आंबट गोड चवीची, पिवळ्या केशरी रंगाची संत्री सगळ्यांच्या आवडीची असतात. संत्र्यात भरपूर प्रमाणत ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्व असतं. साधारण थंडीत संत्र्यांचा हंगाम सुरू होतो. महाराष्ट्रात नागपूरमध्ये संत्र्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. संत्र्यापासून ज्यूस, जॅम, जेली, अत्तर , सुगंधी तेल, चूर्ण असे अनेक पदार्थ तयार केले जातात. पण फक्त खाद्यपदार्थ किंवा सौंदर्य पदार्थच नाही तर आरोग्याच्या अनेक समस्यांवर संत्रं फायदेशीर आहे. चला तर या संत्र्याचे फायदे जाणून घेऊयात.

– भूक मंदावणे, पोटात गॅस होणे अशा समस्यांवर संत्र्याचा रस प्यायल्यास खूप आराम पडतो.
– मळमळल्यासारखं होत असल्यास संत्र्याची साल हुंगल्यास लगेच आराम पडतो.
– पचनशक्ती वाढवण्यासाठी संत्र खावे.
– मलावरोधाचा त्रास होत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी संत्र्याच्या फोडी पांढऱ्या सालीसकट खाव्यात, सालीतील तंतूमय पदार्थामुळे शौचास साफ होते.
– संत्र्यामध्ये असणाऱ्या ‘क’जीवनसत्त्वामुळे दातांच्या अनेक समस्या दूर होतात.
– थकवा, अशक्तपणा जाणवत असल्यास संत्र खावं.
– हंगाम संत्री आवर्जून खावी, कारण त्वचेचे सौंदर्य सुधारण्यासाठी संत्री मदत करते.
– संत्री ही थंड असतात. अति उष्णतेचा त्रास झाल्यास संत्र्याचा रस प्यावा.
– संत्र्याची साल वाळवून त्यापासून चूर्ण तयार करावे. हे सूक्ष्म चूर्ण चेहऱ्यावर लावल्यास मुरुमे व पुटकुळ्या दूर होऊन त्वचा कांतीयुक्त होते.
– संत्र्याच्या नियमित सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

पण संत्री खाताना काळजी घ्यावी, सर्दी, खोकला झाला असेल तर अति आंबट चवीचे व कच्चे संत्रे खाऊ नये, त्यामुळे खोकला अधिकच वाढू शकतो.