वाढती स्पर्धा आणि बदलती जीवनशैली यामुळे हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये मागच्या काही वर्षांत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे हृदयरोग ही अनेकांसाठी एक महत्त्वाची आरोग्याची समस्या बनली आहे. डॉ. सौमिक कलिता यांच्या संशोधनानुसार भारतात दररोज तीनपैकी एका व्यक्तीचा हृदयरोगामुळे मृत्यू होतो. या समस्येवर उपचार उपलब्ध असले तरी ते अनेकदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असल्याचे दिसते. त्यामुळे आजार झाल्यावर त्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून वेळीच योग्य ती काळजी घेणे नक्कीच जास्त सुजाणपणाचे ठरेल. बदाम हे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे आपण नेहमी ऐकतो आणि वाचतोही. हेच बदाम हृदयरोगासाठीही अतिशय फायदेशीर असल्याचे हा आंतरराष्ट्रीय अहवाल सांगतो. पाहूयात यामधील काही महत्त्वाचे निष्कर्ष…

  • हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या वयानुसार जाड होत जातात. त्यामुळे त्यांच्यातील रक्त वाहून नेण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते.
  • आपण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात पोषक आहार घेत नाही. तसेच जंक फूड, तेलकट पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कॉलेस्ट्रोल जमा होण्यास सुरुवात होते.
  • व्यायामाचा अभाव असल्याने सर्व अवयवांना योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही. परिणामी आपल्याला हृदयरोगाला सामोरे जावे लागते.
  • बदाम हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहेत. त्यात फॅटी ऑसिड, फायबर, जीवनसत्व आणि खनिजे यांचा मुबलक साठा असतो.
  • बदामामुळे शरीरातील हिमोग्लोबीनची वाढ होते. परिणामी रक्तही वाढते. यामुळे शरीराला आवश्यक असणारे पोषक पदार्थ मिळतात.
    बदामातील काही घटक कोलेस्ट्रोलच्या निर्मितीवर नियंत्रण आणते. त्यामुळे या कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. याचा फायदा म्हणजे त्या व्यक्तीला हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते.