प्रत्येक उत्पादक आपले उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी बाजारपेठेचा, ग्राहकवर्गाच्या गरजांचा अभ्यास करत असतो. फॅशन जगतातसुद्धा नवीन कलेक्शन तयार करताना प्रत्येक डिझायनर तसेच बॅ्रण्ड्सना त्या सीझनमधील फॅशन ट्रेंड्स, लोकांची पसंती ठाऊक असणे गरजेचे असते. त्यासाठी दरवर्षी जगभरातील फॅशन ब्रॅण्ड्स पुढील वर्षांचे ट्रेंड जाणून घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात, पण नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार वर्षभरात वेळोवेळी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साइट्सवर उपलब्ध असलेल्या अपडेट्सचा उपयोग नव्या वर्षांतील ट्रेंड्स वर्तवण्यात होऊ शकतो.
कोणतेही कपडे, ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरी यांचे कलेक्शन तयार करण्यापूर्वी प्रत्येक डिझायनर आणि ब्रॅण्ड त्यांच्या ग्राहकवर्गाचा त्या वर्षभरातील खरेदीचा कल, देशातील आणि जगभरातील सामाजिक, भौगोलिक परिस्थिती यांचा अभ्यास करत असतो. त्यावरून बाजारपेठेत कशाला मागणी आहे, याचा अंदाज घेऊन नवीन कलेक्शन तयार केले जाते. या प्रक्रियेला ‘फॅशन फोरकास्टिंग’ म्हणजेच ‘आगामी फॅशन ट्रेंड्सचा अंदाज वर्तवणे’ असे म्हणतात. ग्राहकांची नेमकी मागणी लक्षात न आल्यास त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते, म्हणूनच जगभरातील ब्रॅण्ड्स आणि डिझायनर्स या प्रक्रियेवर वर्षांकाठी लाखो रुपये खर्च करतात.
गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात सोशल मीडियाचा विस्तार वाढला आहे. डिझायनर्स आणि ब्रॅण्ड्ससुद्धा आपल्या कलेक्शन्सच्या प्रसिद्धीसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साइट्स, ब्लॉग्सचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे वर्षांकाठी या साइट्सवर विविध डिझायनर कलेक्शन्सची इत्थंभूत माहिती उपलब्ध असते. मुख्य म्हणजे या साइट्सचा सातत्याने वापर करणारा तरुणवर्गच या ब्रॅण्ड्सचा मुख्य ग्राहकवर्ग असतो. त्यामुळे त्याची मानसिकता कळण्यास सोशल मीडिया आणि ब्लॉग्सचा उपयोग होऊ शकतो. या माहितीचा उपयोग भविष्यातील फॅशनमधील ट्रेंड्स वर्तवण्यामध्ये होऊ शकतो हे एका सर्वेक्षणातून पेन स्टेट विद्यापीठाचे माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे सहयोगी प्राध्यापक हेन शु यांना लक्षात आले आहे. यासाठी त्यांनी जगभरातील ८१६ डिझायनर्सच्या तब्बल ६,६२९ फॅशन शोज्चा विविध ब्लॉग्स, सोशल मीडिया साइट्सवर उपलब्ध माहितीचा अभ्यास केला होता. यामध्ये २००० ते २०१४ दरम्यान झालेल्या ३० फॅशन सीझन्सचा समावेश होता. या माहितीच्या आधारावर त्यांनी फॅशन ट्रेंड्सबाबत लावलेले निकष तंतोतंत खरे ठरले. प्राध्यापक हेन शु यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या सर्वेक्षणाचा फायदा डिझायनर्सना तर नक्कीच होईल, पण त्यासोबतच ग्राहकांनासुद्धा त्यांच्या कपडे खरेदीचे नियोजन करताना होऊ शकतो. तसेच ज्या नवोदित डिझायनर्स फॅशन फोरकास्टिंगवर पैसे खर्च करू शकत नाहीत, त्यांनाही या सर्वेक्षणाचा फायदा नवीन कलेक्शन तयार करताना होऊ शकतो.