लवकरच फेसबुक एक असं डिव्हाइस आणण्याची तयारी करत आहे ज्याद्वारे टीव्हीवरुनच व्हिडीओ कॉल करता येणार आहे. सध्या प्रचलीत असणार्‍या सेट टॉप बॉक्सपेक्षा यात काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात येणार आहे, यामुळे याला स्मार्ट सेट टॉप बॉक्स म्हटले जात आहे. या डिव्हाइसमध्ये AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

Ripley या नावाने फेसबुकचा हा नवा स्मार्ट सेट टॉप बॉक्स बाजारात येणार असल्याची माहिती आहे. याच्याद्वारे कुणीही आपल्या टीव्हीवर विविध वाहिन्यांचे कार्यक्रम पाहू शकणार आहेतच, याशिवाय आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाद्वारे व्हिडीओ कॉल करताना फ्रेममधील व्यक्तीच्या हालचालीनंतर त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याची रिअल टाइम माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय बॅकग्राउंडचा नको असलेला आवाजही आपोआप हटवला जाईल. 2019 पर्यंत फेसबुककडून याबाबत घोषणा केली जाऊ शकते. टीव्ही क्षेत्रात आधीपासूनच उतरलेल्या अॅपल टीव्ही आणि अॅमेझॉन अलेक्झा सारख्यांना याद्वारे चांगली टक्कर मिळण्याची शक्यता आहे.