ब्राझीलमध्ये सुरू असणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेमुळे सध्या जगभरचे वातावरण फुटबॉलमय झालेले पहायला मिळत आहे. भारताची राजधानी दिल्लीसुद्धा याला अपवाद ठरलेली नाही. दिल्लीकरांच्या दैनंदिन फॅशनमध्येसुद्धा फुटबॉलची झलक पहायला मिळत आहे. दिल्लीतील अनेक तरूण सध्या टॅटू, नेल आर्ट आणि हेअरकटच्या माध्यमातून फुटबॉलविषयीचे आपले प्रेम व्यक्त करत आहेत. आपल्या आवडत्या फुटबॉलपटूच्या प्रतिमेपासून ते  विश्वचषक स्पर्धेतील अधिकृत ‘ब्रझुका’ या फुटबॉलची प्रतिमा तरूण-तरूणी आपल्या अंगावर गोंदवून घेताना दिसत आहेत. तसेच फुटबॉल थीमवर आधारलेल्या प्रतिमा आपल्या नखांवर कोरून घेण्याकडे सध्या तरूणांचा ओढा वाढल्याचे दिल्लीच्या कमला नगर परिसरातील एका ‘नेल लाँज’च्या मालकाकडून सांगण्यात आले. नेल आर्ट करताना बहुतांश तरूण आपल्या नखांवर ब्राझीलचा ध्वज काढून घेण्यास पसंती देत असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले.