Google Plus  : ‘गुगल प्लस’ बंद करण्याचा निर्णय गुगल कंपनीने घेतला आहे. सोमवारी कंपनीने अचानक ‘गुगल प्लस’च्या समाप्तीचीच घोषणा करून ‘नेटकऱ्यांना’ धक्का दिला. समाजमाध्यमांतील ‘फेसबुक’च्या वाढत्या लोकप्रियतेला तगडा पर्याय म्हणून अमेरिकन कंपनीने सात वर्षांपूर्वी ‘गुगल प्लस’ची निर्मिती केली होती. परंतु लोकांच्या पसंतीची मोहोर उमटवण्यात व्यवस्थापनाला यश आले नाही.  गुगलशी संबंधित सर्व कामकाजाकरिता मध्यवर्ती केंद्र म्हणून ‘प्लस’ला स्थान होते. मात्र गेले काही महिने ‘प्लस’चे वेगवेगळे खंड करून ग्राहकांना सेवा देण्यावर भर देण्यात आला होता.

एका विशिष्ट बगद्वारे पाच लाख गुगल प्लसच्या खात्यामधून माहिती लीक झाली होती. गुगल प्लस बंद करण्यापूर्वी हा बग काढून टाकण्यात आल्याची माहिती गुगलने दिली आहे. गुगल प्लस वारकर्त्यांसाठी हा सुर्यास्त असल्याचे अमेरिकेतील एका दिग्गज इंटरनेट कंपनीने म्हटले आहे. गुगल प्लसची निर्मीती करण्यापासून ते लोकांपर्यंत पोहचवण्यापर्यंत अनेक अव्हानाचा सामना करावा लागला. गुगल प्लसला वापरकर्त्यांच्या अपेक्षेनुरूप तयार करण्यात आले होते. पण हवा तसा गुगल प्लसचा वापर करण्यात येत नव्हता. त्यामुळे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे गूगल कंपनीच्या एका आधिकाऱ्यांने सांगितले.

मार्च २०१८ मध्ये गुगल प्लसवरून ५ लाख लोकांचा गोपनीय डेटा चोरीला गेल्याचं गुगलच्या निर्दशनास आलं. २०१५ पासून ही डेटा चोरी सुरू होती. त्यानंतर गुगलचं सायबर सुरक्षा पथक कामाला लागलं. काही दिवसांपूर्वी सायबर सुरक्षा पथकाने आपलं कार्य चोख केलं असून आता गुगल प्लसवरचा डेटा सुरक्षित आहे असं स्पष्टीकरण गुगलने दिलं. पण नक्की डेटा कशामुळे चोरीला जात होता, या डेटा चोरीमागे कोणत्या संस्थेचा हात होता याबाबत मात्र गुगलने काहीच स्पष्टीकरण दिलं नाही. त्यामुळे चोरीला गेलेल्या पाच लाख लोकांच्या डेटाचं काय? असा प्रश्न सोशल मीडियातून व्यक्त केला जात आहे.

याआधी, गुगलच्या उत्पादनातील (से), यूटय़ूबवरील ध्वनिचित्रफितीवर भाष्य करण्यासाठी ‘गुगल प्लस’ प्रोफाइल आवश्यक होते. परंतु ते फार काळ टिकले नाही. गुगलच्या सर्व कामकाजांसाठी एकाच खात्याचा (अकाऊंट) वापर करता आला तर ते अधिक सोयीचे ठरेल, अशी सूचना अनेकांकडून आली होती.