करोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे जगभरातील कंपन्यांना मोठा फटका बसलाय. अमेरिकेतील प्रसिद्ध Gold Gym ने काही दिवसांपूर्वीच स्वतःला दिवाळखोर घोषीत केलं. त्यानंतर आता जगातील सर्वात मोठी कॅब सर्व्हिस पुरवणारी कंपनी उबरही (Uber) आर्थिक संकटात सापडलीये.

अ‍ॅप आधारित कॅब सर्व्हिस पुरवणाऱ्या Uber ने 3,700 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणा केली आहे. युएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमीशनमध्ये (एसईसी) कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली. “करोना व्हायरस महामारीमुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट आणि व्यवसायावर झालेला परिणाम, यामुळे कंपनीने खर्च कमी करण्याची योजना आखली आहे. यानुसार, कस्टमर सपोर्ट आणि रिक्रुटर्स टीममध्ये कपात केली जात आहे. एकूण 3 हजार 700 फुल-टाइम कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जाईल ” , असं कंपनीकडून सांगण्यात आलं. भविष्यात अजून कपात करावी लागू शकते असे संकेतही कंपनीने दिलेत.

“आमच्या राइड ट्रिप वॉल्यूममध्ये मोठी घट झाल्यामुळे कम्युनिकेशन ऑपरेशन्ससह इन-पर्सन सपोर्टची गरज अत्यंत कमी झालीये. त्यामुळे आता रिक्रुटर्सकडे देण्यासाठी काही काम नाहीये. आर्थिक संकटात सापडल्याने नाईलाजास्तव, पर्याय नसल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय” असं कंपनीचे सीईओ दारा खोसरोशाही यांनी कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलंय.

देशभरात लॉकडाउन असल्याचा मोठा फटका ट्रान्सपोर्ट आणि कॅब सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना बसलाय. त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे आणि आता हळूहळू त्याचा परिणाम दिसायला सुरूवात झाली आहे.