चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्याच्या काही दिवसांनतर, रविवारी(दि.५) देशातील पहिलं अधिकृत सोशल मीडिया अ‍ॅप Elyments लाँच झालं आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी Elyments हे नवीन सोशल मीडिया अ‍ॅप लाँच केलं.


देशातील जवळपास 1000 पेक्षा अधिक आयटी तज्ज्ञांनी हे स्वदेशी अ‍ॅप डेव्हलप केलं असून ते सर्व श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे स्वयंसेवकही आहेत, अशी माहिती नायडू यांनी यावेळी दिली.

सोशल मीडियाच्या जगात फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या अ‍ॅप्सना नवीन Elyments अ‍ॅपमुळे टक्कर मिळेल. हे अ‍ॅप 8 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यात ऑडियो-व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलिंग, मेसेजिंग आणि ग्रुप चॅटिंग, सोशल कनेक्टिव्हिटी, न्यूज अपडेट्स, Elyments Pay या फीचरद्वारे सुरक्षित ई-पेमेंट पर्याय आणि भारतीय ब्रँड्ससाठी ई-कॉमर्स यांसारखे फीचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

लाँचिंगआधी बरेच महिने या अ‍ॅपची टेस्टिंग सुरू होती. आता हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर व अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध झाले असून आतापर्यंत एक लाखांहून जास्त जणांनी हे अ‍ॅप डाउनलोडही केलं आहे. या अ‍ॅपला डेव्हलप करताना युजर्सच्या प्रायव्हसीची विशेष काळजी घेण्यात आली असून यात वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित असल्याचा दावा अ‍ॅपच्या डेव्हलपर्सकडून करण्यात आला आहे.