सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सध्या ई-कॉमर्स कंपन्यांकडून ग्राहकांना अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत. अॅमोझॉन, फ्लिपकार्ट यांच्यासह अनेक ई कॉमर्स कंपन्या सध्या निरनिराळ्या ऑफर्स घेऊन आल्या आहेत. यात कपडे, स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स अप्लायंसेस आणि अन्य वस्तूंवरही ऑफर देण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ई कॉमर्स वेबसाईटवरील विक्रीत सध्या तब्बल ७२ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. ईकॉम एक्स्प्रेसनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

ईकॉम एक्स्प्रेसनं दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी ते ऑगस्टदरम्यान कपड्यांपासून अॅक्सेसरीज या कॅटेगरीत सर्वाधित खरेदी झाल्याचं दिसून आलं. ऑक्टोबरमध्ये एकूण या कालावधीच्या एकूण विक्रीच्या ५ टक्के वाढ पाहायला मिळाली. करोनाच्या पूर्वी असलेल्या परिस्थितीपेक्षा यावेळी विक्रीत २०० टक्क्यांची वाढ झाली आहे. ईकॉम एक्स्प्रेसनुसार बँगळुरू, चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि दिल्ली या शहरांतून सर्वाधिक खरेदी झाली. ऑक्टोबर महिन्यात कोलकात्यात सर्वाधिक खरेदी करण्यात आल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं.

दुर्गा पूजेचं औचित्य साधून शहरात कपड्याच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचं सांगम्यात आलं. परंतु दिल्लीत कपड्यांच्या विक्रीत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. तर उलट गुडगांव, नोएडा आणि गाझीयाबादसारख्या ठिकाणीही कपड्यांची विक्री अधिक झाल्याचं ईकॉम एक्स्प्रेसनं म्हटलं आहे.

मोबाईल, टॅबच्या विक्रीत २१० टक्क्यांची वाढ

मोबाईल, टॅब आणि मोबाईल अॅक्सेसरीजच्या विक्रीत ऑगस्ट महिन्यात ८९ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. ऑक्टोबर महिन्यात सणासुदीच्या कालावधीतील सेल दरम्यान याच्या विक्रीत २१० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. मोठ्या आणि छोट्या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात विक्रीत वाढ नोंदवली गेली. औषधं आणि सप्लिमेंटच्या विक्रीतही करोनाच्या पूर्वी असलेल्या स्थितीपेक्षा ऑगस्ट महिन्यात २६० टक्क्यांची वाढ दिसून आली. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातदेखील ऑगस्ट महिन्याईतकीच विक्री झाली. तर दुसरीकडे लॅपटॉप आणि अॅक्सेसरीज, फुटवेअर, ब्युटी प्रोडक्ट्स यांच्या विक्रीत फेब्रुवारी महिन्यात वाढ झाली होती. परंतु ऑक्टोबर महिन्यातही यांच्या विक्रीत घटच दिसून आली.