सध्या अनेकजण लॉकडाउनमुळे आपापल्या घरातचं आहेत. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर स्वरदा म्युझिक कॅफे तर्फे गायकांना एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वरदा म्युझिक कॅफे तर्फे ‘गाता रहे मेरा दिल’ या ऑलाइन बॉलिवूड गीतांच्या गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान, यासाठी इच्छुकांना मोफत नोंदणी करता येणार आहे. यासाठी स्पर्धकांना आपल्या गाण्याचा व्हिडीओ तयार करावा लागणार आहे. त्यानंतर स्वत:च्या फोटोसहित तो व्हिडीओ फेसबुक किंवा युट्यूबवर अपलोड करावा लागेल. तसंच अपलोड केलेल्या व्हिडीओची लिंक swaradaamumbai@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावी लागेल.

या स्पर्धेसाठी वयानुसार गट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या गटात १२ वर्षांखालील मुलांचा समावेश करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या गटात १३ ते १९ या वयोगटातील गायकांचा समावेश असेल. तिसऱ्या गटात यावरील वयोगटातील पुरूष आणि महिलांचा समावेश असेल. तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही ज्येष्ठ नागरिक गटामध्ये आपलं नाव नोंदवता येणार आहे. तसंच एकाच कुटुंबातील व्यक्तींसाठी ड्युएट साँग हादेखील गट असणार आहे. या स्पर्धेसाठी व्हिडीओ पाठवण्याची अखेरची तारीख ३० जुलै असेल. तसंच विजेत्यांची नावं swaradaamumbai या युट्यूब चॅनलवर जाहीर करण्यात येणार आहेत.