व्यथा
तेजश्री गायकवाड – response.lokprabha@expressindia.com

काय मग, संपली का उन्हाळ्याची सुट्टी? मज्जा केली असेल ना. काय? आमचं विचारताय? अहो आम्हाला उन्हाळाची सुट्टी मिळणार की पावसाळ्याची हेच समजत नाहीये. आम्हा इंजिनीअरिंग करणाऱ्या मुलांची एक नाही, दोन नाही अशी अनेक दु:ख आहेत.

आमचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं दु:ख म्हणजे आमच्या परीक्षा. आमच्या परीक्षा बाकीच्या कोर्सेसची परीक्षा संपल्यावर चालू होतात. त्यांची सुट्टी आणि आमची परीक्षा. तुमचे मित्र-मैत्रिणी छानपैकी मज्जा मस्ती करतात, फिरायला जातात पण आम्ही मुकाट अभ्यास करतो. हे सगळं बघून आम्हाला किती वाईट वाटत असेल याची कल्पनाही नाही करू शकत तुम्ही. उन्हाळा म्हणजे तसा लग्नाचा सीजन. अनेक लग्नं उन्हाळ्यात होतात. पण आम्हाला परीक्षांमुळे जाण्याचा योग काही येत नाही. आमचं पूर्ण कुटुंब तिकडे एन्जॉय करत असतं आणि आम्ही इथे पेपरची तयारी. कधी कधी तर सख्ख्या भावाबहिणींच्या लग्नाला आम्हाला पाहुण्यांसारखं शेवटच्या क्षणी यावं लागतं. कारण फक्त आमच्या एकटय़ाच्या परीक्षेमुळे लग्नाची तारीख बदलणं शक्य नसतं. त्यामुळे अनेकदा सख्या भावा- बहिणींच्या लग्नाच्या अल्बममध्ये, व्हिडीओमध्ये आम्ही नसतोच. आमचे मित्र-मैत्रिणीही शक्यतो इंजिनीअिरग करणारेच असतात. कारण आमचं टाइम टेबल दुसऱ्या कोणत्याही कोर्सेसच्या मुलांशी जुळत नाही. मग इतरांशी कशी टिकून राहणार मैत्री आमची? मैत्री म्हणजे काय फक्त फोनवर बोललो, एखादा मेसेज केला असं नसतं. खऱ्या मैत्रीमध्ये अधूनमधून का होईना भेटावं लागतं. ते आमच्या विचित्र वेळापत्रकामुळे शक्य होत नाही. त्यामुळे आमच्याच कोर्सेसची मुले आमच्याशी जुळवून घेऊ शकतात. इंजिनीअरिंगचा अभ्यास करताना आम्ही फक्त आणि फक्त त्याचा अभ्यासच करू शकतो. अभ्यासाशिवाय अजून कोणतीही गोष्ट करणं शक्य होत नाही. मुळात आमच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये चुकूनमाकून फेस्टिव्हल वगैरे होतात. काही कॉलेजमध्ये तेही होत नाही. मग सांगा बरं कसं आम्ही जास्तीच्या अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणार? कधी अंगात कला आहे म्हणून दुसऱ्या कॉलेजच्या फेस्टिव्हलमध्ये भाग घ्यायचा म्हटलं तरी शिक्षक फक्त अभ्यासच करा हेच ऐकवतात. आमच्या असाइनमेण्ट्सबद्दल तर माहितीच असेल तुम्हाला. आमचं इंजिनीअिरग करतानाचं अर्ध आयुष्य तर या असाइनमेण्ट्समध्येच जातं. कोणताही विषय असू दे, असाइनमेण्ट्स असणारच. बरं एवढय़ा मोठय़ा असाइनमेण्ट्स लिहून सबमिट केल्यावर त्या शिक्षकांनी नीट चेक कराव्यात एवढीच अपेक्षा असते. पण तिथेही अपेक्षाभंग होतो. कारण  शिक्षक कधीच असाइनमेण्ट्स नीट चेक करत नाहीत. वरवर टिकमार्क होते. इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमाची फी तशी जरा जास्तच असते. त्यामुळे खासगी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा आम्ही मुलं मिळेल ते सरकारी कॉलेज घेतो. आपल्याला मिळालेलं सरकारी कॉलेज आपण राहतो त्या ठिकाणापासून जवळ आहे असं कधीही होत नाही. त्यामुळे असाइनमेण्ट्स लिहून लिहून उरलेलं आयुष्य आमचं प्रवासात जातं. एखाद्याची वन डे पिकनिक होईल एवढा प्रवास आम्ही रोज करतो. त्यामुळे घरी आल्यावर आमच्याकडे आणखी कोणत्या गोष्टी करण्याची ताकदच उरत नाही.

तुम्ही अनेकदा सोशल मीडियावर मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनीअरिंग शिकणाऱ्या मुलांच्या गर्लफ्रेण्ड नसतात किंवा त्यांना गर्लफ्रेण्ड असू शकत नाहीत, यावरचे अनेक जोक्स वाचले असतील. मुळात आमच्या बॅचमध्ये हातावर मोजण्याएवढय़ा मुली असतात. त्यामुळे त्यांना आधीच खूप भाव चढलेला असतो. त्यामुळे एखाद्या मुलाच्याच नशिबी बॅचमधली मुलगी गर्लफ्रेण्ड म्हणून लाभते. बाकीच्या कोर्सेसच्या मुली आमच्या गर्लफ्रेण्ड बनतील असं तर शक्यच नाही. कारण इंजिनीअरिंग करणाऱ्या आम्हा मुलांकडे मुलींना द्यायला वेळच नसतो. त्यात चुकूनमाकून आमची एखादी गर्लफ्रेण्ड असलीच आणि त्या मुलीच्या बेस्टफ्रेण्डचा बॉयफ्रेण्ड  इंजिनीअरिंग करणारा नसेल तर साहजिकच तो जास्त वेळ देतो. आणि हे बघून दुसरी मुलगीपण अपेक्षा ठेवते, जी अपेक्षा आम्ही इंजिनीअरिंग करत असल्यामुळे पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे अनेकदा इंजिनीअरिंग शिकणारी मुलं ही बोअर वाटतात. पण अनेकदा इंजिनीअरिंग करणाऱ्या मुलींचा बॉयफ्रेण्ड असतो. तो एकतर ती राहते त्याच्या आसपासचा असतो किंवा मग तिच्या कॉलेजचाच. काही का असेना इंजिनीअरिंग करणाऱ्या मुलीच्या नशिबी बॉयफ्रेण्ड असतो, पण मुलाच्या नशिबी गर्लफ्रेण्ड नसते.

इंजिनीअरिंगचं शिक्षण बरीच वर्ष चालतं. त्यामुळे कधी कधी घरातूनही बोलणी ऐकायला लागतात. नातलगांपैकी एखाद्याने थोडंसं शिक्षण घेऊन व्यवसाय किंवा छोटी नोकरी करायला सुरुवात केली तरी आम्हाला बोलणी बसतात. बारावी पासवरही जॉब मिळतो, तुझ्या पाठून तो जॉबला लागला आणि तू करत बस इंजिनीअरिंग. हे आम्हाला हमखास ऐकायला मिळतं. एकंदरीत काय तर सगळीकडूनच आम्हाला दु:खच दु:ख आहे.
सौजन्य – लोकप्रभा