News Flash

दररोज अक्रोड खाण्याचे आहेत खूप फायदे; बिनधास्त करा आहारात समावेश

सुक्या मेव्यातील अक्रोड आहे बहुगुणी, जाणून घ्या ‘हे’ फायदे

सुक्या मेव्यामध्ये वापरला जाणारा अक्रोड सर्वांनाच परिचित आहे. इराणमध्ये उगम असलेले अक्रोड आज भारत, युरोप, अमेरिका, अफगाणिस्तान या सर्व ठिकाणी आढळून येते. अक्रोड फळावरील आवरण हे जाड व कठीण असते. तर अक्रोडचे आतील कवच सुरकतलेले व दोन भागात विभागलेले असते. या कवचामध्ये मानवी मेंदूशी बरेच साम्य असलेले तेलयुक्त बी असते. त्यामुळे मेंदूच्या दुर्बलतेवर अक्रोड सेवन केले तर मेंदू बलवान होऊन मेंदूची कार्यक्षमता वाढीस लागते. हेच अक्रोड बी अत्यंत पौष्टिक असून त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.

औषधी गुणधर्म –
अक्रोड बी चा गर चवीला तुरट, मधूर, विपाक कटू व उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर आणि वातघ्न आहे. अक्रोडमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ‘अ’ व ‘ब’ जीवनसत्व, प्रथिने, उष्मांक, तंतूमय व पिष्टमय पदार्थ असतात. या सर्व घटकांमुळे मेंदूची दुबर्लता कमी करून त्याला बलवान करण्याचे महत्वाचे काम अक्रोड करतो. इतर सुक्या मेव्यासोबत अक्रोड खाल्ल्यास तो जास्त फायदेशीर ठरतो.

उपयोग

 • अक्रोड हा पौष्टिक असल्याने शरीर कृश असलेल्यांनी व अशक्तपणा जाणवणाऱ्यांनी सकाळी उठल्याबरोबर २-३ अक्रोड इतर सुक्या मेव्यासोबत खावेत.
 • शुक्रजंतू कमी असल्यामुळे वंध्यत्व निर्माण झालेल्या पुरुषांनी अक्रोडचे नियमित सेवन करावे.
 • अक्रोड हे वातघ्न असल्यामुळे संधिवात या आजारावर उपयुक्त आहे. संधिवात असणाऱ्यांनी ७-८ अक्रोडाचे सेवन करावे.
 • अक्रोडाचे तेल नियमित सेवन केल्याने आतडय़ांमधील कृमी नाश पावतात व शौचावाटे बाहेर पडतात.
 • अक्रोड हे सारक गुणधर्माचे असल्याने मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी अक्रोड नियमित सेवन करावे. यामध्ये असणाऱ्या तेलामुळे व तंतुमय पदार्थांमुळे शौचास साफ होते.
 • अक्रोडची पाने ही कृमीनाशक आहेत.
 • अक्रोड वनस्पतीची साल व पाने गंडमाळा, पुरळ, उपदंश व त्वचारोग इत्यादींवर गुणकारी आहे.
 • चेहऱ्यावरील काळे वांग असणाऱ्यांनी अक्रोड बारीक उगाळून त्याचा लेप चोळून लावावा. काळे वांग कमी होण्यास सुरूवात होते.
 • अक्रोड बीज तेल खाद्यतेल म्हणून उपयोगात येते तर रंग साबण यामध्येही सौंदर्यवर्धक म्हणून उपयोगी ठरते.
 • सहसा जेवणानंतर अक्रोड खावा. यामुळे जेवणाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते.
 • अकाली केस पांढरे होणे, केस गळणे या तक्रारींवर अक्रोड सिद्ध तेल वापरले असता केस काळेभोर व लांब होतात. हे तेल बनविताना अक्रोड बी सोबत त्याच्या वृक्षाच्या सालीचाही वापर करावा.
 • विसराळूपणा जास्त जाणवत असेल तर रोज सकाळी ४-५ अक्रोड खावेत. त्यासोबत प्राणायाम व ध्यानधारणा नियमितपणे करावी. यामुळे विस्मरण कमी होऊन बुद्धीवर्धन होते.

सावधानता –

अक्रोड खरेदी करताना शक्यतो त्याच्या कवचासह खरेदी करावा. ज्यावेळी अक्रोड खायचा आहे. त्याचवेळी तो फोडून खावा कारण फोडलेला अक्रोड जितके दिवस बाहेर राहील त्या प्रमाणात त्याचे गुणधर्म, स्वाद व चव कमी होत जाईल. त्यामध्ये तेल असल्यामुळे लवकर कीड लागून खराब होण्याची शक्यता असते. म्हणून अक्रोड फोडून जर, गर ठेवायचाच असेल तर घट्ट डब्यात भरुन, फ्रीजमध्ये ठेवावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 3:40 pm

Web Title: health benefits of walnut tips in marathi nck 90
Next Stories
1 बंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप्सची भारतात नव्या ‘अवतारात’ एन्ट्री; झाले कोट्यवधी डाऊनलोड
2 सांधेदुखीने त्रस्त आहात ? मग आहारात करा फ्लॉवरचा समावेश
3 ट्रिपल कॅमेऱ्याचा Vivo V20 SE लाँच, जाणून घ्या फीचर्स
Just Now!
X