दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रदूषणाचा, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतींचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. हे परिणाम कालांतराने जाणवू लागतात. यातूनच मग श्वसनाशी निगडीत आजारांबरोबरच त्वचारोगासारखे आजार उद्भवतात. प्रदूषणाला आळा घालणे आपल्या हातात नाही, मात्र या प्रदूषणापासून आपण त्वचेचे संरक्षण नक्कीच करु शकतो. त्यासाठी कोणत्याही प्रसाधनांची आवश्यकता नसून केवळ नैसर्गिक वस्तूंचा वापर करुन आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो.

अनेक महिलांची त्वचा तेलकट असल्यामुळे त्वचेवरील रंध्रे बुजली जातात. त्यामुळे त्वचेला ऑक्सिजन घेण्यास अडथळा निर्माण होऊन चेह-यावर ब्लॅकहेडस निर्माण होतात. हे ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी तरुणी फेसमास्क, फेसपॅक, मसाज, स्क्रिबचा वापर करता. मात्र या प्रसाधनांचा वापर करण्यापेक्षा होममेड फेसपॅक वापरणे केव्हाही चांगलेच. त्यामुळे जर या समस्यांपासून त्वचेचे संरक्षण करायचे असेल तर देबिका चक्रवर्ती यांनी दिलेल्या टिप्स नक्कीच अंमलात आणायला हव्यात –

१. कोळशापासून तयार केलेला फेसपॅक – त्वचेवरील रंध्रे बुजल्यामुळे त्वचेसंबंधीत अनेक समस्या निर्माण होतात. या समस्येपासून लांब रहायचे असेल तर तुमच्या प्रसाधनांमध्ये कोळशापासून तयार केलेला फेसपॅक नक्कीच हवा. हा फेसपॅक तयार करण्यासाठी १ चमचा कोळशाची बारीक पावडर, १ चमचा कोरफडीचा गर, अर्धा चमचा बदामाचे तेल, ४-५ थेंब टी-ट्री ऑईल एकत्र करुन त्याचे मिश्रण करावे. त्यानंतर हा पॅक चेह-यावर १५ मिनीटांसाठी लावून ठेवावा. १५ मिनीटानंतर चेहरा गार पाण्याने धुवून घ्यावा. या फेसपॅकमुळे त्वचेवरील रंध्रे मोकळी होऊन त्वचेला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होतो.

२. अंड्यातील पांढरा भाग – अंड्याचा वापरामुळे निस्तेज त्वचा उजळण्यास मदत होते. याच अंड्यातील पांढ-या भागाचा वापर करुन त्वचेवरील रंध्रे मोकळी करता येतात. त्यासाठी १ अंड्याचा पांढरा भाग,२-३ चमचे लिंबाचा रस एकत्र करुन त्याचे मिश्रण करावे. त्यानंतर हा पॅक चेह-यावर १५ मिनीटांसाठी लावून ठेवावा. १५ मिनीटानंतर चेहरा धुवून घ्यावा. या पॅकमुळे त्वचेवरील ब्लॅकहेड्स सारख्या समस्या दूर होतात. अंडाचा उपयोग केवळ चेह-यासाठीच नाही तर केसांचे सौंदर्य जपण्यासाठीदेखील केला जातो.

३. मुलतानी माती – मुलतानी माती ही कोणत्याही दुकानामध्ये सहज उपलब्ध होते. मुलतानी मातीच्या वापरामुळे त्वचेचा पोत सुधारते. तसेच चेह-यावर डाग दूर होतात. मुलतानी मातीचा वापर महिला, पुरुष कोणीही करु शकतात. हा लेप तयार करण्यासाठी १ चमचा मुलतानी माती, चिमुटभर हळद, ३-४ चमचे गुलाब पाणी एकत्रित करुन हा पॅक चेह-यावर लावावा. पॅक वाळल्यानंतर गार पाण्याने चेहरा धुवावा. या पॅकमुळे तेलकट त्वचा असलेल्या महिलांना फायदा होतो.

४. बेकिंग सोडा – बेकिंग सोड्यामध्ये अॅटी बॅक्टेरिअलचे प्रमाण अधिक असते. त्याचबरोबर त्याच्या अॅक्सफोलिएटचे गुण देखील असतात. बेकिंग सोड्याचा वापर स्क्रब म्हणून देखील करण्यात येतो. मात्र स्क्रबपेक्षा जर त्याचा फेसपॅक केला तर तो जास्त फायदे दिसून येतात. हा पॅक तयार करण्यासाठी १ चमचा बेकिंग सोडा, २ चमचे मध एकत्र करुन हा पॅक १०-१५ मिनीटे चेह-यावर लावावा त्यानंतर चेहरा धुवावा. हा पॅक आठवड्यात केवळ एक वेळाच लावावा.

केमिकलयुक्त फेसपॅक वापरण्यापेक्षा घरी तयार केलेला फेसपॅकचा वापर करावा. यामुळे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट न होता. चेह-यावरील तेज वाढवण्यास मदत होते. तसेच कमी खर्चात तयार होणारे हे फेसपॅक चिरकाळापर्यंत तुमचं सौंदर्य खुलविण्यास मदत करतात.