यावेळच्या शालेय परीक्षांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींनीच मोठ्या प्रमाणावर घवघवीत यश संपादन केले. गेल्या काही वर्षांपासूनची ही परंपरा यावेळीदेखील कायम राहिली. मुलींमध्ये अचानक बदल होऊन त्यांनी खूप अभ्यास करायला सुरूवात केली, अथवा अभ्यासाकडे मुलं अचानक दुर्लक्ष करायला लागली, असं झालं नसल्याचं ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन’ने याबाबत २०१४ साली केलेल्या अभ्यास पाहाणीत म्हटलं आहे. एखादी गोष्ट शिकण्याकडे मुलींचा अगोदरपासूनच असा दृष्टीकोन राहिला आहे. परंतु, आजच्यासारखे ते पूर्वी शिक्षण क्षेत्रात जाणवत नव्हते. मुख्य प्रवाहातील सहभागापासून मुलींना दूर ठेवणारे सामाजिक घटक यासाठी कारणीभूत होते. तसेच मुलींचा जन्मदर हेसुद्धा एक कारण होते, असेदेखील या पाहणीत म्हटले आहे.

मुलींची कामगिरी मुलांपेक्षा चांगली असणे हे केवळ आपल्याच देशात घडत नसून, जगभरातील अनेक देशांमध्येदेखील असेच पाहायला मिळते ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. विज्ञान आणि गणितासारख्या किचकट विषयातदेखील मुली उत्तम कामगिरी करत असल्याचे एका पाहणीतून सिद्ध झाले आहे. मुलं आणि मुलींमधील शैक्षणिक कामगिरीतील ही तफावत पाहता सद्यस्थितीतील प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील महिला शिक्षकांच्या तुलनेत पुरुष शिक्षकांमध्ये वाढ करण्याची गरज आहे का, असादेखील प्रश्न उपस्थित केला जातो.
महाविद्यालय प्रवेशातदेखील मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे एका पाहणीत पुढे आले आहे. मुलं आणि मुलींच्या शैक्षणिक कामगिरीवर मतमतांतर असून, शालेय अभ्यासक्रम हा मुलींना पूरक असल्याचे मानणारा एक मतप्रवाह आहे. असे असले तरी, मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये अधिक व्यवस्थितपणा आणि शिस्तप्रियता पाहायला मिळते आणि हेच त्यांच्या शैक्षणिक कामगिरीतील यशाचे गमक असल्याचे अनेकांनी मान्य केले आहे. मुलांचा कल हा अभ्यासापेक्षा खेळ आणि तत्सम गोष्टींकडे जास्त असल्याने मुली अभ्यासात श्रेष्ठ ठरत असल्याचेदेखील बोलले जाते.

शैक्षणिक कामगिरीत मुली उत्कृष्ट असल्या तरी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणचा त्यांचा वावर मर्यादित स्वरुपाचा पाहायला मिळतो. तर, उच्चपदस्थ स्त्रियांचा आकडा मर्यादित असण्यामागे लग्न आणि कौंटुबिंक जबाबदारी हे मुख्य कारण असल्याचे एका पाहणीतून समोर आले आहे. मुली ज्याप्रमाणे यश मिळवत आहेत आणि स्वत:चा ठसा उमटवत आहेत ते निश्चितच कौतुकास्पद आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाधिक समान संधी उपलब्ध झाल्यास भविष्यातदेखील त्या अनेक यशोशिखरे पादाक्रांत करतील.