नोकरीसाठी जाणाऱ्यांची अमेरिका आपल्याला माहीत असते. पण त्यापलीकडे पर्यटनासाठीदेखील हा देश अत्यंत सृमद्ध आहे.

आम्ही ईस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट अशी सगळी अमेरिका पाहण्यासाठी केनेडी विमानतळावर उतरलो. आन्हिक उरकून जवळच असलेले सेंट्रल पार्क पाहायला गेलो. ८४३ एकरांवर वसलेले हे पार्क सरोवराच्या भोवती आहे. १८५७ मध्ये पूर्ण झालेल्या या पार्कच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ३६ पूल आहेत. त्याची मालकी न्यूयॉर्क सिटी डिपार्टमेंटकडे आहे. सेंट्रल पार्क काँझव्‍‌र्हन्सी ही संस्था पार्कची देखभाल करते. लहान मुलांना घेऊन आलेले, सतरंज्या टाकून झाडाखाली पहुडलेले लोक निवांत होते. लहान मुलांच्या हातात वेगवेगळ्या रंगांचे बर्फाचे गोळे होते.  येथे थंडी असते आणि या सरोवरातील पाण्याचा बर्फ होतो तेव्हा इथली मुले आईस-स्केटिंग करण्याची मजा लुटतात. येथे ओपन अ‍ॅम्फी थिएटर, बेल्वेद्रे कॅसल  नावाचे नेचर सेंटर आणि प्राणिसंग्रहालय आहे.

दुसऱ्या दिवशी प्रथम आम्ही स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा पाहण्यास जाणार होतो. ठरावीक ठिकाणी गेल्यानंतर क्रुझने जावे लागणार होते. क्रुझने प्रथम येते ते एलिस आर्यलड. हे पूर्वी इमिग्रेशन सेंटर होते. १८९२ सालापासून स्पॅनिश, फ्रेंच लोक अमेरिकेत आले, त्यांच्या नोंदी येथे सापडतात. साधारणपणे १९५४ पर्यंतच्या नोंदी येथे सापडतात. एलिस आर्यलड ओलांडले की येते लिबर्टी आर्यलड. इथेच स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा आहे. त्याची कथा अशी की, १८६५ मध्ये एडवर्ड दी ल्यॅबोयुले या फ्रेंच माणसाला वाटले की, अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून १०० वर्षे पूर्ण झाली त्याप्रीत्यर्थ एखादे स्मरणचिन्ह द्यावे. अमेरिकेने ते मान्य केले. त्यासाठी लागणारी जागा आणि चौथऱ्यापर्यंतचे बांधकामही करून दिले. आयफेल टॉवर आणि स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याचा आर्किटेक्ट एकच आहे. १८८४ साली हा पुतळा पूर्ण झाला. जून १८८५ मध्ये तो समुद्रमार्गे न्यूयॉर्कला आणला गेला. तांब्याचे ३५० तुकडे एकमेकांना जोडून हा पुतळा तयार केला आहे. चौथऱ्यापासून ३०५ फूट उंच आहे. चौथऱ्यावर जाऊन अधिक जवळून हा पुतळा पाहायचा असेल तर अगोदर अमेरिकन सरकारची परवानगी काढावी लागते. या पुतळ्याच्या शिल्पकाराचे नाव आहे. ‘फ्रेडरिक लिब्रेटास’. रोमन देवतेचे हे प्रतीक आहे. तेथून परतताना एलिस आर्यलड ओलांडून क्रुझने परत आलो. क्रुझ जेट्टीवर येते तेव्हा दोरखंडाने बांधतात. तेव्हा एकदाही आरडाओरडा ऐकू येत नाही. पाणी कधी अंगावर उडत नाही. क्रुझ ते जेट्टीला जो रॅम्प लावतात तोदेखील अगदी योग्य लावलेला दिसतो. मला त्याच्या अचूकपणाचे कौतुक वाटले. बसने आम्ही आता परतू लागलो होतो. वाटेत न्यूयॉर्क सिटीत उतरलो. पायी चालत वॉल स्ट्रीटवर गेलो. या शेअर बाजारावर जगातल्या आर्थिक उलथापालथी होत असतात. न्यूयॉर्कमध्ये अतिश्रीमंत लोक दिसतात तसे फाटके कपडे घातलेले लोकही दिसतात. गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी होते, तेव्हा सांभाळून राहण्याची सूचना आम्हाला होती. ऑफिस सुटण्याच्या वेळेस येथे रस्त्यावर बरीच गर्दी असते. एरवी शांत वाटले. येथे न्यूयॉर्क एक्स्चेंज, अमेरिकन स्टॉक एक्स्चेंज, अ‍ॅकॅडमी थिएटर लांबूनच पाहिले. न्यूयॉर्क तसे दाट लोकवस्तीचे शहर म्हणूनच इथे मेट्रो फिरताना दिसते नाहीतर अमेरिकेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आढळत नाही. इथे स्वत:चे वाहन असणे अत्यंत आवश्यक बाब आहे. प्रत्यक्षात भटकताना रस्ते ओलांडत असाल तर गाडय़ा कचकन् ब्रेक लावून थांबत आणि चालक हसत सावकाश रस्ता ओलांडण्याची खूण करी. युनायटेड नेशन्स् बिल्डिंग, फिफ्थ अ‍ॅव्हेन्यू, मॅनहॅटन सिटी (हे येथील डाऊन टाऊन सिटी) पाहात होतो. ‘वन ऑब्झव्‍‌र्हेटरी’ पाहायला गेलो. ही १०३ मजली काचेची उत्तुंग इमारत पाहताना मान उंच करून दुखू लागली. लिफ्टमध्ये प्रवेश केल्याबरोबर लगेच नाईन इलेव्हनचा हल्ला कसा झाला याची रेकॉर्ड लागली. तीन मिनिटांत आम्ही १०३ व्या मजल्यावर पोहोचलो. चकित होऊन पुढे गेलो तर ग्रुपने फोटो काढण्याचे सेशन सुरू होते. तसेच पुढे सरकलो तर एका बंदिस्त अंधाऱ्या खोलीत असल्याचा भास होत होता. आमचे डोळे विस्फारले होते. नाईन इलेव्हनचा हल्ला कसा झाला, त्यात नुकसान किती झाले, शहीद झालेल्यांची संख्या आणि आता नवे वर्ल्ड ट्रेड सेंटर कसे मजबूत बांधले आहे, त्याला येणारा खर्च किती होता वगैरे इत्थंभूूत माहिती पडद्यावर दाखवली. आश्चर्य, विस्मय आणि अविश्वास या भावनांच्या धक्क्यातून सावरायला किंचितसा वेळ द्यावा लागला. सगळे अजबच वाटत होते. समोर हडसन नदी व छोटय़ा छोटय़ा बोटी दिसत होत्या. १०३ व्या मजल्यावरून न्यूयॉर्क सिटी चोहीकडून पाहता येत होती. न्याहळता येत होती. लिफ्टने खाली आलो. आता गाईडने जुने (पूर्वीचे) वर्ल्ड ट्रेड सेंटर पाहायला नेले. अमेरिकेने केवळ आठ ते दहा महिन्यांच्या कालावधीत नवीन ट्रेड सेंटर पहिल्यापेक्षाही मोठे बांधले. पूर्वीच्या इमारतीच्यासमोर हे नवे ट्रेड सेंटर उभे आहे. आता जुन्या वर्ल्ड ट्रेड सेंटरपाशी आलो. या इमारतीच्या पायाभरणीतून कारंजे उभे केले आहे. त्याच्या मागील भिंतीवर फिनिक्स पक्षी भरारी मारत असल्याचे स्टीलचे शिल्प आहे. त्यांना जणू हेच सांगायचे आहे की, आम्ही पुन: अशीच (फिनिक्स पक्ष्याप्रमाणे) भरारी मारू. चौथऱ्यावर शहीद झालेल्या लोकांची नांवे कोरलेली आहेत. ९ नोव्हेंबरला त्यांच्या स्मरणार्थ येथे मेणबत्त्या लावल्या जातात.

एव्हाना संध्याकाळचे सात-साडेसात वाजले होते. त्यामुळे जेवलो आणि टाईम स्क्वेअरला गेलो. येथे निऑनच्या जाहिराती झळकत होत्या. डोळे दिपत होते. मोबाईलच्या, काही प्रॉडक्ट्सच्या, दारूच्या जाहिराती वेगवेगळ्या रंगांच्या दिव्यांनी उघडझाप करत झळकत होत्या. पण थोडय़ाच वेळात ते बटबटीत वाटू लागले आणि तो चकचकाट नकोसा वाटू लागला. हॉटेलवर आलो. सफारीतील तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टनला जायचे होते. बसच्या चार तासांच्या प्रवासानंतर वॉशिंग्टनला पोहोचलो. तेथे स्मिथ-सोनियन एअर स्पेस म्युझियम पाहिले. राईट बंधूंना विमान तयार करण्याची कल्पना कशी सुचली, त्याचे मॉडेल पाहायला मिळते. पुढे, पहिल्या महायुद्धात जे रोटरी इंजिन बनविले होते त्याची रिप्लिका इथे आहे. तसेच निरनिराळ्या देशांतील वैमानिकांचे आणि सैनिकांचे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील वापरलेले पोशाख. तसेच त्यांची शौर्यपदकेपण आहेत. दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या डग्लास् विमानाची प्रतिकृती ठेवलेली आहे. प्रॅट अ‍ॅण्ड व्हिटनी जेटी थ्री (Pratt & Whitney Jt3) हे सुपरसॉनिक स्पीड वाढविणारे पहिले इंजिन आहे, त्याची प्रतिकृती येथे आहे. कावळा हा आपल्या दृष्टीने दुर्लक्षित पक्षी. पण त्याचेदेखील संशोधन केंद्र इथे आहे. प्रथम मला वाटले, हे काय पाहायचे? कारण भारतीय लोकांची मानसिकता अशी की, पिंडदान असते तेव्हाच त्या पक्ष्याला महत्त्वे. पण येथे वाचून मला कळले की, कावळा एक ते सात वस्तू मोजू शकतो आणि हा पक्षी बुद्धय़ांक चाचणीत चांगल्यापैकी उत्तीर्ण होऊ शकतो. लगेच मनात विचार आला, ‘अमेरिकेत लोक कशावर संशोधन करतील, कशाकशाचा अभ्यास करतील याचा काही नेम नाही.’ आता पोटात कावळे ओरडू लागले म्हणून लंचला गेलो.

नंतर आम्ही सिटी टूर घेतली. त्यात प्रथम पेंटॉगॉन म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स अशी तिन्ही कार्यालये आहेत. अमेरिकन सिनेट (पार्लमेंट) पाहिले. नंतर व्हाईट हाऊसला गेलो. सफेद संगमरवरी फरशीत मार्टिन लुथर किंग ज्युनिअर यांचे येथे मेमोरिअल आहे आणि त्यांचे भाषण पायऱ्यांवर उद्धृत केले आहे. हे मेमोरिअल १६ ऑक्टोबर २०११ पासून खुले करण्यात आले. पुढे गेलो तर लिंकन मेमोरिअल होते. अमेरिकेचे १६ वे राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच्या स्मरणार्थ बांधलेले आहे. १९२२ साली हे मेमोरिअल जनतेसाठी खुले केले. सर्व इमारत संगमरवरी आहे. लिंकनचा बसलेला पुतळा आहे. त्यासमोर मार्टिन लुथर किंगचे मेमोरिअल आहे. हे सर्व सरळ एकाच रेषेत आहे. बाहेरील बाजूस स्तंभ आहेत. ते १९१४ साली अमेरिकन युनियनमध्ये असलेल्या ३६ राज्यांचे प्रतिनिधित्व करतात.

आम्ही थोडे बाजूला आलो. आता गाईड आम्हाला झेंडय़ाबद्दल सांगत होता. त्यात तांबडय़ा आणि पांढऱ्या मिळून १३ आडव्या पट्टय़ा आहेत. ज्या १३ स्टेटस्नी एकत्र येऊन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) स्थापण्याचा निर्णय घेतला ते आणि निळ्या आयताकृती भागात ५० स्टार्स आहेत ते म्हणजे नंतर काही राज्ये त्यात सामावू इच्छित होती ती राज्ये. पहिल्या १३ राज्यांनी ठरविले की, वॉशिंग्टन हे आपले राजधानीचे शहर असावे आणि यासाठी जवळच्या प्रत्येक राज्यांनी थोडी थोडी भूमी देऊ केली. हा भाग म्हणजे आपल्याकडे दिल्ली जसे केंद्रशासित प्रदेश आहे तसा ओळखला जातो. असा भलामोठा भूखंड असलेला देश.

सिनेटशेजारी लगेचच ओबामांचे घर आहे. ते लांबूनच दाखविण्यात आले. वॉशिंग्टनमध्ये सगळ्या जुन्या इमारती आहेत. या इमारतींपेक्षा उंच इमारती बांधायच्या नाहीत असा या शहराचा नियम आहे. येथे त्यांचे चलन म्हणजे डॉलर छापण्याचा कारखाना आहे.

दुसऱ्या दिवशी आम्ही नायगाराला जाणार होतो. आमच्या सफरीतील हा पाचवा दिवस, आताचा प्रवास सात ते आठ तासांचा होता. बसमधून बाहेर डोकावू लागलो. बाहेरचे वातावरण छान होते. सगळीकडे हिरवे हिरवे दिसत होते. हिरवा रंग डोळ्यांना आल्हाददायक वाटतो. हर्षेजची पब्लिक स्कूल आली. आम्ही त्या परिसरातून जात होतो. हर्षेज चॉकलेट कंपनीने तेथील काम करणाऱ्या लोकांच्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर जायला लागू नये म्हणून त्या परिसरातच सोय केली आहे. आजूबाजूला गायी चरताना दिसत हात्या. त्यांचे दूध चॉकलेट बनविण्याच्या कामी येत होते. आता बसमधून उतरून चॉकलेट फॅक्टरी पाहायला गेलो. काचेतून आम्हाला त्याचे प्रोसेसिंग दिसत होते. चॉकलेटच्या बिया असतात, त्या रोस्ट करतात, त्याची टरफले बाहेर टाकली जातात. मग त्या बियांचे तुकडे तुकडे होतात. त्यानंतर त्याची पावडर बनवतात. मग एका मोठय़ा पसरट भांडय़ात दूध, साखर आणि चॉकलेटची पावडर एकत्र करून त्याचे तीन ते चार वेळा ब्लेंडिंग होते. ते दाट बनते. मग वेगवेगळ्या आकारात चॉकोलेट बनतात. त्यांचे पॅकिंग होते. हे पाहून आम्ही बाहेर आलो. त्यांनी आम्हाला एक एक चॉकलेट देऊ केले. नंतर त्याची विक्री होते त्या शॉपमध्ये गेलो. तेथे त्याचे व्हाइट चॉकलेट, नटस्, स्नॅकबार, चॉकलेट स्प्रेड, डार्क चॉकलेट अशी विविध प्रकारची हर्षेज चॉकलेटस् ठेवलेली होती. सर्वानीच बरीच चॉकलेटस् खरेदी केली.

कॉर्निग ग्लास फॅक्टरी पाहायला गेलो. तेथे काच कशी तयार करतात आणि त्यापासून तरतऱ्हेच्या आकर्षक वस्तू कशा बनवतात हे पाहायला मिळाले. उदा. नानारंगी, वेगवेगळ्या आकारांची फुले होती तशीच काचेची छोटी कर्णफुलेही होती, फ्लॉवर पॉटस्ही होते, बोल्स आणि वेगवेगळ्या आकाराच्या डिनर डिशेस होत्या. आम्ही कोणी फारसे काही घेतले नाही कारण नाजूक आणि घेऊन जाण्यास जड वस्तू. इथून काढता पाय घेतला आणि बसमध्ये बसलो.

आता नायगारा पाहण्याची सर्वाचीच सुप्त इच्छा पूर्ण होणार होती. साधारण १५० वर्षे झाली असतील, हा नायगाराचा प्रपात पाहण्यास लोक येत आहेत. पण एकदाही प्रपाताचा प्रवाह कमी झाल्याचे ऐकिवात नाही. आम्ही गोट आर्यलडवर आलो होतो. दुसरे दिवशी सकाळी गोट आर्यलडवरून अमेरिकन आणि ब्रॅडल असे दोन्ही फॉल गरजताना पाहिले. तोंडाचा आऽऽऽ काही मिटत नव्हता. तेवढय़ात गाईड आमच्यासाठी ‘केव्ह ऑफ द विंडस्’ची तिकिटे घेऊन आला. लिफ्टने आम्ही २०० फूट खोल गेलो आणि अर्धा फर्लाग बोगद्यातून गेलो तेव्हा मला पुणे-मुंबई बोगद्यातून जाताना पाणी झिरपताना आढळते तसे इथे मात्र आढळले नाही. बोगद्यात दिव्यांची सोय उत्तम होती. बोगद्यातून बाहेर आल्यावर आम्हाला एक पातळसर रेनकोट देण्यात आला. तो अंगात चढवला. पाऊस पडत होता. झोंबणारा वारा होता. चिंब भिजलो होतो. पण त्याची कोणीच कदर करत नव्हते. पुढे गेलो. स्टीलच्या पायऱ्या होत्या. त्यावर मॅट आणि दोन्ही बाजूला स्टीलचा कठडा. कुणी पडू नये, सटकू नये म्हणून ही घेतलेली काळजी, खबरदारी होती. इथून ब्रिडल व्हेल फॉल पूर्णपणे दिसत होता. हनीमूनला येणारी जोडपी खूप होती. ब्रिडल म्हणजे नववधू आणि व्हेल म्हणजे ख्रिश्चन लोकांत जो नववधूने घातलेला पांढरा झगा असतो तो. म्हणजे हा फॉल त्याप्रमाणे दिसतो असे सुचवायचे आहे. त्याच्या शेजारी दुसरा अमेरिकन फॉल. ब्रिडल व्हेलपेक्षा जास्त रुंद. येथे आम्ही बरेच फोटो काढले आणि वरती आलो. मधल्या वेळेत गाईडने दुसरे तिकीट काढले होते. या खेपेला लिफ्टने आम्ही ४०० फूट खोल गेलो. तिथे पण बाहेर पडल्यावर निळ्या रंगाचा पातळ रेनकोट दिला. तो अंगात चढवला आणि क्रुझमध्ये बसलो. या क्रुझचे नाव होते ‘मेड ऑफ इ मिस्ट’ पुढे जात होतो. हॉेर्स शो फॉल अगदी जवळून पाहायला मिळणार होता. दव तर अंगावर पडत होते. गार गार वाटत होते पण क्षणात ऊन पडले. त्याच क्षणी डबल इंद्रधनुष्य दिसले. निसर्गाचे सप्तरंग मन भारावून गेले. क्रुझ आणखी पुढे गेली. आता अगदी जवळून पाण्याचा दुधाळ प्रवाह, शेजारी ओसीअन ग्रीन प्रवाह आणि त्यातूनच निघणारा ओसीअन ब्ल्यू प्रवाह हे पाहून निशब्द झालो. अंगावर पडणाऱ्या दवामुळे शिरशिरी येऊ लागली. इथून तिन्ही फॉल एकत्र पाहायला मिळाले. आता क्रुझ गोल फिरून परतीच्या दिशेने निघाली. शेवटी परत गोट आर्यलडला आलो. सर्वाना गरमागरम चहा मिळाला. त्यामुळे सर्वाना थोडी तरतरी आली. लगेच लंच घेतले. पुढे कॅनडाला जायचे होते. ज्या लोकांना कॅनडाचा व्हिसा मिळाला नव्हता ती मंडळी थोडी हिरमुसली. पण गाईडने त्यांना दुसरा पर्याय दिला. या लोकांनी हेलिकॉप्टर राईडवर समाधान मानले. पण ज्यांना व्हिसा मिळाला होता ते बसने कॅनडाच्या दिशेने निघाले. हा प्रवास फक्त अध्र्या-पाऊण तासांचा होता. नायगाराहून रेनबो ब्रीज ओलांडावा लागतो की लगेच कॅनडा येते. तिथेही चेक-इन, पासपोर्ट, व्हिसा, इमिग्रेशन, सिक्युरिटी या सर्व प्रकारातून जावे लागते. ती पूर्ण झाल्यावर बसने थोडे पुढे गेलो तर लगेच समोर अमेरिकन, बॅडलव्हेल आणि हॉर्स शू असे तिन्ही फॉल कॅनडातून दिसतात. संध्याकाळ होत आलेली. त्यामुळे धुकं पडलेले होते. समोर पाहून तोंडातून ‘ऑऽऽसम, क्या कुदरत की देन है’ अशी कितीतरी विशेषणे बाहेर पडली. हा धबधबा १७४ फूट उंचावरून पडतो आणि याची रुंदी आहे ५१२ फूट. जगातील दुसऱ्या नंबरचा फॉल. पहिला नंबर आफ्रिकेतील फॉलचा आहे. कॅनडातून पाहिले की भव्यता अधिक जाणवते. प्रथमदर्शनीच मोहात पाडायला लावणारा असा हा नायगारा!

पुढे जवळच स्कायलॉन टॉवर आहे. हे जवळजवळ ५२० फूट उंच आहे. १०० ते १०१ मजल्याची काचेची भव्य इमारत. त्यावरूनही हा फॉल दिसतो. वर्णनास शब्द अपुरे पडतात. आता परत नायगाराला जाण्यासाठी चेक-आऊट, सिक्युरिटी, पासपोर्ट, व्हिसा, इमिग्रेशन या प्रकारांतून बाहेर पडावे लागते.

हेलिकॉप्टर राईड घेतेलली मंडळी आमची वाट पाहत होती. सर्वाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. गाईड म्हणाला, ‘‘चला, आता परत गोट आयलंडवर जाऊ. तेथून आपल्याला रोषणाई दिसणार आहे.’’ रात्री १० वाजता कॅनडातून ही विद्युत रोषणाई आणि आतषबाजी करतात, पण नायगाराहून ती अधिक सुरेख दिसते. आम्ही जागा पकडण्यासाठी रात्री नऊपासूनच जाऊन बसलो होतो. प्रथम फटाक्यांचे स्फोट झाले. मग आकाशात रंगीबेरंगी फुलबाज्यांच्या रांगोळ्या काढल्यासारख्या दिसत होत्या. आपल्याकडे दिवाळीत जशी दारू आकाशात उडवतात, त्याचे वेगवेगळे रंगीत आकार पाहायला मिळतात तशाच प्रकारचे होते.

इथे जवळपास द्राक्षांचे मळे आहेत म्हणून बऱ्याच वायनरीज् आढळतात. शिवाय या फॉलच्या परिसरात इलेक्ट्रिक पॉवर प्लांटस् उभे आहेत ज्यायोगे दोन-चार दक्षलक्ष किलोवॅट वीजनिर्मिती होते. ही वीज सर्वात स्वस्त आहे. ही वीज पाच-सहा स्टेटस्ना पुरवली जाते. या सर्वाचे फलक त्या प्लांटमध्ये पाहायला मिळतात. तसेच चित्रफीत पण दाखवली जाते. त्यामुळेच भारतात जशी वीजकपात वगैरे आहे तशी इथे नाही.

आमच्या सफरीतील हा सहावा दिवस होता. आम्ही नायगाराहून विमानाने शिकागोला चाललो होते. विमानात बसताच माझे मन शिकागोबद्दल विचार करू लागले. कधीतरी वाचलेले आठवले. शिकागोला बरीच शैक्षणिक विद्यापीठे आहेत. शिकागोला खूप पूर्वीपासून शैक्षणिक केंद्र मानले जाते. जसे पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणतात, तसेच त्यात आता आणखी नवी विद्यापीठे झाली आहेत. पूर्वीपासून देशोदेशीचे विद्यार्थी येथे शिकायला येतात. आता तर ऑनलाइन परीक्षा देतात, स्कॉलरशिप मिळवतात आणि इथे नव्या प्रकारचे शिक्षण घेतात. शिक्षण फार महागडे असते म्हणून स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करतात. ही मुले शिक्षणासाठी खूपच कष्ट घेतात. काही मुले एकाच वेळेस दोन दोन परीक्षा देतात; जेणेकरून लवकर शिक्षण पूर्ण करून पैसा मिळू शकेल. शिक्षण घेत असताना पार्टटाईम नोकरीही करत असतात, जेणेकरून स्कॉलरशिप पुरी पडू शकेल. पुढे ही मुले अमेरिकेत पैसा मिळविण्यासाठी राहतात आणि येथेच स्थायिक होताना आपल्याला आढळतात. त्यांनी इथे अपार कष्ट केलेले असतात, हा विचार करताना शिकागो कधी आले हे कळलेदेखील नाही. इलिनॉईस स्टेटमधील मिशिगन लेकवर हे शहर वसलेले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकावर असलेले हे शिकागो शहर. शिकागोला ‘विंडी सिटी’ असेही संबोधिले जाते. कारण इथे वाऱ्याचा वेग प्रचंड असतो. आणि म्हणूनच काही वेळा इथे विमानाचे प्रयाण उशिरा होते तर कधी कधी विमान प्रयाण रद्दही करावे लागते. पूर्वी इथे फक्त नेटिव्ह अमेरिकन होते. सिव्हिल वॉरनंतर ते यू.एस.ए.मध्ये विलीन झाले. १८७१ मध्ये या शहराला मोठी आग लागली. त्यात निम्म्याहून अधिक गाव उद्ध्वस्त झाले. त्यानंतर त्या शहराचे पुनर्वसन करतेवेळी मात्र आर्किटेक्टची मदत घेतली आणि त्यानुसार नव्या इमारती बांधल्या गेल्या.

आम्ही एअरपोर्टवर आल्या आल्याच आमची सिटी टूर सुरू झाली. गाईडने उजवीकडे पाहत भारतीयांना अभिमान वाटेल अशा वास्तूकडे बोट दाखवले. ती वास्तू होती स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत जे पहिले भाषण केले तो हॉल. पुढे गेलो तसे शिकागो शहर गलिच्छ वाटले म्हणजे जिकडे तिकडे कचरा टाकलेला. पुढे गेल्यावर बसमधून उतरलो अािण एका क्रुझमध्ये बसलो. आता आम्हाला तेथील लोकल गाईडकडे सोपवले गेले. तो इंग्रजीतच माहिती देत होता. जगातील बँकिंग क्षेत्रातील मुख्य कार्यालये इथे आहेत. तसेच इथे विमा क्षेत्रातील कार्यालये आहेत. हा बिझनेस इथे मोठय़ा प्रमाणात चालतो. विमा वेगवेगळ्या प्रकारचे असतात तसे आपल्याकडेही आता आहेत म्हणा. उदा. लाईफ इन्श्युरन्स, मेडिक्लेम, फायर अ‍ॅण्ड अर्थ क्वेक इन्श्युरन्स् वगैरे. तसेच फायनान्समधील म्युच्युअल फंडस् शेअर ब्रोकिंग, इन्व्हेस्टमेंट फंड वगैरेची मुख्य कार्यालये येथे आहेत. हे सर्व दाखवून त्याने आम्हाला परत आणले.

आता आमची बस बकिंगहॅम फाऊंटनच्या दिशेने निघाली. येथील कारंजे खूप उंच उडते. पाण्याचे तुषार अंगावर पडताच हायसे वाटले कारण खूप उकडत होते. त्यानंतर बिलेनियम पार्कला गेलो. या पार्कचा एरिया खूप मोठा आहे. म्हणून थंडीच्या दिवसात बर्फ साठला की स्केटिंग करतात. याच पार्कमध्ये बिगबीन क्लाऊड गेट आहे. हे २०१० साली बांधले गेले. हे ६६ फूट लांब आणि ३३ फूट उंच आहे. त्याचे वजन ११० टन आहे. हे स्टीलचे स्ट्रक्चर असून आकार बीनचा आहे. येथे फोटो सेशन झाले. या बीनसमोर उभे राहिले की आंतरगोल आरसा आणि बर्हिगोल आरशासमोर जशी आपली प्रतिमा मोठी, छोटी, लठ्ठ दिसते तशी या बीनवर दिसते. पार्कमधून बाहेर पडलो. बसमधून पुढे विलिस स्काय डेकवर गेलो. ही १०८ मजली काचेची इमारत आहे. मान वर करून दुखू लागते. येथून शिकागोचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. सर्वात वरच्या मजल्यावर एक काचेचे प्रोजेक्शन केले आहे. त्यावर पाय ठेवून खाली पाहिले की आपण रस्त्यावर फूटपाथवरच उभे आहोत असा भास होतो. इतके आरपार दिसते. पहिल्या प्रथम थोडेसे घाबरायला होते.

दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो. आमचा डोमेस्टिक फ्लाईटचा दुसरा अनुभव होता. सहलीतील सातवा दिवस. हा प्रवास तासाचा होता. सामान घेऊन एअरपोर्टवरून बाहेर पडेपर्यंत दुपार झालेली होती. प्रिमियर मॉलला गेलो. तिथे वेगवेगळे ब्रॅण्डस्, वेगवेगळी शॉप्स होती. ते फिरून परत हॉटेलवर पोचलो. दुसरे दिवशी म्हणजे प्रवासातील आठव्या दिवशी सकाळी केनडी स्पेस सेंटर पाहायला जाणार होतो. केनडी स्पेस सेंटर हे एका द्वीपकल्पावर आहे. जाताना आम्हाला बऱ्यापैकी झाडे दिसली. रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ होती. प्रवेशद्वारापाशी बोधचिन्हाने लक्ष वेधून घेतले. निळा मोठा गोल हा विश्वाचे आणि अंतरिक्षाचे प्रतीक. नासा ही अक्षरे पांढऱ्या रंगात. लाल भडक रंगात दोन रेषा एकत्र येऊन गोलाच्या बाहेर झेपावतात. हे बोधचिन्ह ज्याने सुचविले त्याचे कौतुक वाटते. तिथेच एक छोटे कारंजे आहे. त्यापाठीमागे जॉन एफ. केनडी यांचे पोस्टर लावले आहे. तेथे त्यांचेच उद्गार लिहिलेले आहेत. ते साधारणपणे असे आहेत, ‘‘आता जगाचे डोळे आकाशातील चंद्राकडे आणि त्या कक्षेबाहेरील ग्रहाकडे जाण्याच्या प्रयत्नात आहेत. पण हे करताना सर्वानी शत्रुत्वाची भावना न ठेवता स्वातंत्र्य आणि शांतता याचा आधार घेऊ या’’ हे एवढे पाहीपर्यंत गाईड आमच्यासाठी तेथील खास बसची तिकिटे घेऊन आला. आम्ही बसमध्ये चढलो. त्यात इंग्रजीतून रेकॉर्ड सुरू होणार होती, ज्यायोगे आम्हाला तेथील महत्त्वपूर्ण माहिती मिळणार होती. त्यामुळे ती लक्षपूर्वक ऐकणे सर्वानाच जरुरीचे वाटत होते. त्यामुळे एकदम शांतता पसरली. यानाची बांधणी झाल्यावर लाँचिंग पॅडपर्यंत त्याला नेणे सोपे नव्हते. त्यासाठी भला मोठा चौकोनी प्लॅटफॉम्र्स दिसत होता. याला क्रॉलर ट्रान्स्पोर्टर म्हणतात. याला मोठमोठाली चाके असतात. मजबूत रुळावरून ते लाँचिंग पॅडपर्यंत गेलेले असते. कोणत्या पॅडवरून उडवायचे हे हवामानावरून ठरविले जाते. नासाचा पसारा अवाढव्य होता. दुर्बिणीतून चोहोबाजूने पाहण्याची व्यवस्था होती. त्यात नाणी टाकावी लागत तरच त्यातून पाहायला मिळे. तिथे एक लाँच कंट्रोल सेंटरही होते. नासामधून उडणाऱ्या प्रत्येक अंतराळयानाचे नियंत्रण या सेंटरमधून होते. यान उडवण्यापूर्वी काऊंट डाऊन सुरू होते. यानाचे उड्डाण व्यवस्थित झाले की, आनंदाने लोकांचे डोळे पाणावतात. हे पाहायला जगभरातून लोक नासात येतात. त्यासाठी त्यांनी प्रेक्षकांची सोय केलेली आहे. यान जेव्हा उडते तेव्हा अग्नीचा प्रचंड झोत आसमंतात पडतो. प्रचंड वेगाने यान उडते आणि त्या यानाचे हळूहळू एक एक भाग गळून पडतात. यानंतर तिथल्या थिएटरमध्ये म्हणजे अपोलो आठ या शोमध्ये गेलो. येथे अमेरिकेचे जे यान चंद्रावर फेरी मारून आले त्या यानाची माहिती मिळते.

अपोलो ११ यानाची यशस्वी उड्डाणाची फिल्म दाखविण्यात आली. रॉकेट गार्डनमध्ये अपोलो मोहिमेतील रॉकेट प्रत्यक्ष पाहायला मिळाले. सुमारे साडेतीनशे फूट लांबीचे लोखंडी खांबाच्या स्ट्रक्चरवर तोललेले रॉकेट पाहून आपण थक्क होतो. दुसरीकडे अंतराळवीर वापरतात तो पोशाख, हेल्मेट, त्याखाली डोळ्यावर बसवलेला छोटा कॅमेरा, हातात ग्लोव्ज्, सिलेंडर. अंतराळवीरांचे बूट वेगळे असतात, तेही पाहायला ठेवले आहेत.

‘अ‍ॅस्ट्रोनॉट्स् मेमोरिअल’ या स्मारकाच्या ठिकाणाबद्दल गाईड सांगत होता. आम्ही गेलो नाही. अंतराळ मोहिमेत ज्यांना वीरमरण आले त्यांची नांवे काळ्या भिंतीवर कोरलेली आहेत. एकंदरीत नासाचा पसारा पाहून थक्क झालो होतो.
(क्रमश:)
छायाचित्र सौजन्य : विकिपीडिया
अंजली फडके – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा