Asus कंपनी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन ZenFone 6 आज लाँच करणार आहे. फोनच्या लाँचिंगसाठी स्पेनमध्ये एका इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री साडे अकराच्या सुमारास हा स्मार्टफोन लाँच केला जाईल. लाँचिंगचा इव्हेंट Asus च्या अधिकृत संकेतस्थळावरुन पाहता येणार आहे.

या स्मार्टफोनमधील कॅमेरा आणि त्याचा डिस्प्ले वेगळेपण ठरु शकतो. कारण, यामध्ये ‘फ्पिप कॅमेरा’ असण्याची शक्यता आहे. तसंच, नव्या स्मार्टफोनमध्ये शाओमी कंपनीच्या Xiaomi Mi MIX 3 प्रमाणे ‘स्लायडिंग डिस्प्ले’ असू शकतो अशीही चर्चा आहे.

कॅमेरा –
या फोनमध्ये ड्युअल फ्लिप कॅमेरा असू शकतो, पण सेल्फीसाठी यातील रिअर कॅमेऱ्याचाच वापर होईल. या ड्युअल फ्लिप कॅमेऱ्यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल आणि दुसरा कॅमेरा 13 मेगापिक्सलचा असू शकतो. कॅमेऱ्यासाठी Sony चा दर्जेदार IMX586 सेंसरचा वापर केला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

फीचर्स –
या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 SoC प्रोसेसर असणार आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये तीन सीम कार्डचा पर्याय असेल. फोनमध्ये तब्बल 5 हजार मिलिअँपिअर क्षमतेची बॅटरी असू शकते. 2019 च्या इतर कंपन्यांच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनप्रमाणे या फोनमध्येही 12GB पर्यंत रॅम, 256GB स्टोरेजचा पर्याय असेल. याशिवाय अन्य फीचर्सबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.