माणसात प्रादूर्भाव होणारे इबोला, झिका व एचआयव्ही या रोगांच्या विषाणूंचे निदान आता मानवी मूत्राच्या तपासणीतून शक्य होणार आहे. या पद्धतीत वापरण्यास सोयीची अशी एक पट्टी (चिप) तयार केली जाणार असून त्यात इबोला, एड्स व झिका या रोगांचे विषाणू ओळखता येतील, असे ऑस्टिनच्या टेक्सास विद्यापीठाचे जेफ्री डिक यांनी सांगितले. अजून ही चाचणी विकसित करता आलेली नसली तरी त्या दिशेने योग्य प्रकारे काम चालू आहे असे ते म्हणाले. नव्या पद्धतीत एकाच प्रकारचा विषाणू अनेक रोगाचे विषाणू असतील तरी वेगळा ओळखता येतो. दुसऱ्या विषाणूंचे नकारात्मक गुण बाजूला ठेवून चाचणी केली जाते त्यामुळे त्यात विशिष्ट विषाणू ओळखण्याची क्षमता आहे. जैविक नमुन्यातील विषाणू ओळखण्यासाठी इतरही काही मार्ग आहेत. एक म्हणजे विषाणू ओळखण्यासाठी नमुन्यात त्यांची संख्या जास्त असावी लागते, त्यातही नमुन्याची शुद्धता ही आवश्यक असते. ही चाचणी व्यक्ती किंवा प्राणी यांच्यात वापरता येते. ही चाचणी नागिणीच्या म्युरिन सायटोमेगॅलोव्हायरस या विषाणूवर उपयुक्तठरली आहे. विषाणू ओळखण्यासाठी मानवी पेशीपेक्षा बारीक वायरचा इलेक्ट्रोड उंदराच्या मूत्रात लावण्यात आला, त्यानंतर त्या मूत्रात काही वितंचके व विषाणूला नैसर्गिक चिकटणारी प्रतिपिंड मिसळण्यात आली, जेव्हा तिन्ही एकत्र आले तेव्हा विजेच्या प्रवाहात काही तरी चमकून गेल्यासारखे दिसले. या नव्या पद्धतीत आणखी अनेक सुधारणा आवश्यक आहेत. इलेक्ट्रोड काही वेळा कालांतराने कमी संवेदनशील बनतात, कारण अनेक संयुगे त्याला चिकटत असतात, त्यामुळे विषाणू तेथे जाऊन चिकटण्यास फार कमी पृष्ठभाग मिळतो. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक आटोपशीर उपकरणात करणे आवश्यक असून नेहमीच्या स्थितीत हा प्रयोग करणे शक्य झाले पाहिजे, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्तकेले आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)