धुम्रपान हे आता व्यसन न राहता फॅशन बनले आहे. पण, सिगरेट जरी तणाव दूर होतो असे वाटत असले तरीसुद्धा त्याचा सर्वाधिक धोका मानवी स्मरणशक्तीला होत असल्याचे एका संशोधनात आढळले आहे.
धुम्रपान करणा-या व्यक्तीची रोज एक तृतीयांश स्मरणशक्ती लोप पावते. नॉर्थंब्रिया विद्यापीठाच्या वैद्यकीय संशोधकांनी केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. मात्र, धुम्रपानाची सवय सोडल्यास त्या व्यक्तीला पुन्हा स्मरणशक्ती प्राप्त करणे शक्य असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. धुम्रपान करणा-या व्यक्तिंमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आढळत आहे. सिगरेटच्या प्राबल्यामुळे मेंदूच्या आजाराने ग्रस्त असणा-या व्यक्तींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. धुम्रपानाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला नेहमीच्या व्यवहारातील साध्या गोष्टीदेखील लक्षात ठेवणे शक्य होत नाही. दिवसेंदिवस त्यांच्यातील विसरभोळेपणा वाढतो. अशा व्यक्तींचे वय झाल्यावर त्यांना स्मृतीभ्रंशाचा आजार होण्याचा अधिक धोका असल्याचे परिक्षणातून निष्पन्न झाले आहे.