‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’सारख्या नवतंत्रज्ञानाने सर्व सामान्यांच्या जीवनात सुसह्यता आणण्याची स्वप्नं पाहणारे ख्यातनाम तंत्रज्ञ आणि ‘टेस्ला’ या ऑटोमोबाइल कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी अखेर भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रातील पदार्पणाबाबत आणि येथील योजनांबाबत मौन सोडलं आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर भरमसाठ प्रमाणात आयात शुल्क आकारलं जातं, आणि हा आयात शुल्काचा बोजाच ‘टेस्ला’ कंपनीच्या भारतातील पदार्पणासाठी अडचण ठरत आहे, असं इलॉन मस्क म्हणाले.

विशेष म्हणजे, प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला चालना देण्याचे केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यास 2.5 लाखांपर्यंत सवलत दिली जातेय. इलेक्ट्रिक वाहनांवरील 12 टक्के जीएसटीही 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे, पण देशातील कार कंपन्यांना सुरक्षा मिळावी यासाठी आयात केल्या जाणाऱ्या वाहनांवर 125 टक्के आयात शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आहे. त्यामुळे भरमसाठ आयात शुल्काबाबत नाराजी व्यक्त करताना, “मला असं सांगण्यात आलंय की भारतात आयात शुल्क खूप अधिक प्रमाणात आकारलं जातं, इलेक्ट्रिक गाड्यांवर देखील 100 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारलं जातं . यामुळे आमच्या कार लोकांना खरेदी करणं परवडणार नाही”, असं उत्तर इलॉन मस्क यांनी एका भारतीय विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला दिलं. ट्विटरद्वारे यशवंत रेड्डी नावाच्या एका हैदराबादच्या विद्यार्थ्याने इलॉन मस्क यांना भारतीय बाजारपेठेत ‘टेस्ला’ कार केव्हा पदार्पण करणार असा प्रश्न कुतुहलाने विचारला होता. त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना इलॉन मस्क यांनी भारतात आकारल्या जाणाऱ्या भरमसाठ आयात शुल्काला जबाबदार ठरवलंय.

मस्क यांच्या उत्तरावर लगेचच ‘टेस्ला क्लब इंडिया’ या नावाच्या ट्विटर हँडलने, “तुम्ही योग्य बोललात, तुमच्या उत्तराशी सहमत आहोत… इतक्या मोठ्या प्रमाणात कर आकारणीला काहीच अर्थ नाही. पण छोट्या वाहनांना असेंबल करण्याचा कारखाना चांगला पर्याय ठरु शकतो…काही दिवसांपूर्वीच सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील 12 टक्के जीएसटी 5 टक्क्यांवर आणलाय” अशा आशयाचं ट्विट केलं. ‘टेस्ला क्लब इंडिया’ हे अनधिकृत आणि केवळ टेस्लाच्या भारतातील चाहत्यांनी सुरू केलेलं ट्विटर अकाउंट आहे. त्यावर देखील इलॉन मस्क यांनी तातडीने उत्तर दिलं. “इतर देशांमध्ये आम्ही वेळेआधीच कार विक्री करतो आणि स्थानिक कारखान्यास काही प्रमाणात पैसे देतो. त्यामुळे मागणी कितीये याचीही कल्पना येते. पण भारतातील सध्याच्या नियमांमुळे अडचण होतेय. मात्र विक्री करात नुकत्याच झालेल्या बदलामुळे भविष्यात बदल घडेल अशी अपेक्षा आहे” अशा आशयाचं ट्विट इलॉन मस्क यांनी केलं.

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या महिन्यात आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मस्क यांनी, पुढील वर्षी म्हणजे 2020 पर्यंत भारतीय रस्त्यांवर टेस्लाच्या कार धावताना दिसू शकतात असं म्हटलं होतं.


दरम्यान, इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे लोकांचा कल वाढावा यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, यावरील 12 टक्के जीएसटीही 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे, पण देशातील कार कंपन्यांना सुरक्षा मिळावी यासाठी आयात केल्या जाणाऱ्या वाहनांवर सरकारकडून 125 टक्के आयात शुल्क आकारलं जातं.