आयफोन म्हटले की सगळ्यांच्याच भुवया नकळत उंचावतात. श्रीमंत लोकांचा फोन म्हणून ओळख असलेल्या या फोनच्या डिस्प्लेची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण आयफोन ८ या नव्याने बाजारात येणाऱ्या फोनच्या केवळ डिस्प्लेची किंमत ७५०० ते ८५०० रुपये असण्याची शक्यता आहे. आता ही किंमत इतकी जास्त असण्याचे कारणही तसेच आहे. या फोनला विशेष असा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आल्याने हा डिस्प्ले महाग आहे. ज्या किंमतीत अँड्रॉईड फोन उपलब्ध होतो त्या किंमतीचा आयफोनचा केवळ डिस्प्ले असेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. केजीआय सिक्युरीटीजचे विश्लेषक मिंग ची कुओ यांनी नुकतीच याविषयी माहिती दिली. याआधीच्या आयफोन ७ प्लसच्या एलसीडी डिस्प्लेची किंमत याच्या निम्मी होती.

ओएलईडी डिस्प्ले पुरविण्यामध्ये ठराविक पुरवठादारांचे वर्चस्व आहे. त्यामुळे अॅपल कंपनीला आपल्यासाठी दुसरा पुरवठादार शोधण्याची आवश्कता आहे. मात्र त्यासाठी काही कालावधी लागेल. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, तर ब्लूमबर्ग रिपोर्टने दिलेल्या वृत्तानुसार अॅपल आणि एलजी या कंपन्यांची ओएलईडी डिस्प्लेसाठी बोलणी सुरु आहेत. आयफोन ८ एलजीच्या ओएलईडी डिस्प्लेसोबत मर्यादित स्वरुपात २०१८ पर्यंत भारतात येईल. तर हा फोन सहज उपलब्ध होण्यास २०१९ साल उजाडेल. अशाप्रकारे नव्या डिसिप्लेमुळे आयफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. जवळपास ६४ हजारच्या आयफोनची किंमत या नव्या ओएलईडी डिस्प्लेमुळे जवळपास ७६ हजारांपर्यंत जाईल.

याशिवाय फोन अनलॉक करण्यासाठी आयफोनमध्ये ३ डी फेस स्कॅनर असणार आहे. त्याचबरोबर फोनमधील पुढच्या बाजूच्या होम बटणला पूर्णविराम देण्यात आला आहे. तसेच फोनचे साइड बेझेल्स काच आणि स्टीलचे असतील. आयफोन ८ येत्या १२ सप्टेंबर रोजी लाँच होणार असून, विशेष बाब म्हणजे फोनचे लाँचिंग अॅपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्ज थिएटरमध्ये होणार आहे.