गुगलच्या Pixel स्मार्टफोनने वनप्लसला झटका दिला आहे. मार्केट रिसर्च कंपनी IDC च्या रिपोर्टनुसार 2019 या वर्षात गुगलने स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये वनप्लसवर मात केली आहे.

रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी गुगलने 72 लाख Pixel स्मार्टफोन विकलेत. 2016 मध्ये लाँच झालेल्या Pixel फोननंतर ही कंपनीची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. पण, तरीही गुगलला अद्याप ‘टॉप 10 स्मार्टफोन मेकर्स’च्या यादीत स्थान मिळवता आलेलं नाही.


IDC च्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी Pixel फोनच्या विक्रीमध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. सर्वाधिक विक्री अमेरिका, पश्चिम युरोप आणि जपानमध्ये नोंदवण्यात आली. पहिल्या सहा महिन्यांमध्ये कंपनीच्या Pixel 3a आणि Pixel 4 ची विक्री कमी झाली होती. पण, गेल्यावर्षी कंपनीने चार नवीन स्मार्टफोन आणले. तसेच 2019 मध्ये कंपनीने या फोनची उपलब्धता वाढवली, यासाठी पिक्सलची विक्री अजून तीन मार्केटमध्ये सुरू केली. त्याचा फायदा कंपनीला झाल्याचं सांगितलं जात आहे.

भारतात वनप्लस लोकप्रिय :-
दुसरीकडे, काउंटरपॉइंट रिसर्चनुसार वनप्लस भारताच्या टॉप प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड्समध्ये कायम आहे. कारण वनप्लसने एकट्या भारतातच 20 लाख फोनची विक्री केली आहे. तर, गुगलने त्यांची लेटेस्ट Pixel 4 ही सीरिज अद्याप भारतात लाँचही केलेली नाही.