रिलायन्स कम्युनिकेशन्स म्हणजेच आरकॉममधील कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे. ही घट थोडीथोडकी नसून तब्बल ९४ टक्के इतकी आहे. जिओ लाँच केल्यापासून कंपनी बाजारात जोरदार चर्चेत असताना आत कंपनीत केवळ ३४०० कर्मचारी राहीले आहेत. एकेकाळी कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या ५२ हजार होती, ती एकदम खाली आली आहे. कंपनीने याबाबतची माहिती मुंबई शेअर बाजाराला दिली. आता याचा कंपनीच्या उत्पादनांवर आणि सेवांवर काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पण अचानक इतकी कपात का करण्यात आली असावी असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर कंपनी कर्जबाजारी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आरकॉमवर सध्या ४५ हजार करोड रुपयांचे कर्ज आहे. कंपनी २००८ ते २०१० या कालावधीत यशाच्या शिखरावर होती. मात्र त्यानंतर काही कारणांमुळे अनेक आर्थिक चढउतार आल्याने कंपनीला कर्मचारी कपात करावी लागली. कंपनीने जानेवारीमध्ये आपली मोबाईल सेवा बंद केली असून बिझनेस टू बिझनेस स्तरावर दूरसंचार सेवा देण्याकडे लक्ष केंद्रित करणार आहे. मागच्या काही काळापासून कंपनी बाजारातील आयडीया, व्होडाफोन, एअरटेल यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा करत आहे. ही स्पर्धा कर्मचारी कपातीमुळे येत्या काही महिन्यात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.