विमानसेवा पुरवणारी कंपनी गो-एअरने (GoAir)देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘क्वारंटाइन पॅकेज’ची घोषणा केली आहे. याअंतर्गत प्रवाशांना क्वारंटाइन कालावधीपर्यंत राहण्यासाठी निवडक शहरांमध्ये परवडणाऱ्या किंमतीनुसार हॉटेल निवडता येईल. एका रात्रीसाठी किमान 1,400 रुपये (एक व्यक्ती) दरापासून हे हॉटेल्स उपलब्ध असतील. प्रवासी त्यांच्या सोयीनुसार महागडे हॉटेलही बुक करु शकतील.

“करोना व्हायरस महामारीदरम्यान, देशात एखाद्या एअरलाइनकडून जाहीर करण्यात आलेलं हे अशाप्रकारचं पहिलं क्वारंटाइन पॅकेज आहे. या पॅकेजचा लाभ गो-एअरच्या हॉलिडे पॅकेज वेबसाइटवरुन घेता येईल. जे प्रवासी विदेशातून भारतात येतात किंवा देशातच विविध शहरांमध्ये प्रवास करतात त्यांच्यासाठी हे पॅकेज आहे. प्रवाशांना निवडलेल्या हॉटेलमध्ये सहजपणे क्वारंटाइन होता व्हावं, त्यासाठी समस्यांचा सामना करावा लागू नये , या उद्देशाने हे पॅकेज आणलं आहे” असं गो-एअरकडून सांगण्यात आलं.

हॉटेल निवडावं लागणार :-
या पॅकेजमध्ये कोच्ची, कन्नूर, बंगळुरू, दिल्ली आणि अहमदाबाद शहरांमध्ये विविध हॉटेल्स उपलब्ध आहेत. प्रवाशांना त्यांच्या बजेटनुसार हॉटेल निवडावं लागेल, असं एअरलाइनकडून सांगण्यात आलं. हॉटेल क्वारंटाइन पॅकेजमध्ये 1,400 रुपये प्रतिव्यक्ती (एक रात्र) दर असलेले हॉटेल सर्वात कमी किंमतीचे आहे. तर 5,900 रुपये प्रतिव्यक्ती (एक रात्र) दर असलेलं महागडं हॉटेल असेल.