कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना होणारा मनस्ताप आणि कामाचे वाढीव तास यामुळे पाचपैकी एका कर्मचाऱ्याला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यांचा त्रास होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

[jwplayer kjwCWXng]

कॉर्पोरेट क्षेत्रातील पुरुषांपैकी महिलांना मात्र हा त्रास होण्याची शक्यता कमी असून संशोधकांनी हे अनुमान मधुमेहाशी संबंधित विम्याच्या एकूण प्रकरणांवरून केले आहे. जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने संशोधकांनी अपोलो म्युनिच आणि मधुमेहाशी निगडित प्रबोधन करणाऱ्या नेल्सन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडील माहितीच्या आधारावर हा अभ्यास केला आहे. यासाठी जवळपास आठ लाख कॉर्पोरेट विम्याच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्या वेळी संशोधकांना कॉर्पोरेट क्षेत्रातील ४६ ते ६० व ३६ ते ४५ या वयोगटांमधील प्रमाण हे जवळपास २० टक्क्यांनी वेगाने वाढल्याचे दिसून आले. संशोधकांच्या मते हा धोक्याचा संकेत असून ५६ ते ६० वयोगटांतील हे प्रमाण साधारणपणे ५० टक्क्यांनी अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

संशोधकांच्या मते, प्रकृतीकडे दुर्लक्ष आणि घ्यावयाची काळजी याबाबतचे अज्ञान ही मुख्य कारणे असून केवळ १९ टक्के लोक हे नियमित व्यायामाकडे लक्ष देतात तर जवळपास ६१ टक्के लोक हे नियमितपणे सकाळची न्याहारी घेत नसल्यामुळे टाइप-२ च्या मधुमेहाचे बळी पडतात.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

[jwplayer HaD7rWMf]