बाजारात सर्वाधिक ‘डिमांड’ असलेला फोन कोणता? असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्ही कदाचित तुमच्या आवडत्या फोनचं नाव घ्याल किंवा एखाद्या चर्चेत असलेल्या फोनचं नाव सांगाल. पण, असं नसतं. अनेकदा तो फोन अव्वल ठरतो ज्याबाबत आपण कधी विचारही केलेला नसतो. तर जाणून घेऊया जगभरात विक्रीच्या बाबतीत कोणता फोन बेस्ट ठरलाय…

काउंटरपॉइंटने मार्केट प्लस नावाचा ‘बेस्ट सेलिंग स्मार्टफोन’बाबत रिपोर्ट जारी केला असून या यादीत जगभरात सर्वाधिक विक्री झालेल्या 10 स्मार्टफोनच्या नावाचा समावेश आहे. या यादीनुसार, आयफोन एक्सआर iPhone XR हा स्मार्टफोन जगात सर्वाधिक विक्री होणारा फोन ठरला आहे. तर, गेल्या सप्टेंबर महिन्यात लाँच झालेला आयफोन 11 सर्वाधिक विकला जाणारा दुसरा फोन ठरला आहे. या यादीमध्ये अॅपलचे पाच आणि सॅमसंगचे चार फोन आहेत. याशिवाय, शाओमी कंपनीच्या रेडमी नोट 7 या स्मार्टफोनचाही समावेश झाला आहे.

या यादीनुसार, 2019 मध्ये iPhone XR च्या 463 लाख फोन्सची विक्री झाली. तर , आयफोन 11 चे 373 लाख फोन विकले गेले. याशिवाय सॅमसंग गॅलेक्सी ए10 चे 303 लाख, गॅलेक्सी ए50 चे 242 लाख, गॅलेक्सी ए20 चे 192 लाख, आयफोन 11 प्रो-मॅक्सचे 176 लाख, आयफोन 8चे 174 लाख, रेडमी नोट 7 चे 164 लाख, आयफोन 11 प्रोचे 155 लाख आणि गॅलेक्सी जे2 कोरचे 152 लाख फोन विकले गेले.